महापूर काळात प्रशासनाला सहकार्य करा, लोकांनी दक्ष रहावे : आमदार अरुण अण्णा लाड
आमदार अरुण लाड, शरद लाड यांच्याकडून, प्रशासकीय अधिकारी, विविध गावच्या ग्रामस्थांची औदुंबर येथे महापूर आढावा बैठक

औदुंबर :
कृष्णाकाठावरील नागरिकांनी पाणी दारात येण्याची वाट न पाहता सुरक्षित ठिकाणी जावे. बचाव कार्य करण्याची वेळ प्रशासनावर येऊ नये. त्यामुळे प्रशासनाला बाकीच्या व्यवस्था करण्याला मदत होईल, प्रशासकीय अधिकाऱ्यांना लोकांनी मदत करावी, असे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरूण आण्णा लाड यांनी औदुंबर येथे सांगितले.कोयना धरण परिसरात होत असणारी अतिवृष्टी आणि कृष्णा नदीची वाढती पाणी पातळी विचारात घेता निर्माण झालेल्या पुर सदृश परिस्थितीची नियोजित आढावा बैठक औदुंबर येथे आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते.
शुक्रवारी सकाळी ११ वाजता औदुंबर येथे पदवीधर मतदार संघाचे आमदार अरुण लाड यांच्या अध्यक्षतेखाली व क्रांती साखर कारखान्याचे चेअरमन शरद लाड यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन, प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत महापुर परिस्थिती आढावा बैठक आयोजित केली होती. यावेळी पुर सदृश्य परिस्थितीशी सामना करण्यासाठी नियोजन व उपायोजनाची माहिती व पुरपट्ट्यातील सर्व गावांचे सरपंच, उपसरपंच गावातील नागरिकांकडून महापुराशी सामना करत असताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यास संबंधीची चर्चा प्रशासनाशी करण्यात आली. या बैठकीसाठी कृष्णाकाठवासियांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती.
यावेळी आमदार अरुण लाड म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून कृष्णा नदी काठावरील नागरिकांचे महापूराने मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून अनेक कुटुंबाचे जनजीवन विस्कळीत होत आहे. शेतकरी, शेती,पशुधन आणि व्यावसायिक यांचे व सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते .शेतकरी व व्यावसायिक हातबल होत आहेत. ह्याची सरकारने दखल घेऊन तातडीने उपाय योजना राबवणे आवश्यक आहे. सध्या परिस्थितीत महाराष्ट्र- कर्नाटक दोन्ही सरकारने समन्वय साधून अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे. असे आमदार अरुण लाड यांनी प्रशासनाशी बोलताना सूचना केल्या.
यावेळी युवा नेते उद्योजक सतीश आंबा पाटील यांनी महापूर काळात लोकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांनी काम करावे. लोकांनीही या अधिकारी यांना सहकार्य करावे, असे सांगून पूर्वपरिस्थितीत प्रत्येकाने सुरक्षित स्थळी जाऊन काळजी घ्यावी असेही पाटील म्हणाले.
यावेळी जिल्हा व तालुका प्रशासना मधील सर्व विभागातील शासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी शरद लाड यांनी कृष्णाकाठच्या भिलवडी, अंकलखोप, माळवाडी, खटाव, ब्रम्हनाळ, सुखवाडी, चोपडेवाडी या गावांना भेटी देऊन पूर परिस्थितीची व स्थलांतरित नागरिकांची विचारपूस करत त्यांना धीर दिला व त्यांची राहण्याची व भोजन व्यवस्थेची पाहणी केली.. पलूस तहसीलदार दीप्ती रिटे, गट विकास अधिकारी अरविंद माने यांच्यासह सर्व विभागातील अधिकारी भिलवडी, पलूस, कुंडल पोलीस अधिकारी उपस्थित होते.
माजी जि.प सदस्य सुरेंद्र वाळवेकर, नितीन नवले, क्रांती कारखान्याचे संचालक शीतल बिरनाळे, विजय पाटील, सुभाष वडेर, संजय पवार, माजी संचालक उमेश जोशी, महावीर चौगुले, धन्यकुमार पाटील, श्रेणी पाटील आणि पलूस तालुक्यातील कृष्णाकाठच्या सर्व गावांचे सरपंच, उपसरपंच व अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान,
कुंडल क्रांती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद भाऊ लाड म्हणाले की, कृष्णा कोयना नदीच्या पाणलोट क्षेत्रात यावर्षी अतिवृष्टी सदृश्य पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.यावर्षी देवकृपेने असे संकट येणार नाही, अशी प्रार्थना करुया, पण तशी वेळ आलीच तर जनतेने अजिबात घाबरून जाऊ नये क्रांती कुटुंब खंबीरपणे कोणत्याही परिस्थितीत आपल्या सोबत उभे आहे. कोणत्याही गोष्टीची कमी मी तुम्हाला पडू देणार नाही.
अत्यंत धैर्याने आपण या संकटाचा सामना करू, असेही शरद भाऊ लाड यांनी सांगितले.