ताज्या घडामोडी

श्री. गुरु तेग बहादुर साहेबजी : धर्मस्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे महान गुरु

 

 

        भारताच्या इतिहासात अनेक संत, महात्मे आणि क्रांतिकारकांनी आपल्या विचारांनी व कार्यांनी समाजाला नवी दिशा दिली. त्यापैकी शीख धर्माचे नववे गुरु गुरु तेग बहादुर यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. त्यांनी धर्मस्वातंत्र्य, मानवता आणि सहिष्णुतेसाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. म्हणूनच त्यांना हिंद दी चादर  (हिंदुस्थानचे रक्षण करणारी ढाल) असेही संबोधले जाते. त्यांचे जीवनकार्य हे केवळ शीख समाजापुरते मर्यादित नसून संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी आहे.

 

जन्म आणि बालपण

        गुरु तेग बहादुर यांचा जन्म १ एप्रिल १६२१ रोजी अमृतसर येथे झाला. त्यांचे वडील गुरु हरगोबिंद हे शीख धर्माचे सहावे गुरु होते. बालपणी त्यांचे नाव त्यागमल असे होते. लहान वयातच त्यांनी शौर्य, संयम आणि आध्यात्मिकतेची चिन्हे दाखवली. वडिलांकडून त्यांनी शस्त्रविद्या आणि धर्मज्ञान यांचे शिक्षण घेतले.

एकदा मुघल सैन्याविरुद्ध झालेल्या युद्धात त्यांनी पराक्रम गाजवला. त्यांच्या शौर्यामुळे त्यांना तेग बहादुर  (तेग म्हणजे तलवार, बहादुर म्हणजे शूर) हे नाव देण्यात आले. पुढे ते याच नावाने ओळखले जाऊ लागले.

आध्यात्मिक साधना आणि समाजकार्य

गुरु तेग बहादुर यांनी आयुष्यातील अनेक वर्षे ध्यान, साधना आणि समाजसेवेसाठी अर्पण केली. त्यांनी पंजाब, बिहार, आसाम आणि बंगाल अशा विविध प्रदेशांत प्रवास करून लोकांना सत्य, प्रेम आणि सहिष्णुतेचा संदेश दिला. त्यांनी अंधश्रद्धा, अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला.

त्यांच्या शिकवणीत नम्रता, संयम, परोपकार आणि ईश्वरभक्ती यांना विशेष महत्त्व होते. त्यांनी लोकांना सांगितले की खरा धर्म हा मानवतेची सेवा करण्यात आहे. त्यांचे अनेक विचार गुरु ग्रंथ साहिब मध्ये समाविष्ट आहेत. त्यांच्या रचनांमध्ये वैराग्य, निडरता आणि आत्मबल यांचे सुंदर वर्णन आढळते.

आनंदपूर साहिबची स्थापना

गुरु तेग बहादुर यांनी पंजाबमध्ये आनंदपूर साहिब या शहराची स्थापना केली. हे ठिकाण पुढे शीख धर्माचे एक महत्त्वाचे केंद्र बनले. येथे त्यांनी धर्मप्रसार आणि समाजरचना यांचे कार्य केले. आनंदपूर साहिब आजही शीख समुदायासाठी अत्यंत पवित्र स्थान मानले जाते.

मुघल काळ आणि धार्मिक अत्याचार

त्या काळात भारतावर मुघलाचे याचे राज्य होते. त्यांच्या कारकीर्दीत धार्मिक असहिष्णुता वाढली होती. जबरदस्तीने धर्मांतर घडवून आणण्याचे प्रकार सुरू होते. विशेषतः काश्मीरमधील हिंदूंवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार होत होते.

काश्मिरी पंडितांनी या अन्यायाविरुद्ध मदतीसाठी गुरु तेग बहादुर यांच्याकडे धाव घेतली. त्यांनी त्यांना संरक्षण देण्याचे आश्वासन दिले. गुरुजींनी स्पष्ट सांगितले की जर त्यांना इस्लाम स्वीकारायला भाग पाडले जात असेल, तर आधी मला धर्मांतर करावे लागेल. त्यांच्या या ठाम भूमिकेमुळे ते मुघलांच्या रोषाला सामोरे गेले.

 

बलिदान

गुरु तेग बहादुर यांना अटक करून दिल्ली येथे आणण्यात आले. त्यांच्यावर इस्लाम स्वीकारण्याचा दबाव टाकण्यात आला; परंतु त्यांनी धर्मांतरास नकार दिला. शेवटी ११ नोव्हेंबर १६७५ रोजी त्यांची हत्या करण्यात आली.

त्यांचे बलिदान मानवतेच्या इतिहासातील एक महान घटना मानली जाते. त्यांनी स्वतःच्या धर्मासाठी नव्हे, तर इतरांच्या धर्मस्वातंत्र्यासाठी प्राण दिले. त्यामुळे त्यांना “हिंद की चादर” ही उपाधी मिळाली.

ज्या ठिकाणी त्यांचे शिर छाटण्यात आले, त्या ठिकाणी आज गुरुद्वारा शीश गंज साहिब उभा आहे. हे स्थान त्यांच्या बलिदानाची साक्ष देत आजही लाखो भाविकांना प्रेरणा देते.

 

गुरु गोविंदसिंहांवर प्रभाव

गुरु तेग बहादुर यांचे सुपुत्र गुरु गोविंदसिंह पुढे शीख धर्माचे दहावे गुरु झाले. वडिलांच्या बलिदानाचा त्यांच्यावर खोल परिणाम झाला. पुढे त्यांनी खालसा पंथाची स्थापना करून शीख धर्म अधिक संघटित व बळकट केला. गुरु तेग बहादुर यांच्या शिकवणीमुळेच शीख समाजात निडरता आणि त्यागभाव दृढ झाला.

 

शिकवण आणि विचार

गुरु तेग बहादुर यांच्या शिकवणीचा मुख्य गाभा म्हणजे —

सत्याचा मार्ग कधीही सोडू नका.

अन्यायाविरुद्ध ठाम उभे रहा.

सर्व धर्मांचा आदर करा.

ईश्वरभक्ती आणि मानवसेवा यांचा संगम साधा.

त्यांच्या रचनांमध्ये जीवनाचे क्षणभंगुर स्वरूप आणि आत्मिक शांतीचा संदेश आहे. त्यांनी माणसाला भयमुक्त आणि आत्मनिर्भर बनण्याचा उपदेश केला.

गुरु तेग बहादुर यांचे जीवन हे त्याग, शौर्य आणि मानवतेचे प्रतीक आहे. त्यांनी धर्मस्वातंत्र्याच्या रक्षणासाठी स्वतःचा बळी दिला, परंतु आपल्या तत्त्वांशी कधीही तडजोड केली नाही. त्यांचे कार्य आणि बलिदान भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे.

        आजच्या काळातही श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या विचारांची गरज अधिक आहे. धार्मिक सहिष्णुता, परस्पर आदर आणि मानवतेची भावना जपणे हीच त्यांच्या प्रति खरी श्रद्धांजली ठरेल. श्री गुरु तेग बहादुर यांचे जीवन आपल्याला शिकवते की सत्य आणि न्यायासाठी लढताना कितीही संकटे आली तरी धैर्य सोडू नये.

त्यांचे बलिदान हे केवळ एका धर्माचे नव्हे, तर संपूर्ण मानवजातीच्या स्वातंत्र्याचे प्रतिक आहे. म्हणूनच ते भारतीय इतिहासातील एक अजरामर आणि तेजस्वी व्यक्तिमत्त्व म्हणून सदैव स्मरणात राहतील.

श्री गुरु तेग बहादुर साहेबजी यांचा त्याग, त्यांची अध्यात्मिक साधना आणि समाज कार्य, बलिदान, शिकवण आणि विचार समाजात रुजावेत यासाठी त्यांच्या ३५० व्या शहीदी समागमाचे आयोजन प्रथम नागपूरला नंतर नांदेड येथे झाले. आता  दि. 28 फेब्रुवारी व 1 मार्चला नवी मुंबई येथील ओवे मैदान, सेक्टर २९, खारघर येथे होत आहे. या समागमामध्ये देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रिय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री महोदय, महनिय व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. आपणही या शहीदी समागमामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

                                                        -रणजित पवार,

                                                         उपसंपादक,

                                                         विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!