महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा जावई शोध…७० टक्के निकाल असणाऱ्या एन एम एम एस परीक्षा केंद्रांना संवेदनशील केंद्र म्हणून घोषणा

कोल्हापूर : अनिल पाटील
कोल्हापूर जिल्ह्यातील एन एम एम एस परीक्षेमध्ये
ज्या परीक्षा केंद्राचा निकाल ७०% पेक्षा अधिक लागला आहे. ती केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आल्याचा फतवा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ नंदकुमार बेडसे यांनी काढला असल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.परिषदेच्या या अजब फतव्याने शिष्यवृत्तीमध्ये राज्यात अग्रेसर असणाऱ्या राधानगरी व भुदरगड तालुक्यातील प्रत्येकी चार चार केंद्रांचा समावेश असल्याने वर्षभर जिद्दीने परिश्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या प्रामाणिक प्रयत्नावर अविश्वास दाखवला असल्याचे बोलले जात आहे.
रविवारी दि.२८ रोजी एन एम एम एस ही राष्ट्रीय शिष्यवृत्तीची अंतिम परीक्षा होत आहे.परीक्षा परिषदेने केंद्र संचालक आणि मुख्याध्यापक यांच्या साठी घेण्यात आलेल्या झुम मिटींगमध्ये असाही फतवा काढला आहे की,या परीक्षेसाठी पर्यवेक्षकांना इन कॅमेरा पर्यवेक्षण करावे लागणार आहे.तसेच पहिल्या व दुसऱ्या पेपरला एकच पर्यवेक्षक असावेत.या सर्व बाबींचा विचार करता मा.आयुक्तांना खेड्यातील विद्यार्थ्यांनी केलेली मेहनत, सततचा अभ्यास, आई – वडिलांनी केलेले कष्ट , शिक्षकांनी केलेले अविरत प्रयत्न आणि परिश्रम याचा अंदाज नसावा. उलट ज्या केंद्राचा उच्चांकी निकाल लागतो अशा केंद्राचा गौरव करणे व त्यांना शाबासकीची थाप देणे दूरच.राधानगरी, भुदरगड हे तालुके महाराष्ट्रात शिष्यवृत्तीचा डंका गाजवाणारे तालुके आहेत. या तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी महाराष्ट्रातील तमाम शिक्षकांना मार्गदर्शन केले आहे. त्यांचे शासनानेही कौतुक केले आहे.या तालुक्यातील शिकवणाऱ्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी आणि त्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी घरावर तुळशी पत्र ठेवून ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता अहोरात्र काम केले आहे.म्हणूनच हे तालुके शिष्यवृत्ती बरोबरच एन एम एम एम शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात अव्वल ठरले आहेत.त्याचाच परिपाक म्हणून यावर्षी माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत आमदार श्री नामदेवराव भोईटे माध्यमिक विद्यालय कसबा वाळवेची विद्यार्थिनी कु.नुपूर युवराज पोवार ही राज्यात पहिली आली आहे.ही शिष्यवृत्ती महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्यात खेचून आणण्याचे काम येथील गुणवंत विद्यार्थी करीत आहेत.
ही सर्व बाब पर्यवेक्षिय यंत्रणेला माहिती आहे.मात्र या तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करुन पाठीवर थाप देणे बाजूलाच ठेवून त्यांच्यावरच संशयास्पद नजरेने अविश्वास दाखवण्याचे काम परीक्षा परिषदेने केले आहे.राधानगरी व भुदरगड तालुक्यातील परीक्षा केंद्रांना संवेदनशील केंद्र म्हणून घोषित करण्याच्या परिषदेच्या या निर्णयाचा शिक्षण क्षेत्रातून निषेध केला जात आहे.



