ताज्या घडामोडी

नांदेडमधील भव्य कार्यक्रम ‘हिंद दी चादर’ यशस्वी करावा : मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव डॉ.  श्रीकर परदेशी

 

         दर्पण न्यूज  मुंबई — ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५०व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे होणाऱ्या भव्य कार्यक्रमाचे सर्वांगीण व काटेकोर नियोजन करण्यात यावे. देशासह आंतरराष्ट्रीय स्तरावरून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार असून, त्यांच्या सुरक्षा, वाहतूक, वैद्यकीय सेवा व मूलभूत सोयी-सुविधांबाबत सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री  यांचे प्रधान सचिव डॉ.  श्रीकर परदेशी यांनी दिल्या.

नांदेड येथे २४ व २५ जानेवारी रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या या भव्य कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

बैठकीस अल्पसंख्याक विकास विभागाचे सचिव रूचेश जयवंशी,  राज्य समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. तर दूरदृश्य प्रणालीव्दारे छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव, जळगाव, धुळे, नंदूरबार जिल्हयाचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालीका आयुक्त, शिक्षण, परिवहन, अल्पसंख्याक विभागाचे वरिष्ठ अधिकारी व जिल्हा माहिती अधिकारी उपस्थित होते.

श्रीकर परदेशी म्हणाले की, या शहीदी समागम वर्षानिमित्त राज्य, देश तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरून श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांना मानणारे लाखो भाविक नांदेडमध्ये येणार आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शीख, सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मिकी, भगत नामदेव व उदासीन असे नऊ समाज-संप्रदाय एकत्र येणार आहेत.

श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या त्याग, बलिदान व मानवतेसाठी दिलेल्या शहीदीचा इतिहास देश-विदेशात पोहोचवणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी २६ विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. सुमारे १० लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन चोख सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता, वाहतूक नियोजन, निवास व्यवस्था, स्वच्छ पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा आदी मूलभूत सुविधा पुरविण्याच्या सूचना देण्यात आल्या.

युवकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यासाठी शाळा व महाविद्यालयांमध्ये निबंध व वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच भाविकांच्या सोयीसाठी https://gurutegbahadurshahidi.com या संकेतस्थळावर रस्ते, रेल्वे, बस, वाहतूक व्यवस्था तसेच कार्यक्रमासंदर्भातील सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय समितीच्या समन्वयाने सर्व यंत्रणांनी आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी सचिव रुचेश जयवंशी यांनी सांगितले की, मराठवाडा विभागातील सर्व जिल्हे, महानगरपालिका, शाळा-महाविद्यालये, पोलीस यंत्रणा व परिवहन विभागाने समन्वयाने काम करत भाविकांना सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात तसेच सुरक्षेच्या दृष्टीने काटेकोर कार्यवाही करावी.

रामेश्वर नाईक म्हणाले की, श्री गुरु तेग बहादुर यांनी राष्ट्र व संस्कृतीच्या रक्षणासाठी दिलेले बलिदान सर्वसामान्य जनतेपर्यंत, विशेषतः गावपातळीवर विविध उपक्रमांच्या माध्यमातून पोहोचविण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वोत्तम संस्था आणि विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. असेही त्यांनी सांगितले.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!