महाराष्ट्र

राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे

वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना

 

मुंबई,: गणेशोत्सवानिमित्त आज ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक श्री गणरायाची विधिवत पूजा करुन प्रतिष्ठापना केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला सुख समृद्धी मिळू दे अशी प्रार्थना केली.

दरवर्षीप्रमाणे यंदाही मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्या पत्नी सौ. लता शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, स्नुषा सौ. वृषाली शिंदे, नातू कु. रुद्रांश यावेळी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, गणरायाचं आगमन झालंय. आपल्या आयुष्यात पण आनंद, समाधान, समृद्धी येवो, सर्वांना सुबुद्धी मिळो हीच प्रार्थना. प्रत्येक गणोशोत्सव एक नवी ऊर्जा, प्रेरणा आणि उत्साह घेऊन येतो. सगळीकडे मंगलमय आणि पवित्र वातावरण निर्माण होतं. गणेशोत्सवातून महाराष्ट्राच्या महान संस्कृतीचं दर्शन घडतं. सगळ्या जगाचं महाराष्ट्राकडे लक्ष लागलेले असते. या काळात महाराष्ट्राच्याच नाही तर देशात आणि विदेशातही मराठी माणसांत  उत्साह-जोश दिसतो.

हे शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे सरकार आहे. यंदा राज्यात सगळीकडे खूप चांगला पाऊसही झाला आहे, त्यामुळं शेतकरी बांधवामध्येही उत्साह आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतीभातीचं नुकसान झालं आहे. या कालावधीत शेतकऱ्यांना धिर देण्यासाठी  सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांना सर्वोतपरी मदत केली जाईल.

माझं आपणास आवाहन आहे की, श्री गणेशाची मनोभावे सेवा करतानाच, आपण सामाजिक बांधिलकची जाणीव ठेवूया. गरजू लोकांपर्यंत पोहचा. त्यांना मदतीचा हात द्या. त्यांच्यापर्यंत शिक्षण, आरोग्य तसेच अशा विविध प्रकारच्या सेवा, मदत पोहचवण्याचा प्रयत्न करूया. आपण पर्यावरणाची काळजी घेणं पण गरजेचं आहे. आपले सणवार हे निसर्गाला पूरक असे असतात. त्यामुळे निसर्गाचं जतन-संवर्धन होईल ही बाब लक्षात घेऊन सण साजरे करावेत असेही आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.

राज्य शासनाने अनेक चांगल्या लोककल्याणकारी योजना सुरु केल्या आहेत, देशपातळीवर त्याचं कौतुक होत आहे. शेतकरी, युवक, महिला या सर्वचस्तरातील घटकांचा विचार करून शासन सगळ्यांना सक्षम करण्यासाठी पाठबळ देत आहे. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना म्हणजे राज्यातल्या भगिनींच्या आयुष्यात क्रांती आणणारी योजना ठरत आहे. या बहिणींचे आशीर्वादही आम्हाला मिळत आहेत. परदेशी गुंतवणूक राज्यात मोठ्या प्रमाणावर येत आहे. देशाच्या पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचा एक ट्रिलियन डॉलर्सचा वाटा असणार आहे.

श्रीगणेशाच्या कृपेनं आम्ही राज्यातल्या गोरगरीब, दुर्बल आणि गरजू लोकांसाठी आणखीही चांगल्या योजना आणून त्यांची अंमलबजावणी करू असेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!