श्रीराम, प्रथमेश, विवान अनिकेत,श्रीराज, सोहम, हित,ओम व प्रणव आघाडीवर : भाऊसाहेब देशपांडे ( कोङणीकर) स्मृती भव्य खुल्या आंतरराष्ट्रीय गुणांकन जलद बुद्धिबळ स्पर्धा

दर्पण न्यूज कोल्हापूर : अनिल पाटील
चेस जागतिक बुद्धिबळ संघटना, अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना व चेस असोसिएशन कोल्हापूर यांच्या मान्यतेने विझार्ड चेस क्लब ने आयोजित केलेल्या तृतीय भाऊसाहेब गणेश देशपांडे (कोडणीकर) स्मृती खुल्या भव्य आंतरराष्ट्रीय गुणांकन जलद बुद्धिबळ स्पर्धा आज इंद्रप्रस्थ सांस्कृतिक भवन, राजारामपुरी कोल्हापूर येथे मोठ्या उत्साहात प्रारंभ झाल्या.
एक लाख पन्नास हजार रुपये ची एकूण रोख बक्षिसासह 116 चषक अशी एकूण 141 बक्षीसे असलेली आजपर्यंतची सर्वात मोठ्या रोख रकमेची आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धा कोल्हापुरात होत आहे. दिल्ली, मुंबई, ठाणे, बेळगाव,पुणे,गदग, गोवा, भंडारा, धुळे, सोलापूर, सातारा, रत्नागिरी, चिपळूण, सिंधुदुर्ग, सांगली व स्थानिक जयसिंगपूर, इचलकरंजी, वारणानगर, गडहिंग्लज, कागल, गारगोटी व कोल्हापूर येथील नामवंत जवळजवळ 305 बुद्धिबळपटू नी या स्पर्धेत विक्रमी सहभाग नोंदवला आहे. यापैकी 147 बुद्धिबळपटू आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त आहेत. यामध्ये प्रामुख्याने अग्रमानांकित आयुर्विमा महामंडळ दिल्लीचा ग्रँड मास्टर श्रीराम झा, आंतरराष्ट्रीय मास्तर निखिल दीक्षित (पुणे), आंतरराष्ट्रीय मास्टर सम्मेद शेटे (कोल्हापूर), फिडे मास्टर सोहम दातार (पुणे), कॅंडिडेट मास्टर प्रथमेश शेर्ला (पुणे) यांचा समावेश आहे.
प्रसिद्ध स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ डाँ. सतीश पत्की, व माजी स्थायी समिती सभापती कोल्हापूर मनपा व कोल्हापूर हॉकी भूषण विजय साळोखे (सरदार) यांच्या हस्ते दिपप्रज्वलन केल्यावर बुद्धिबळाच्या पटावर चाल करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर ग्रँडमास्टर श्रीराम झा, श्रीपाद वैद्य, उद्योजक अमोल देशपांडे,धीरज वैद्य,सुरज वैद्य, प्रशांत गांधी,आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, या स्पर्धेचे मुख्य पंच आंतरराष्ट्रीय पंच पौर्णिमा उपळाविकर, आंतरराष्ट्रीय मास्टर सम्मेद शेटे, कॅंडिडेट मास्टर अनिश गांधी,फिडे इन्स्ट्रक्टर मनीष मारुलकर उपस्थित होते. विजय माने यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन केले.
या स्पर्धा स्विस लीग पद्धतीने जलद बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार एकूण नऊ फेऱ्यात होणार आहेत.
आज झालेल्या स्पर्धेच्या पाचव्या फेरीनंतर अग्रमानांकित आयुर्विमा महामंडळ दिल्लीचा श्रीराम झा, चौथा मनांकित पुण्याचा प्रथमेश शेर्ला , आठवा मानांकितत कोल्हापूरचा श्रीराज भोसले, नववा मानांकित पुण्याचा ओम लमकाने, अकरावा मानांकित सातारचा अनिकेत बापट , यांच्यासह विवान सोनी इचलकरंजी,सोहम खासबारदार कोल्हापूर, हित बलदवा जयसिंगपूर व प्रणव पाटील कोल्हापूर हे नऊ जण पाच गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहेत.*या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे पहिल्या सहापटावर इलेक्ट्रॉनिक्स चेस पटाचा वापर करण्यात आला असुन त्याचे थेट आनलाईन प्रक्षेपण करण्यात आले आहे. त्याचबरोबर पालक व प्रेक्षकांना एलईडी स्क्रीनवर प्रक्षेपण पाहण्याची सोय करण्यात आली आहे. सर्व खेळाडू व पालकांना चहा व दुपारच्या जेवणाची सोय मोफत केली आहे.



