बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे परिपत्रक ; श्रमिक बांधकाम कामगारांवर अन्याय ; वंचितचे संजय कांबळे

दर्पण न्यूज सांगली | प्रतिनिधी :-
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई यांच्याकडून दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी, मंडळाचे सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक कुंभार यांनी निर्गमित करण्यात आलेले परिपत्रक म्हणजे श्रमिक बांधकाम कामगारांच्या पोटावर लाथ मारणारा, त्यांच्या मुलांचे शिक्षण उद्ध्वस्त करणारा आणि थेट भारतीय संविधानावर घाला घालणारा काळा निर्णय असल्याची घणाघाती टीका वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे सांगली जिल्हा संपर्कप्रमुख संजय भूपाल कांबळे यांनी केले आहे.
राज्यभरातील तसेच देशभरातील बांधकाम कामगार हे प्रामुख्याने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागासवर्गीय घटकातील असून हे कामगार स्थलांतरित, रोजंदारीवर काम करणारे आणि झोपडपट्ट्यांत हालअपेष्टांत जीवन जगणारे आहेत. अशा कामगारांच्या मुलांसाठी शिक्षण हाच एकमेव आशेचा किरण असताना, त्यावरच निर्बंध घालण्याचा हा निर्णय म्हणजे कामगारविरोधी मानसिकतेचा कळस आहे.
भारतीय संविधानातील कलम २१-अ, १५(४), १५(५) व ४६ ही केवळ पुस्तकी कलमे नसून, ती बहुजन समाजाच्या उन्नतीची हमी आहेत. मात्र, या परिपत्रकाच्या माध्यमातून श्रमिकांच्या मुलांना शिक्षणापासून दूर ठेवण्याचा सुनियोजित डाव रचण्यात आला असून, हा निर्णय म्हणजे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक न्यायाच्या विचारांची उघडपणे अडवणूक आहे.
विशेष म्हणजे, मंडळ स्थापनेपासून १२ डिसेंबर २०२५ पर्यंत अशा प्रकारचा कोणताही निर्बंध कधीही अस्तित्वात नव्हता. मग अचानक हा अधिकार कोणाच्या सांगण्यावरून, कोणाच्या फायद्यासाठी आणि कोणाच्या दबावाखाली वापरण्यात आला? हा प्रश्न आज संपूर्ण महाराष्ट्रातील कामगार विचारत आहेत.
अत्यंत गंभीर बाब म्हणजे, कामगारांकडून आकारण्यात येणाऱ्या १% सेसचा निधी हा शासनाचा नसून पूर्णतः कामगारांचा हक्काचा निधी आहे. मात्र, त्याच निधीतून कामगार व मालक प्रतिनिधींचा सहभाग डावलून खासगी कंपन्यांना टेंडर देणे, तथाकथित “सामाजिक उपक्रमां”च्या नावाखाली कोट्यवधींचा अपव्यय केल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी पैसा नाही, पण खाजगी कंपन्यांसाठी कोट्यवधी खुले? हा सरळसरळ विश्वासघात आहे.
वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या वतीने स्पष्ट शब्दांत इशारा देण्यात येतो की,
हे परिपत्रक म्हणजे शब्दांचा खेळ करून श्रमिकांना फसवण्याचा आणि त्यांच्या मुलांचे भविष्य अंधारात ढकलण्याचा सुनियोजित कट आहे.
आदरणीय ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल युनियनच्या ठाम मागण्या,
1️⃣ दिनांक ०१/०१/२०२६ रोजी काढलेले परिपत्रक तात्काळ रद्द करण्यात यावे.
2️⃣ बांधकाम कामगारांच्या मुलांना पूर्वीप्रमाणे अखंड शैक्षणिक आर्थिक सहाय्य देण्यात यावे.
3️⃣ मंडळाचा निधी फक्त कायद्यानुसार कल्याणकारी योजनांसाठीच वापरण्यात यावा.
4️⃣ आतापर्यंत झालेल्या निधीच्या वापराची एसआयटीमार्फत उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
अन्यथा, श्रमिक कष्टकरी बांधकाम कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन, सांगली यांच्या वतीने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने तीव्र व निर्णायक आंदोलन छेडण्यात येईल, असा सणसणीत इशारा देण्यात आला आहे.
यावेळी,
प्रशांत वाघमारे – पश्चिम महाराष्ट्र महासचिव
संजय भूपाल कांबळे – जिल्हा संपर्कप्रमुख
संजय संपत कांबळे – जिल्हाध्यक्ष
जगदिश कांबळे – जिल्हा कार्याध्यक्ष
अनिल मोरे – जिल्हा महासचिव
किशोर आढाव – जिल्हा उपाध्यक्ष
वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि सदस्य तसेच श्रमिक कष्टकरी बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.



