डॉ.संजय डी पाटील यांच्या 62 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या प्रेसिडेंट कप क्रिकेट स्पर्धेत पुरुष गटात डी वाय पाटील हॉस्पिटल तर महिला गटात डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला विजेतेपद


दर्पण न्यूज कोल्हापूर : अनिल पाटील
डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी पाटील यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘प्रेसिडेंट कप’ क्रिकेट स्पर्धेत पुरुष गटात डी वाय पाटील हॉस्पिटल तर महिला गटात डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाने विजेतेपद पटकावले. डॉ. संजय डी. पाटील व विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते विजेत्या संघाना सन्मानित करण्यात आले.
डॉ. संजय डी. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त २०१८ पासून प्रोजेक्ट टीमकडून या स्पर्धेचे आयोजन केले जाते. प्रकाशझोतात खेळविण्यात असलेल्या या स्पर्धेत यंदा पुरुष गटात डी. वाय पाटील ग्रुपच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या विविध संस्थांच्या एकूण २८ संघांनी तर महिला गटात ८ संघानी सहभाग घेतला होता.बुधवारी झालेल्या अंतिम सामन्यात पुरुष गटात डी. वाय. पाटील हॉस्पिटल संघाने उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर अजिंक्यतारा संघावर विजय मिळवत विजेतेपद मिळवले. अजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली हॉस्पिटल संघाने प्रथम फलंदाजी करताना ८ षटकात तीन विकेट गमावत ८३ धावा केल्या. त्यानंतर अजिंक्यतारा संघाला चार बाद ६० या धावसंख्येवर हॉस्पिटल संघाने अजिंक्यपद मिळवले. २ षटकात ८ धावा देऊन ३ गाडी बाद करणाऱ्या अमर त्रिपाठी यांना ‘मॅन ऑफ द मॅच’, तर स्पर्धेत १३२ धावा करणाऱ्या व ५ गडी बाद करणाऱ्या ऋषिकेश पाटील यांना ‘मॅन ऑफ द सिरीज’ ने गौरविण्यात आले.
महिला गटात डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (अभियांत्रिकी) संघाने विजेतेपद मिळवले. या संघाने प्रथम फलंदाजी करताना पाच षटकात एक विकेट गमावत ५३ धावा केल्या. मात्र डी वाय पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल संघ १ विकेट गमावून केवळ ४५ धावाच करू शकला. त्यामुळे त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अंतिम सामन्यात २६ धावा व एक बळी मिळवणाऱ्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या तन्वी पाटील हिला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ तर स्पर्धेत ६२ धावा करून ३ विकेट मिळवणारी मेडिकल हॉस्पिटल संघाच्या तृप्ती केसरकर यांना ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ किताब प्रदान करण्यात आला.
विजेते, उपविजेते संघ व उत्कृष्ट खेळाडूंना डॉ. संजय डी पाटील व पृथ्वीराज पाटील यांच्याहस्ते ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवर व सर्व खेळाडूंनी डॉ. संजय डी पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही व्ही भोसले, अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, डी वाय पाटील आकुर्डीचे कॅम्पस संचालक अमित विक्रम, डॉ. सदानंद सबनीस, तानाजी जाधव, स्पोर्ट्स डायरेक्टर शंकर गोनुगडे यांच्यासह विविध संस्थांचे प्रमुख व खेळाडू उपस्थित होते.
या स्पर्धेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये आपुलकी, एकोपा आणि क्रीडास्पर्धेची भावना अधिक दृढ होईल याचा विश्वास आहे. या पुढील काळातही अशा स्पर्धा सुरूच राहाव्या यासाठी आवश्यक ते पाठबळ देण्यात येईल अशी ग्वाही डॉ. पाटील यांनी दिली.
वाढदिवसानिमित्त उपस्थित मान्यवर व खेळाडूंनी डॉ. संजय डी. पाटील यांना शुभेच्छा दिल्या.


