महाराष्ट्रसामाजिक

सांगली जि. प. महिला व बाल कल्याण विभागातर्फे महिला मेळावा, पुरस्कार वितरण

 

दर्पण न्यूज मिरज/सांगली : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागातर्फे विविध उपक्रम राबवण्यात आले. यानिमित्त सोमवारी सकाळी आयोजित महिला मेळाव्यामध्ये नवनिर्वाचित महिला जिल्हा परिषद सदस्यांचा सत्कार, सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजनात्मक खेळ यासह महिलांना आरोग्य विषयक व कायदे विषयक माहिती देण्यात आली. तसेच महिलांसाठी “ओ- वुमनिया” हा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच, दुपारी जिल्ह्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत उत्कृष्ट काम केलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षिका यांना पुरस्कार वितरण करण्यात आले.

डेक्कन मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशन हॉल येथे आयोजित महिला मेळाव्याचे उद्घाटन प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर यांच्या हस्ते व अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुनंदा ठवळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) प्रमोद काळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला बाल कल्याण) सोमनाथ रसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

महिला मेळाव्याच्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील नवनिर्वाचित महिला जिल्हा परिषद सदस्या मीना पाटील (कवठेपिरान ता. मिरज), कविता पाटील (संख ता. जत), शिल्पा जीवणावर (बिळूर ता. जत), कांता वाटेगावकर (बोरगांव ता. वाळवा), शीला मोहिते (पणुंब्रे तर्फ ता.शिराळा), शोभा वसंत खोत (आरग ता. मिरज), अस्मिता होनमोरे (बेडग ता. मिरज), मंजुश्री कांबळे (कवलापूर ता.मिरज) यांचा सत्कार करण्यात आला. या महिला मेळाव्यास सर्व जिल्हा परिषद अधिकारी, महिला कर्मचारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, महिला व मुली उपस्थित होत्या.

महिला मेळाव्यामध्ये महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले. खेळांदरम्यान विजेत्या ठरलेल्या पहिल्या 10 महिलांना बक्षिसे देण्यात आली.

तसेच दुपारी झालेल्या अन्य एका कार्यक्रमात सांगली जिल्ह्यातील 13 प्रकल्पातील प्रत्येक प्रकल्पातून एक अशा एकूण 13 अंगणवाडी सेविका, 13 मदतनीस व जिल्ह्यातून प्रथम तीन क्रमांकाच्या तीन पर्यवेक्षिका यांना आदर्श पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर यांनी मार्गदर्शन केले. दुर्गम भागात काम करत असतानाही या महिलांनी केलेले काम उल्लेखनीय असून अशा आदर्श सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका यांच्या कामामुळे सांगली जिल्ह्यात कुपोषण कमी होण्यास मदत झाली आहे, इतर कर्मचारी यांनी या पुरस्कारार्थींकडून प्रेरणा घेवून सांगली जिल्ह्यास राज्यात अव्वल स्थानावर घेवून जावे, असे त्या म्हणाल्या. अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांनी सर्व पुरस्कारार्थींना शुभेच्छा दिल्या.

प्रास्ताविक सोमनाथ रसाळ यांनी केले. या वर्षी पुरस्कारार्थींच्या पुरस्कार रक्कम वाढ करण्यात आली असून ती प्रत्येक सेविका यांना दहा हजार रुपये व प्रति मदतनीस यांना साडेसात हजार रूपये अशी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पुरस्कारार्थींना सन्मानचिन्ह व शाल तसेच बँक खात्यावर रोख रक्कम अशा स्वरुपात सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे सर्व खातेप्रमुख, कर्मचारी, बाल विकास प्रकल्प् अधिकारी, तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस उपस्थित होत्या.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!