देश विदेशआरोग्य व शिक्षण

गोमंतकातील मराठी परंपरेचे दाखलें

 

‘महाराष्ट्राची जशी मराठी, तशी गोव्याची केवळ कोकणी’ हा सरळसोट समज करून घेऊन महाराष्ट्रातील काही मराठी विद्वान मंडळी गोव्यात येतात. पण जेव्हा त्यांच्या लक्षात येते की या इवल्याशा गोव्यामध्ये बहुसंख्य हिंदू समाजाचा सर्व लेखन – वाचन व्यवहार आज देखील जवळजवळ संपूर्णतः मराठीमध्येच होतो, रोज येथे दहा मराठी दैनिके प्रकाशित होतात आणि लाखोंनी खपतात, येथील शाळांतून दरवर्षी सर्वाधिक संख्येने लाखो मुले मराठी माध्यमातून प्राथमिक शिक्षण घेतात, पुढील शिक्षणातही मराठी विषय निवडतात, येथील गावागावांमध्ये मठ – मंदिरांमधून केवळ मराठीतूनच सतत भजन – कीर्तन – आरत्या होतात, वर्षाकाठी हजारो नाटके आणि गीत – संगीताचे कार्यक्रम होतात, तेव्हा त्यांची बोटे तोंडात गेल्याविना राहात नाहीत. जेव्हा या मंडळींना समजते की गोवा आणि मराठीचे हे नाते आजचे किंवा गोवा मुक्तीनंतरचे नसून त्यापूर्वीच्या शतकानुशतकांचे, अगदी ज्ञानेश्वरकालीन आहे आणि इथली मराठी संस्कृती पोर्तुगिजांच्या तब्बल साडेचार वर्षांच्या दमनचक्रातूनही तावून सुलाखून पुन्हा झळाळून निघालेली आहे, तेव्हा तर त्यांच्या आश्चर्याला पारावार उरत नाही. याचे कारण मराठीसाठी ह्या गोमंतकाने किती खस्ता खाल्ल्या आहेत, किती संघर्ष केला आहे, येथे मराठीची केवढी मोठी उज्ज्वल परंपरा आहे याची यत्किंचितही माहिती किंवा जाणीव त्यांना नसते.
गोमंतक आणि मराठी भाषा यांचे नाते हे जिव्हाळ्याचे, जिवाभावाचे आहे. प्रत्येक गोमंतकीय रोज घरी कोकणीच बोलतो. कोकणीवर त्याचे प्रेमही नक्कीच आहे. परंतु व्यावहारिक, धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वापरासाठी त्याला पिढ्यानपिढ्या मराठी भाषाच जवळची वाटत आली आहे. याला कारण आहे ती या भूमीतील मराठीची तेजस्वी परंपरा.
पोर्तुगिजांचे पांढरे पाय गोव्याच्या भूमीला सोळाव्या शतकात लागले. 1510 मध्ये त्यांनी गोवा बेट जिंकून घेतले. नंतर तिसवाडीवर ताबा मिळवला आणि 1543 पर्यंत सासष्टी आणि बारदेश जिंकून घेतले, ज्यांना जुन्या काबिजादी म्हटले जाते. या भागावर त्यांचा तब्बल साडे चार शतके अंमल राहिला. मात्र, आजचा फोंडा, तसेच सांगे, केपे, काणकोण हा भाग त्यांच्या ताब्यात यायला 1763 साल उजाडावे लागले. तोवर तो विजापूरकरांच्या, नंतर शिवाजी महाराजांच्या आणि पेशवाईच्या काळात त्यांचे मांडलिक सौंदेकरांच्या ताब्यात होता. त्याचप्रमाणे उत्तरेकडील पेडणे, डिचोली आणि सत्तरी हा भाग पोर्तुगिजांनी जिंकायला 1788 उजाडावे लागले. तोवर तो प्रदेशही विजापूरकर, मराठे आणि नंतर सावंतवाडीकर भोसल्यांच्या ताब्यात होता. अठराव्या शतकात पोर्तुगिजांच्या हाती आलेल्या या दोन्ही भागांना नव्या काबिजादी म्हटले जाते. गोव्याच्या जुन्या आणि नव्या काबिजादींवर, तेथील सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक जीवनावर ह्या फरकाचा फार मोठा परिणाम आजही दिसून येतो.
गोव्याचा जो भाग पोर्तुगिजांच्या हाती आधी आला, तेथे त्यांनी अनन्वित अत्याचार केले. धर्मच्छळाचा एक फार मोठा वरवंटा फिरवला. तेथील संस्कृती आणि अस्मिता नष्ट करण्यासाठी हुकुमांवर हुकूम निघाले. 1541 मध्ये तिसवाडीतील देवळे पाडण्याचा हुकूम काढण्यात आला आणि त्यांच्या जमिनी जप्त करून सेंट पॉल कॉलेजला देण्यात आल्या. पुन्हा नवा फतवा निघाला आणि उरलीसुरली देवळे पाडून टाकण्यात आली. ब्राह्मणवर्गाकडून साजरे होणारे सण-उत्सव पूर्णतः बंद पाडले गेले. कोणी घरात चोरून उत्सव साजरा करीत असेल तर त्याची चुगली करणार्‍यास त्याची अर्धी संपत्ती मिळेल अशी तरतूद केली गेली. घरोघरी वाचली जाणारी पोथ्यापुराणे जाळून नष्ट केली गेली. ब्राह्मणवर्गाच्या हद्दपारीचे आदेश निघाले, एका महिन्याच्या आत घरदार सोडून जायला भाग पाडले गेले. परिणामी इतक्या मोठ्या प्रमाणावर धर्मांतर वा स्थलांतर झाले की हिंदूंची संख्या त्या भागांमध्ये कमी कमी होत गेली. ज्या मूळ हिंदू घराण्यांचा धर्म बदलला गेला त्यांच्या विस्तृत याद्या आज नावांनिशी उपलब्ध आहेत.
1560 मध्ये तर धर्मसमीक्षण सभा म्हणजे इन्क्विझिशन स्थापन झाले. आऊत द फॅ म्हणजे जुन्या धार्मिक पोथ्यांचे दहनोत्सव साजरे केले जाऊ लागले. पुढे जो भाग पोर्तुगिजांच्या ताब्यात आला, त्या सासष्टी, बार्देशमधील शेकडो मंदिरेही पाडून टाकली गेली. हिंदू समाजाला अवमानित करण्याची एकही संधी सोडली गेली नाही. जे मोजके सरकारी चाकरीत होते, त्यांना काढून टाकले गेले, डोली आणि पालखीतून फिरणार्‍यांनाही बंदी केली गेली, जानव्यापासून शेंडीपर्यंतच्या कोणत्याही दृश्य धार्मिक संस्कारांस मनाई झाली. हिंदूंचा वंश वाढू नये म्हणून लग्नसोहळ्यांवरही बंदी घातली गेली. जे बाहेर जाऊन विवाह करायचे, त्यांच्यावर कर लागू करण्यात आला.
27 जून 1684 रोजी व्हाईसरॉयच्या नावे एक हुकूम काढून स्थानिकांना देशी भाषा वापरण्यावरच बंदी घातली गेली. स्थानिकांनी मराठीऐवजी केवळ पोर्तुगीज भाषाच शिकली पाहिजे. ख्रिस्ती पाद्री आणि मिस्तिरीं (शिक्षकां) नी फक्त पोर्तुगीजमधूनच शिकवावे असा हुकूम निघाला. त्या काळी स्थानिक हिंदूंचा सर्व लेखी व्यवहार मराठीमधूनच होत असे. ग्रामसंस्थांचा (कोमुनिदादी) सर्व लेखनव्यवहार, देवस्थानांचा सर्व लेखनव्यवहार मराठीतून होत असे. इतकेच काय, बाटलेले नवख्रिस्तीही मराठीचा वापर करीत असत. फ्रान्सिस्कन पाद्य्रांच्या जागी देशी पाद्य्रांना नेमावे असा अर्ज बार्देश म्युनिसीपालिटीने 1765 मध्ये पोर्तुगालच्या राजाला केला, त्याला फ्रान्सिस्कन पाद्य्रांनी जे उत्तर लिहिले, त्यात गोव्याची मातृभाषा मराठी असल्याचे स्पष्टपणे नोंदवले आहे.
पोर्तुगिजांच्या राजवटीच्या आरंभकाळात एका बाजूने जबरी धर्मांतरे आणि दुसर्‍या बाजूने स्वाभिमानाला चिरडून टाकण्याचा आटोकाट प्रयत्न यामध्ये तत्कालीन गोमंतकीय जनतेची किती अतोनात परवड झाली असेल याची कल्पना करतानाही अंगावर काटा उभा राहतो.
पोर्तुगिजांच्या येण्याआधीच गोमंतकामध्ये संस्कृत आणि मराठीचा वापर व्यावहारिक जीवनामध्ये होत असे याचे अनेक ठोस पुरावे शिलालेख आणि ताम्रपटांच्या रूपात उपलब्ध आहेत. अगदी सहाव्या – सातव्या शतकातील संस्कृत ताम्रपट गोव्यात सापडले आहेत आणि तेराव्या शतकातील हळेकन्नड लिपीतील मराठी ताम्रपट आणि त्यानंतरच्या काळात तर देवनागरी लिपीतील मराठी ताम्रपट आढळून आले आहेत. इ. स. 1300 मधील खांडोळे येथील आणि इ. स. 1313 मधील वेळूस येथील ताम्रपट त्या काळी मराठीचे गोमंतकाच्या समाजजीवनातील स्थान आणि परंपरा अधोरेखित करतात.
पोर्तुगिजांनी येथील पोथ्या – पुराणे जाळून टाकली, परंतु त्या ओजस्वी परंपरेचा वारसा सांगणारी एकमेव पोथी आज उपलब्ध आहे ती आहे कृष्णदास शामा यांची श्रीकृष्णचरित्रकथा.
पोर्तुगिजांच्या ताब्यात सासष्टी प्रांत जाण्यापूर्वी आदिलशाहीतील केळशी या गावच्या श्री शांतादुर्गेच्या मंदिरामध्ये कृष्णदास शामा ऊर्फ सामराज याने हा ग्रंथ इ. स. 1526 मध्ये लिहिला. त्यामध्ये या लेखनाची तारीख नोंदवलेली आहे ती आहे वैशाख शुक्ल त्रयोदशी, शके 1448 म्हणजेच 25 एप्रिल 1526. भागवताच्या दशमस्कंदावरील हा टीकाग्रंथ त्याने एकनाथांची भागवतावरील टीका लिहिली जाण्याआधी मराठीतून लिहिला. ग्रंथाच्या सातव्या अध्यायात म्हणजेच सातव्या अवस्वरामध्ये कृष्णदास शामा तसे स्पष्टपणे सांगतो –
म्हणोनि सुत आला सांगत । तो हा कृष्णदासशामा सुत ।
दशमस्कंदीचा सांगेन वृत्तांत । मराठीया ॥
त्या काळीदेखील गोमंतकामधील सर्व लेखन व्यवहार हा मराठीतून होत असे याचा हाही एक भरभक्कम पुरावा आहे.
पोर्तुगिजांनी धार्मिक पोथ्यापुराणांची जाळपोळ केली, परंतु काही ग्रंथ जाळण्याआधी त्यांचा गद्य सारांश काही ब्राह्मणांच्या मदतीने रोमी लिपीमध्ये लिहून काढला. त्यामुळे तो बोलीभाषेमध्ये आहे. ते ओवीबद्ध लेखन नसून गद्यरूपात आहे हेच तो तत्कालीन पोथ्यांचा केवळ सारांश असल्याचे दर्शवते. शिवाय त्या सारांशांमध्ये ‘वाचितले’ असा स्पष्ट उल्लेख मूळ ग्रंथ वाचून घेऊन त्यांचा सारांश रोमी लिपीमध्ये बोलीभाषेत लिहून घेतल्याचे स्पष्ट करतो, याला डॉ. ऑलिव्हिन गोमीश यांनी आपल्या ग्रंथात दुजोरा दिला आहे. पाद्य्रांनी लिहून काढलेला हा सारांश हे कृष्णदास शामाचे कोकणी लेखन असल्याची लोणकढी थाप आज बेधडक मारली जाताना दिसते.
त्या काळी गोमंतकामध्ये लोकप्रिय असलेल्या पोथ्यांच्या लेखकांची काही नावे आपल्याला या जुन्या कागदपत्रांमध्ये आढळतात, ज्यांच्या मराठी रचना रोमी लिपीमध्ये उतरवून घेतल्या गेल्या होत्या. त्यामध्ये प्रामुख्याने नाव दिसते ते विष्णुदास नामा याचे. हा विष्णूदास नामा म्हणजे संत नामदेव नव्हेत हे अ. का. प्रियोळकरादी संशोधकांनी सिद्ध केलेले आहे. विष्णुदास नामा, शिवदास, ज्ञानदेव, नामदेव, निवृत्ती, समयानंद अशा विविध नावांखालील आणि रोमी लिपीमध्ये उतरवले गेलेले हे लेखन आपल्यापुढे गोमंतकातील तो काळ जिवंत करतात. विष्णुदास नाम्याचे ‘प्रल्हादचरित्र’, ‘शुकदेव चरित्रकथा’, ‘हरिश्चंद्रपुराणकथा’, ‘भारत विराटपर्वी कथा’, ‘ताम्रध्वजाचा अवस्वर’, ‘कर्णपर्व’, ‘सीताहरण,’ ‘उखाहरण कथा’, ‘कृष्ण – अर्जुनाचा संवादु’, ज्ञानदेवाचा ‘वसिष्ठयोग’, ‘द्रोणपर्वी महाभारत कथा’, ‘रघुमल्हार’, शिवदासाची ‘गरूडकथा’, शिंपा नाम्याची ‘बालक्रीडा’, नामा सदा याची ‘हरिणीची कथा’, ‘राजनीतीच्या ओव्या’, ‘दुर्वासु भोजन’, ‘सीताशुद्धी’, ‘भगवद्गीतेची कथा’, ‘रामाश्वमेध’, समयानंद नाम्याचा ‘गुरु शिष्यु संवादु’, ‘महालसा’, मेघश्यामाचे ‘रुक्मिणी स्वयंवर’, ‘रुक्मिणी सखीचा संवादु’ वगैरे मिळून रामायणाशी संबंधित 9 , महाभारताशी संबंधित 9 आणि 12 इतर काव्ये असे हे मराठी संचित तत्कालीन गोमंतकातील मराठी वारशाचा भक्कम पुरावा आहेत.

रोमी लिपीत लिप्यंतरित करून उतरवून घेतलेल्या ह्या पोथ्यांच्या बाडाची माझ्या संग्रहातील प्रत 556 पानांची आहे, तर पाद्य्रांनी लिहिलेले गद्य सारांश जमेस धरता अठराशेहून अधिक पाने भरतात, जी तत्कालीन समाजामध्ये मराठीतील ही रामायण महाभारतावरील आख्याने सुसंस्कृत घराण्यांमध्ये कशी वाचली जात असत त्याचा सज्जड पुरावा देतात. पोर्तुगिजांच्या आगमनापूर्वी तत्कालीन गोमंतक इतर मराठी प्रदेशाच्या सांस्कृतिक जीवनाशी किती समरस झालेला होता याचे ह्रद्य दर्शन यातून घडते. नाथसंप्रदाय आणि भागवत संप्रदायाचा प्रसार गोव्यामध्ये मोठ्या प्रमाणावर झालेला होता. ती परंपरा पुढेही सुरू राहिलेली दिसते.
विठ्ठलभक्तीचा प्रसार त्या काळीही गोमंतकामध्ये झालेला होता याला ख्रिस्ती पाद्य्रांनीच दुजोरा दिलेला आहे. 26 नोव्हेंबर 1566 रोजी पाद्री सेबास्त्यांव गोन्साल्वीस याने ब्रदर लॉरेझो मेक्सिको याला पत्र लिहिले आहे, त्यात गोव्यामध्ये विठ्ठल भक्तिपर गीते कशी गायिली जातात याचा उपहासपर का होईना, परंतु स्पष्ट उल्लेख केलेला आहे. ‘एक वेळ देखसी पंढरी, विटिलरायाची (विठ्ठलरायाची) नगरी’ यासारखी गीते येथे म्हटली जातात असा उल्लेख तो करतो. ज्या कृष्णदास श्यामाचा श्रीकृष्णचरित्रकथा हा पहिलावहिला ज्ञात काव्यग्रंथ आज उपलब्ध आहे तोही आपला गुरू पंढरपूरवासी गोविंद असल्याचे नमूद करताना दिसतो. पंढरपूरशी गोव्याचे असे नाते त्या काळीही जडलेले होते, जी भक्तिपरंपरा आजही कायम आहे.
पोर्तुगीज पाद्री हिंदूंच्या प्रमुख घराण्यांच्या घरांवर रात्री धाडी घालत तेव्हा मुकुंदराजाचा विवेकसिंधू, अमृतानंदाचा योगराजतिलक असे ग्रंथ सापडत असत अशी नोंद ‘दोकुमेंता इंदिका’ मध्ये आहे.
धर्मांतरित नवख्रिस्त्यांपैकी काहींनी ख्रिस्ती पाद्—यांपाशी मागणी केली की आम्हाला तुम्ही धर्म बदलायला लावलात, परंतु नव्या धर्माची माहिती देणारे ग्रंथ तरी द्या. त्यातूनच जेजुईट मिशनर्‍यांनी मराठीतून वाङ्मय लिहिले. फादर स्टीफन्सने आपल्या ख्रिस्तपुराणातच ती पार्श्वभूमी कथन केलेली आहे. सासष्टीच्या एका चर्चमध्ये दौत्रिन क्रिस्ता ह्या फादर स्टीफन्सच्या प्रश्नोत्तरीचे वाचन झाले तेव्हा एक ब्राह्मण त्यांच्याजवळ येऊन म्हणाला,
“हे दौत्रिनी वांचोनी आन । काही एक आगळे शास्त्रपुराण ।
जरी आमां करविते पठन । तरी होते चांग”
त्यामुळेच फादर स्टीफन्सने 10962 ओव्यांचे ख्रिस्तपुराण लिहिले. ते मराठीतून लिहिले, कारण त्या काळी देखील येथे मराठी लेखन – वाचनाची परंपरा होती. या प्रतिपुराण लेखनासाठी त्याने आणि त्याच्या समकालीन पाद्य्रांनी त्या काळी येथे वाचल्या जाणार्‍या ग्रंथांचा आधार घेतला. त्यांची भ्रष्ट नक्कल केली. ज्ञानदेवाच्या योगवासिष्ठ्याची सरळसरळ नक्कल करीत त्याने मराठीची महती गाणार्‍या त्या प्रसिद्ध ओव्या लिहिल्या,
जैसी हरिळांमाजी रत्नकिळा । की रत्नांमाजी हिरा निळा ।
तैसी भासांमाजी चोखळा । भासा मराठी ॥
ज्ञानदेवाच्या योगवासिष्ठ्याची ही भ्रष्ट नक्कल आहे हे उघड आहे. योगवासिष्ठ्यातील मूळ ओव्या अशा आहेत –
हरळांमाजी रत्नकीळ । का पुस्पांमध्ये कमळ ।
तैसी भासांमध्ये सोज्वळ । शोभिवंत दिसे ॥
येथील हिंदूंना देशोधडीला लावण्याचा आणि बाटग्या नवख्रिस्त्यांवरील जुने धार्मिक संस्कार पुसून टाकण्याचा पराकोटीचा प्रयत्न त्या काळात झाला. त्यासाठी हिंदू देवदेवतांची नालस्ती करणारी प्रतिपुराणे लिहिली गेली. एतियन द ला क्रुवाच्या सेंट पीटरपुराणसारख्या (1629) प्रतिपुराणाच्या लेखनासाठी कोणकोणत्या तत्कालीन मराठी पोथ्यांचा आधार घेतला गेला आहे याच्या नावानिशी खुणा त्या ग्रंथावरच सापडतात. आपण हा ग्रंथ मराठीत लिहिल्याचे क्रुवाही प्रास्ताविकात स्पष्टपणे सांगतो. जेजुईटांनी त्या काळी लिहिलेल्या धार्मिक वाङ्मयावर विपुल संशोधन झाले आहे. त्यामुळे येथे त्याची पुनरुक्ती करीत नाही. परंतु जेजुईटांनी नवख्रिस्त्यांमधील त्यांच्या मूळ संस्कृतीच्या खुणा पुसण्याचा कितीही आटापिटा जरी केला तरी आजदेखील अनेक ख्रिस्ती कुटुंबे आपल्या मूळ हिंदू दैवतांना भजताना दिसतात. त्यांच्यात धर्मानंतरही ओव्या म्हणजे ‘होवयो’ म्हटल्या जात असत, ज्यामुळे पोर्तुगीज सरकारला 1707 मध्ये हुकूम काढन बंदी घालावी लागली. परंतु आजही त्यांच्या लग्नांमध्ये ‘होवयो’ म्हणण्याची प्रथा दिसते. धर्मच्छळातून वाचलेल्या गोमंतकीय जनतेने आपला देव, देश, धर्म याबद्दलचा अभिमान कधीही सोडला नाही. जिवावर बेतले तेव्हा त्यांनी रातोरात आपल्या देवदेवतांसह स्थलांतर केले, घरादारावर पाणी सोडून निष्कांचन होऊन परप्रांतांमध्ये आसर्‍याला गेले, तेथे स्वतःच्या हिंमतीवर राखेतून पुन्हा ही कुटुंबे उभी राहिली. गोमंतकाशी, येथील देवदेवतांशी असलेले नाते त्यांनी आजही जपले आहे. गोमंतकीयांनी पोर्तुगीज राजवटीत अनन्वित छळ सोसला, अत्याचार सोसले, परंतु आपली संस्कृती प्राणपणाने जपली.
पोर्तुगिजांनी मराठीला संपवण्याचा अतोनात प्रयत्न केला, परंतु पुढे एक वेळ अशी आली जेव्हा पोर्तुगिजांनाच एकोणिसाव्या शतकामध्ये मराठीचा आधार घ्यावा लागला. येथील ग्रामसंस्थांचा, देवस्थानांचा सर्व व्यवहार मराठीतून होत असल्याने पोर्तुगीज मराठी भाषांतरकार नेमण्याची पाळी पोर्तुगीज सरकारवर ओढवली. सूर्याजी आनंद राव देशपांडे हे सरकारी भाषांतरकार हे काम करीत असत. “पोर्तुगीज ही गोव्याची मुख्य भाषा असली तरी तिच्यानंतर मराठी ही अर्ध्या हिंदू जनतेची राजभाषा आहे” असे त्यांनी 1876 साली मराठीचे जे व्याकरण लिहिले, त्याच्या प्रास्ताविकात स्पष्टपणे नमूद केलेले आहे. त्यांनी 1879 साली लिहिलेल्या पोर्तुगीज मराठी कोशामध्ये देखील त्याला दुजोरा दिलेला दिसतो. गोव्यातील मराठीचे पहिले व्याकरण सखाराम नारायण वाघ यांनी 1819 मध्ये लिहिले आहे, हे सर्व लेखन अर्थातच या प्रदेशातील त्या काळातील मराठीचे स्थान अधोरेखित करते.
जनतेचा सर्व व्यवहार मराठीत चालत असल्याने पोर्तुगीज सरकारला आपल्या पोर्तुगीज राजपत्रामध्ये मराठी मजकूर छापण्यासाठी मराठी टंकाची गरज भासली आणि 1853 मध्ये त्यांना मुंबईहून टंक आणावा लागला. एकोणिसाव्या शतकामध्ये पोर्तुगीज राजपत्रातून मराठीतून प्रसिद्ध झालेल्या अशा अनेक जाहिराती पाहायला मिळतात. मराठी बाराखडीपासून इसापनीतीपर्यंतची पुस्तके पोर्तुगिज सरकारने त्या काळी प्रसिद्ध केली.
इ. स. 1829 पर्यंत गोव्यामध्ये कोणत्याच भाषेची सरकारी शाळा नव्हती. मिशनर्‍यांच्या शिक्षणसंस्थांतून केवळ धार्मिक शिक्षण दिले जाई. 1829 मध्ये तत्कालीन पोर्तुगीज गव्हर्नरने पोर्तुगीज भाषेच्या तीन प्राथमिक शाळा उघडायला मंजुरी दिली. याच काळात गोव्यात मराठीचा पहिला वर्ग पणजीत सुरू झाला. सरकारी दुभाषी सखाराम नारायण वाघ तो चालवीत असत. 8 ऑगस्ट 1843 मध्ये पोर्तुगीज सरकारने उघडलेली पहिली सरकारी प्राथमिक मराठी शाळा पणजीत सुरू झाली. नंतर मडगावात आणि म्हापशातही पोर्तुगीज सरकारने मराठी शाळा सुरू केल्या. त्यानंतर 1854 साली सुरू झालेल्या लिसेंव नासिओनाल ह्या पोर्तुगीज माध्यमिक शाळेतही मराठीला व संस्कृतला दुय्यम भाषा म्हणून स्थान होते. सरकार पातळीवर मराठी शाळा सुरू होण्याच्या कैक वर्षे आधी सधन गोमंतकीयांनी स्वखर्चाने घरोघरी शिक्षक नेमून मराठी शिक्षणाची दारे खुली केली होती. घराच्या ओसरीवर, देवळांमध्ये, अग्रशाळांमध्ये हे वर्ग चालत असत. त्यांच्या आधारेच मराठीची धारा गोव्यामध्ये सतत प्रवाहित राहिली. 10 जुलै 1871 मध्ये पोर्तुगीज सरकारला कायदा करून पोर्तुगीज शाळांचे रुपांतर पोर्तुगीज – मराठी शाळांत करणे भाग पडले. प्रत्येक तालुक्यात पोर्तुगीज – मराठी शाळा उघडाव्या लागल्या. पोर्तुगीज सरकारची मराठी क्रमिक पुस्तके तर गोवा मुक्त होईपर्यंत वापरात होती.
गोमंतकीय मराठी साहित्याची ओजस्वी धारा आज आपल्याला या भूमीने प्राणपणाने जपलेल्या त्या मराठी वारशाची ओळख घडवते. अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे म्हणणार्‍या सोहिरोबानाथ आंबिंयेंपासून विश्वाचा विश्राम रे, स्वामी माझा राम रे म्हणणार्‍या कृष्णंभट्ट बांदकरांपर्यंत संतसाहित्याची, आध्यात्मिक काव्याची जशी मोठी परंपरा गोव्यात आढळते, तशीच राष्ट्रीय विचारांच्या काव्याची, लेखनाची ओजस्वी परंपराही लखलखून उठते. त्या सगळ्याचा परामर्ष घेण्यासाठी स्वतंत्र लेखच लिहावा लागेल.
पोर्तुगीज राजवटीमध्ये येथे झुंजार मराठी पत्रकारिता बहरली. 1870 मधील ‘आनंदलहरी’ आणि 1872 मधील ‘देशसुधारणेच्छु’पासूनची ही तेजस्वी पत्रकारितेची परंपरा सतत मराठीचा पुरस्कार करीत आलेली आपल्याला दिसते. गोव्यातील आद्य मराठी नियतकालिक ‘देशसुधारणेच्छु’ पोर्तुगीज सरकारला आवाहन करतो, “आपले अनाथ लोक अज्ञानांधकारातून ज्ञानकिरणात येण्याकरिता एतद्देशीय जी मराठी भाषा तिच्या प्रिमार्य (प्रायमरी) शाळा स्थापाव्या व विद्येचे जीवन जाणून परतंत्ररूप सागरात जे ते गचकळ्या खात आहेत त्यांस स्वतंत्रतेच्या मार्गात आणण्यास आपला परोपकारी हस्त द्यावा” ‘देशसुधारणेच्छु’ प्रसिद्ध करणार्‍या तॉमस मोर्रांव गार्सेझ द पाल्यश या युरोपीयन सद्गृहस्थांनी तर मराठी संतवाङ्मयाचे, क्रमिक पुस्तकांचे प्रकाशन आग्रहाने केले होते.
‘प्रभात’ कार पुरुषोत्तम वामन शिरगावकर, ‘सत्संग’कार करंडेशास्त्री, ‘भारत’कार कै. गोविंद पुंडलिक हेगडे देसाई, ‘हिंदू’ कार दत्तात्रेय व्यंकटेश पै अशा एकेकाचे कार्यकर्तृत्व थक्क करून सोडते. माझ्या ‘गोमंतकीय मराठी पत्रकारितेचा इतिहास’ या ग्रंथामध्ये त्याविषयी मी सविस्तर लिहिले आहे, त्यामुळे येथे त्याची पुनरुक्ती करू इच्छित नाही, परंतु गोमंतकीय सामाजिक, सांस्कृतिक जीवनाच्या केंद्रस्थानी मराठी भाषा कशी होती याचे असे शेकडो लखलखीत पुरावे आहेत. कोकणीला भाषा म्हणून पुढे आणण्याचे कार्य ज्यांनी केले त्या कै. वामन रघुनाथ वर्दे वालावलीकर ऊर्फ शणै गोंयबाब यांनी देखील आपल्या लेखनाची सुरुवात ‘रामराज्याभिषेक’ या मराठी नाटकाद्वारे केली होती.
1910 साली पोर्तुगालमध्ये राज्यक्रांती झाली त्या सुमारास मिळालेल्या मर्यादित स्वातंत्र्याचे अल्पसे कवडसे गोमंतकात एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी पोहोचले, तेव्हा त्या संधीचा पुरेपूर लाभ घेत गोमंतकीयांनी संस्था स्थापन केल्या, शाळा उभारल्या, ग्रंथालये सुरू केली. हिंदू समाजामध्ये जागृतीचे पर्व आणण्याचा प्रयत्न केला. सारस्वत विद्यापीठ हे गोव्यातील पहिले मराठी ग्रंथालय इ. स. 1889 मध्ये माशेल येथे स्थापन झाले. विसाव्या शतकाच्या प्रारंभी गावोगावी मराठीची पताका मिरवीत शाळा, ग्रंथालये, संस्था उभ्या राहिल्या. त्यातूनच झालेल्या जागृतीचा परिणाम म्हणून पुढे मुक्तिचळवळीची प्रभातकिरणे पारतंत्र्याने पिचलेल्या गोमंतभूमीवर पोहोचू शकली. डॉ. राममनोहर लोहिया यांनी त्याला प्रकट उद्गार दिला आणि गोवा मुक्तीलढ्याचे पर्व सुरू झाले. या सर्व वाटचालीमध्ये स्वत्व, अस्मिता आणि राष्ट्रीयत्व याचा दृढ संस्कार गोमंतकीय जनमानसावर कोणी केला असेल तर तो केवळ मराठी भाषेने केला आहे. गोमंतकावर मराठी भाषेचे हे फार मोठे ऋण आहे.
लुईझ द मिनेझिस ब्रागांझांसारखे राष्ट्रवादी 24 ऑगस्ट 1927 च्या ‘येराल्दु’ या पोर्तुगीज नियतकालिकात लिहितात, “मराठी ही गोव्यातील अर्ध्याहून अधिक प्रजेची मातृभाषा असून संख्या व पात्रता या उभय दृष्टींनी ती सुसंपन्न आहे.” अ‍ॅड. सालिश द आंद्रादिसारख्यांनी पोर्तुगीज कायदेमंडळात मराठीची बाजू ठामपणाने मांडलेली दिसते.
गोमंतकाची मराठी साहित्याची परंपरा फार मोठी आहे. बाराव्या शतकापासून इसवी सन 2000 पर्यंतचा गोमंतकीय मराठी वाङ्मयाचा इतिहास दोन विस्तृत खंडांमध्ये संकलित झालेला आहे. एकही असा वाङ्मयप्रकार नाही की ज्यामध्ये गोमंतकीयांचे महत्त्वपूर्ण योगदान नाही. एकूण मराठी साहित्याच्या धारेमध्ये यातील अनेकांनी आपली नाममुद्रा उमटवलेली आहे. ह्या सगळ्याचा परामर्ष घेण्यास शब्दमर्यादेमुळे येथे वाव नाही.
दुर्दैवाची बाब म्हणजे गोव्याच्या मुक्तीनंतर देखील मराठीवरील आक्रमणे थांबली नाहीत. मुक्तीच्या पहिल्या दशकामध्येच उभ्या राहिलेल्या विलीनीकरणवादावेळी मराठी भाषेची सांगड महाराष्ट्रवादाशी घातली गेल्याने येथील शतकानुशतकांच्या मराठी परंपरेचे अतोनात नुकसान झाले. मराठी ही बाहेरून आलेली आहे हा गैरसमज नव्या पिढीमध्ये सतत पसरवण्यात आला. ख्रिस्ती मंडळींना मराठी भाषेविरुद्ध चिथावण्यात आले. त्यातून कोकणी – मराठीमध्ये अकारण दरी निर्माण झाली. वास्तविक, कोकणीच्या स्वतंत्र अस्तित्वाचा साक्षात्कार शणै गोंयबाबना होईपर्यंत गोव्यामध्ये मराठीच्या व्यासपीठावर कोकणीला मराठीची स्थानिक बोली म्हणून आपुलकीचे स्थान असे. 1930 मध्ये मडगावात साजर्‍या झालेल्या पंधराव्या महाराष्ट्र साहित्य संमेलनात कोकणी गीतेही सादर झालेली होती. परंतु नंतरच्या काळात भाषावादाचे जहर या भूमीत भिनत गेले आणि त्याची परिणती 1964 मध्ये मडगावात अ. भा. मराठी साहित्य संमेलन भरले तोवर जहाल स्वरूपामध्ये झालेली होती.
गोमंतकीयांच्या सानुनासिक मराठी बोलण्याची महाराष्ट्रात सतत झालेली हेटाळणी आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून निर्माण झालेली बंडखोरी, गोव्याच्या स्वतंत्र अस्तित्वाची कोकणी भाषा चळवळीशी घातली गेलेली सांगड, कोकणीचा स्वतंत्र भाषेच्या स्थानासाठी साहित्य अकादमीच्या मान्यतेचा आणि नंतरचा राजभाषेसाठीचा मुख्यत्वे राजकीय स्वरूपाचा आणि राजकीय कारणांखातर सफल झालेला लढा, ऐंशीच्या दशकात राजभाषा आंदोलनाला आलेले हिंसक स्वरूप, परिणामी कोकणी – मराठीमधील रुंदावत गेलेली दरी आणि दोन्ही भाषाप्रेमींमध्ये एकमेकांविषयी निर्माण झालेली अढी यात इंग्रजीची सरशी होत गेली. 1987 साली देवनागरी कोकणी गोव्याची राजभाषा बनली व सरकारी व्यवहारासाठी मराठीच्या वापराची मुभाही राजभाषा कायद्यात देण्यात आली. त्यामुळे अस्वस्थ झालेला रोमी लिपीचा समर्थक असलेला ख्रिस्ती समाज कोकणी चळवळीपासून दुरावला व त्याने रोमीचा सवतासुभा उभारला.
अलीकडेच इंग्रजी माध्यमाला सरकारने दिलेल्या अनुदानाविरुद्ध कोकणी व मराठी भाषाप्रेमी पुन्हा एकत्र येण्यापर्यंत अनेक स्थित्यंतरे गोव्याच्या भाषिक इतिहासात झाली आहेत. अजूनही मराठी आणि कोकणी ह्या दोन्ही भाषांना गोमंतकीयांच्या लेखी प्रेमाचे स्थान आहे आणि दोन्ही भाषांना एकमेकांच्या साहचर्याची आवश्यकता आहे हेच शाश्वत सत्य आहे. एकमेकींचा केवळ द्वेष केल्याने नुकसान दोहोंचेही होत आहे आणि दिवसेंदिवस इंग्रजी वरचढ होत चालली आहे हे भान कधी येणार एवढाच प्रश्न आहे.
(टीपः युगवाणीच्या संपादकांनी केलेल्या विनंतीनुसार गोमंतकातील मराठी परंपरेचा एक धावता आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे. यातून कोणताही विवाद उपस्थित करण्याचा लेखकाचा मानस नाही.

– परेश वासुदेव प्रभू

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!