महाराष्ट्रराजकीयसामाजिक

कोल्हापूर जिल्ह्यात ‘मोफत सर्व शस्त्रक्रिया अभियान’ व HPV लसीकरण मोहिमेचा गारगोटी येथे शुभारंभ

 

दर्पण न्यूज कोल्हापूर/गारगोटी  : महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर जिल्ह्यात ‘मोफत सर्व शस्त्रक्रिया अभियान’ आणि ‘जिल्हास्तरीय HPV लसीकरण मोहिमेचा’ आज उपजिल्हा रुग्णालय, गारगोटी येथे उत्साहात शुभारंभ करण्यात आला. सार्वजनिक आरोग्य विभाग, कोल्हापूर आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत असून ग्रामीण भागातील रुग्णांना मोफत व तज्ज्ञ आरोग्यसेवा देण्याचा उद्देश यामागे आहे.

या अभियानांतर्गत CSR उपक्रमाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील पाच शासकीय रुग्णालयांमध्ये दि. ९ ते १४ मार्च २०२६ या कालावधीत विविध गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत. रोटरी क्लबच्या माध्यमातून मुंबई, पुणे आणि कोल्हापूर येथील सुमारे २० नामवंत तज्ज्ञ डॉक्टर या शिबिरात सेवा देत असून किमान एक हजार रुग्णांवर उपचार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या अभियानामध्ये स्त्रीरोग, नेत्ररोगातील मोतीबिंदू व काचबिंदू, बालरोग, कान-नाक-घसा आजार, थायरॉईड, मूत्ररोगातील प्रोस्टेट, ऑर्थोपेडिकमधील सांधे रोपण, प्लास्टिक सर्जरी, हर्निया, अपेंडिक्स तसेच पित्ताशयाच्या शस्त्रक्रिया यांसह विविध सामान्य व विशेष शस्त्रक्रियांचा समावेश आहे.

कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य रोहिणी आबिटकर यांनी ग्रामीण भागातील महिलांचे आरोग्य जपणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगत या शिबिराचा लाभ घ्यावा तसेच १४ ते १५ वयोगटातील मुलींनी गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरपासून संरक्षणासाठी HPV लस आवर्जून घ्यावी, असे आवाहन केले. जिल्हा परिषद सदस्या रेश्मा देसाई यांनीही सुदृढ व निरोगी पिढी घडविण्यासाठी मुलींचे लसीकरण अत्यंत आवश्यक असल्याचे नमूद केले.

रोटरी क्लबच्या प्रतिनिधींनी पोलिओ निर्मूलनाप्रमाणेच या शस्त्रक्रिया मोहिमेसाठीही रोटरी क्लबने पुढाकार घेतल्याचे सांगत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. दिलीप माने यांनी आज पहिल्याच दिवशी ९८ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती देत HPV लस पूर्णतः सुरक्षित असून गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरपासून बचावासाठी उपयुक्त असल्याचे सांगितले. या लसीचे कोणतेही दुष्परिणाम नसल्याने पालकांनी आपल्या मुलींचे लसीकरण करून घ्यावे, असेही त्यांनी आवाहन केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!