कोल्हापूरच्या दिव्या पाटील ने राष्ट्रीय ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेत चमकदार कामगिरी करत चतुर्थ स्थान मिळविले

दर्पण न्यूज कोल्हापूर : अनिल पाटील
व्शहेव इंटरनॅशनल स्कूल, जमशेदपुर येथे नुकत्याच पार पडलेल्या 39 व्या राष्ट्रीय ज्युनिअर मुलींच्या अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरच्या दिव्या पाटील ने चमकदार कामगिरी करत अकरा पैकी आठ गुण मिळवून चौथे स्थान पटकाविले.तिला रोख 48 हजार रुपये व चषक देऊन गौरवण्यात आले.अंतिम अकराव्या फेरीत कर्नाटकच्या प्रतिती कडून पराभूत होऊनही दिव्याने सन्मानजनक चौथे स्थान मिळविले. स्विस लीग पद्धतीने एकूण अकरा फेऱ्यात झालेल्या या स्पर्धा क्लासिकल बुद्धिबळ प्रकाराने झाल्या..जवळजवळ आठवडाभर चाललेले या स्पर्धेत देशातील निवडक नामांकित 125 मुली सहभागी झाल्या होत्या. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या दिव्या पाटील ला सुरुवातीला 40 वे मानांकन मिळाले होते.सुरुवातीच्या दोन फेऱ्या जिंकल्यानंतर दिव्याला तिसऱ्या फेरीत तमिळनाडूच्या निवेदिता कडून हार मानावी लागली होती.चौथ्या पाचव्या फेरीत पुन्हा विजय होत दिव्याने आघाडी घेतली व सहाव्या फेरीत महाराष्ट्राच्या अनुष्का कुतवल बरोबर बरोबरी साधली.त्यानंतर सातव्या फेरीत आक्रमक खेळ करत दिव्याने अग्रमानांकित फिडे मास्टर उत्तराखंडच्या शेरली पटनाईक ला पराभवाची धूळ चालत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आठव्या फेरीत तेलंगणाच्या नरहरी गीथिका व नवव्या फेरीत आंध्रप्रदेशच्या सव्याश्री चा पराभव करून दिव्याने आघाडी घेतली.दहाव्या फेरीत पहिल्या पटावर खेळताना द्वितीय मानांकित व या स्पर्धेतील विजेते शुभी गुप्ता ला बरोबरीत रोखले.परंतु अंतिम अकराव्या व्या फेरीत सहावी मानांकित कर्नाटकची प्रतिती बोर्डोलोई कडून दिव्याचा पराभव झाल्यामुळे दिव्याला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले… दिव्याची जुळी बहीण दिशा पाटील चे स्पर्धेत साठावे मानांकन होते.तिला अंतिम अकरावी फेरीनंतर सात गुणासह 25 वे स्थान मिळाले.दोघींनी अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली.दिव्याचे या स्पर्धेमध्ये 153.6 आंतरराष्ट्रीय गुणाची वाढ झाली आहे तर दिशाचे 77 गुण वाढले आहेत दिव्या व दिशा जयसिंगपूर येथील जयप्रभा इंग्लिश मेडियम ज्युनिअर कॉलेज मध्ये इयत्ता अकरावीत शिकत आहेत. कॉलेजच्या प्राचार्या सौ स्मिता पाटील व क्रीडा शिक्षक राहुल सरडे चेस असोसिएशन कोल्हापूरचे अध्यक्ष व आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, सचिव व फिडे इन्स्ट्रक्टर मनिष मारुलकर, दिव्याचे आई-वडील कविता व शरद पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले तर बुद्धिबळ प्रशिक्षक इचलकरंजीचे रोहित पोळ, कोल्हापूरचे उत्कर्ष लोमटे व सोलापूरचे सुमुख गायकवाड यांचे विशेष बुद्धिबळ प्रशिक्षण दिव्या व दिशाला आजपर्यंत लाभले आहे.



