महाराष्ट्र

राज्य शासन महिला सबलीकरणासाठी कटिबद्ध ; पालकमंत्री चंद्रकांत पाटील

नारीशक्ती संवाद’ कार्यक्रमातील भावनिक क्षण

 

दर्पण न्यूज मिरज/सांगली : औक्षण करण्याची परंपरा बहुतेक वेळा महिलांकडूनच पार पाडली जाते. परंतु, जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा रूढ पायंडाच बदलत चक्क स्वतः विद्यार्थिनींचे औक्षण करून त्यांचा सन्मान केला. या हृदयस्पर्शी क्षणामुळे उपस्थितांच्या मनात आदर आणि भावनांचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. निमित्त होते लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे तंत्रनिकेतन, सांगली व शासकीय तंत्रनिकेतन, मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या नारीशक्ती संवाद कार्यक्रमाचे. राज्य शासन महिला सबलीकरणासाठी कटिबद्ध आहे, हे सांगताना त्याची प्रचिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या या छोट्याशा कृतीतून दिसून आली.

यावेळी पालकमंत्री यांच्या सुविद्य पत्नी अंजली पाटील, लठ्ठे एज्युकेशन संस्थेचे गव्हर्निंग कौन्सिलचे राजीव पाटील, अध्यक्ष शांतिनाथ कांते, उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विश्वस्त समितीचे अध्यक्ष वास्तुविशारद प्रमोद चौगुले, मानद सचिव सुहास पाटील, खजिनदार भालचंद्र पाटील, शासकीय तंत्रनिकेतन, मिरजचे प्राचार्य डॉ. संजय परदेशी, लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे तंत्रनिकेतनचे प्रभारी प्राचार्य अण्णासाहेब गाजी, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मुलींशी संवाद साधायचा, या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याच संकल्पनेतून हा कार्यक्रम आकारास आला. यावेळी विद्यार्थिनींशी संवाद साधताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वडीलकीच्या नात्याने त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. छोट्या-छोट्या उदाहरणांमधून त्यांनी शिक्षण, आत्मविश्वास आणि स्वावलंबनाचे महत्त्व सांगत मुलींना मोठी स्वप्ने पाहण्याचे आवाहन केले.

महिलांचे औक्षण करण्याचा नवीन पायंडा आपण सुरू केला असल्याचे अभिमानाने सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र शासनाने महिला व विशेषतः विद्यार्थिनींच्या सक्षमीकरणासाठी तसेच, त्यांच्या उच्च शिक्षणातील सहभाग वाढवण्यासाठी सुरू केलेल्या महत्त्वपूर्ण योजनांची माहिती सांगितली.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, महिला सबलीकरणासाठी राज्य शासन सदैव कटिबद्ध असून, मुलींना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी विविध शासकीय योजना सुरू करण्यात आल्या आहेत. शासनाच्या ऐतिहासिक निर्णयानुसार महाविद्यालये/तंत्रनिकेतनांमध्ये सुरू असलेल्या निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या मागास, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तसेच सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग विद्यार्थिनींसाठी “राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये पूर्वी देण्यात येणारी ५० टक्के सवलत वाढवून आता १०० टक्के शुल्क माफी करण्यात आलेली आहे. एससी, एसटी, व्हीजेएनटी प्रवर्गासाठी हा लाभ पूर्वीपासूनच लागू आहे. या योजनेतून सन 2024-25 मध्ये ईबीसी, अल्पसंख्याक, आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग व एसईबीसी प्रवर्गातील शासकीय तंत्रनिकेतन मिरज अंतर्गत 231 व लठ्ठे एज्युकेशन सोसायटी, सांगली अंतर्गत 671 अर्ज मंजूर करण्यात आले असून 2 कोटी दहा लाख रूपयांहून अधिक रक्कम वितरीत करण्यात आली आहे. तर एससी, एसटी, व्हीजेएनटी, विशेष मागास प्रवर्गातील वरील दोन्ही संस्थातील जवळपास 600 अर्ज मंजूर करण्यात आले असून, 1 लाख 71 हजार रूपये रक्कम वितरीत करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, उच्च व व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या तसेच घरापासून दूर राहणाऱ्या विद्यार्थिनींच्या निवास व भोजनाचा प्रश्न सोडविण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना उपयुक्त ठरत आहे. या योजनेतून जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दहा महिन्यांसाठी 43 हजार रूपये दिले जातात. या योजनेतून सन 2024-25 मध्ये शासकीय तंत्रनिकेतन, मिरजमधील 188 व लठ्ठे एज्युकेशन सोसायटी, सांगलीचे 264 अर्ज मंजूर करण्यात आले असून, एकूण जवळपास दीड कोटी रक्कम वितरीत करण्यात आली आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, मोफत उच्च शिक्षणाबरोबरच इतर शुल्कही मोफत करण्याबाबत विचार सुरू असून, मुलींसाठी कमवा व शिका योजनेतून महिन्याला 2 हजार रूपये मिळतील, यासाठी तजबीज करण्यात येत आहे. राज्य शासनाने आपल्या नावामध्ये आईच्या नावाचाही समावेश करण्याबाबतचा निर्णय घेतला. सात बारावर महिलेचे नाव, जन्मदाखल्यावर आईचे नाव अशा उपक्रमांतून स्त्री पुरूष समानतेची बीजे रोवली जातील व हा संस्कार पुढील पिढीवर कोरला जाईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी मनोगत व्यक्त केलेल्या विद्यार्थिंनींचे प्रातिनिधीक औक्षण स्वतः पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. तसेच, त्यांना मिठाई भेट दिली. या अनोख्या कृतीमुळे उपस्थितांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. ही कृती केवळ प्रतीकात्मक नसून महिलांच्या सन्मानाचा आणि त्यांच्या सामर्थ्याचा भावनिक स्वीकार असल्याची भावना यावेळी व्यक्त झाली.

 मुलींसाठी संपूर्ण शैक्षणिक फी माफ केल्यामुळे गरीब कुटुंबातील मुली शिक्षणाच्या प्रवाहात आल्या. आमची फी माफी झाल्यामुळे आम्हाला उच्च शिक्षणाची संधी मिळाली. पालकांवरचा आर्थिक भार कमी झाला.  आज आम्ही शैक्षणिक भरारी घेऊ शकतो. आम्हाला मोठी स्वप्ने पाहण्याचे बळ मिळाले, अशा भावना मांडताना यावेळी विद्यार्थिनींनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे ऋणनिर्देश व्यक्त केले.

प्रास्ताविकात प्रभारी प्राचार्य अण्णासाहेब गाजी यांनी संस्थेचे हे अमृतमहोत्सवी वर्ष असल्याचे सांगून विविध उपक्रमांचा आढावा घेतला. आभार डॉ. मगर यांनी मानले.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!