आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

शालेय विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी शाळांनी गांभीर्यपूर्वक कार्यरत रहावे : जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

 

 

 

सांगली  : बदलापूर (ठाणे) येथील चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शाळांनी शालेय विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी गांभीर्यपूर्वक कार्यरत रहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज आढावा बैठकीत दिले.

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, मनपा उपायुक्त शिल्पा दरेकर, महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी संदीप यादव प्रामुख्याने उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले, शालेय समित्या त्वरीत कार्यान्वित करा. जर त्या नसतील तर त्यांची तात्काळ स्थापना करा. मुलींच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्या. त्याचबरोबर प्रत्येक स्कूल बसमध्ये सीसीटीव्ही बसवा, प्रत्येक शाळेत तक्रारपेटी बसवा. त्या तक्रारींचा आढावा प्रत्येक आठवड्यात घ्या. जर एखाद्या तक्रारीमध्ये तथ्य आढळल्यास त्यावर त्वरीत कडक कारवाई करा. मुला-मुलींची स्वतंत्र टॉयलेट व्यवस्था विरुद्ध बाजूस करावी. तसेच प्रत्येक शाळेमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात यावी. या सीसीटीव्हीचे फुटेज 30 दिवसासाठी संरक्षित करण्यात यावे. जर दुर्दैवाने एखाद्या शाळेत अत्याचारासारखा गुन्हा घडल्यास त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी / प्राचार्यांनी त्वरित गुन्हा दाखल करावा. अत्याचारासारख्या घटना घडल्यास 1098 या चाईल्ड लाईन हेल्पलाईन क्रमांकावर अथवा पोलीस विभागाच्या 112 क्रमांकावर त्वरीत संपर्क साधून तक्रार नोंदवावी. अत्याचाराच्या घटना घडूच नयेत यासाठी सर्व खाजगी / सरकारी / अनुदानित / विनाअनुदानित / मनपा शाळांनी त्वरित बैठका घ्याव्यात. त्याचबरोबर सर्व कायम शालेय तसेच अंशकालीन / हंगामी कर्मचाऱ्यांचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र शाळांनी घ्यावे, असे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यात 2792 शाळा असून त्यापैकी 627 शाळांमध्ये सीसीटिव्ही यंत्रणा कार्यान्वित आहे. उर्वरीत शाळांनी सीसीटिव्ही बसवून घ्यावेत. शुन्य महिला शिक्षक असणाऱ्या शाळांचा आढावा घेण्यात यावा. सखी सावित्री समितीची बैठक घेण्यात यावी. तसेच अंगणवाडी सेविका, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे ‘पॉस्को’ गुन्ह्याच्या अनुषंगाने प्रशिक्षित तज्ज्ञामार्फत प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात यावे. मुलांना समजेल अशा भाषेत बालसमुपदेशकामार्फत, ‘ गुड टच – बॅड टच ‘ याबाबत समुपदेशन करण्यात यावे, अशी सूचना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे यांनी केली.

तर शालेय, तालुका व जिल्हास्तरीय समित्या त्वरित स्थापन कराव्या. प्रत्येक शाळेत संस्थेत स्वतंत्र चेंजिंग रूम निर्माण करण्यात यावी. शालेय संस्थामध्ये अत्याचाराचे प्रकार घडू नये याची दक्षता शाळा / संस्था प्रमुखांनी घ्यावी. तसेच हंगामी अंशकालीन कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी तपासून घ्यावी. त्याचबरोबर पालक – शिक्षक यांची नियमित बैठक घेण्यात यावी. बाल अत्याचारासारख्या प्रकरणांमध्ये संवेदनशीलता बाळगून संबंधित दोषी विरोधात मुख्याध्यापकांनी / संस्थाचालकांनी कडक कारवाई करावी. मुला – मुलींच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने ज्या – ज्या उपाय योजना करणे शक्य असेल त्या सर्व उपाययोजना संबंधित शाळा-महाविद्यालयांनी कराव्यात. जर एखाद्या स्कूल बसचे फिटनेस सर्टिफिकेट नसेल तर आरटीओने अशा बसेस ना विद्यार्थी वाहतुकीसाठी परवानगी देऊ नये. त्याचबरोबर बसमध्ये सीसीटिव्ही बसविण्यात यावेत, असे निर्देश पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी या बैठकीत दिले.

     यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे, माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे, प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, सर्वसाधारण तहसिलदार लीना खरात, खाजगी शाळा संघटनेचे सचिव राजेंद्र नागरगोजे आदी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!