महाराष्ट्रराजकीयसामाजिक

राज्यात सिकलसेल आजाराचे प्रमाण अधिक असलेल्या 21 जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाची सिकलसेल तपासणी करा : सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाशराव आबिटकर यांची मुंबई येथील आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत सूचना

 

दर्पण न्यूज कोल्हापूर,अनिल पाटील

सिकलसेल तपासणी विशेष पंधरवडा मोहिमेअंतर्गत राज्यातील सिकलसेल आजाराचे प्रमाण अधिक असलेल्या २१ जिल्ह्यांतील प्रत्येक नागरिकाची सिकलसेल तपासणी झाली पाहिजे. एकही नागरिक सिकलसेल तपासणीपासून वंचित राहू नये, याची काटेकोर दक्षता घेण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्यमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांनी दिल्या.

आरोग्यमंत्री यांच्या मंत्रालयीन दालनात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध विषयांबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस आरोग्य विभागाचे सचिव ई. रवींद्रन, आरोग्य आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, आरोग्य संचालक डॉ. विजय कंदेवाड, सहसंचालिका डॉ. सुनिता गोल्हाईत, यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राज्यात दिनांक १८ डिसेंबर ते १५ जानेवारी २०२६ या कालावधीत “सिकलसेल अभियानाची पूर्व तयारी करण्यात येईल.त्यानंतर दिनांक १५ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत “सिकलसेल तपासणी विशेष पंधरवडा” राबविण्यात येणार आहे.

या तपासणी मोहिमेदरम्यान सिकलसेल आजाराचे प्रमाण अधिक असलेल्या २१ जिल्ह्यांमध्ये एकही नागरिक तपासणीपासून वंचित राहू नये, यासाठी सर्व यंत्रणांनी प्रभावी नियोजन करून कार्य करावे, असे स्पष्ट निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले.

सिकलसेल आजाराचे लवकर निदान, रुग्णांना योग्य उपचार व संदर्भ सेवा उपलब्ध करून देणे अत्यंत महत्त्वाचे असून, राज्यात एकही सिकलसेल रुग्ण तपासणीपासून वंचित राहू नये, याबाबत आरोग्यमंत्री आग्रही असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी आरोग्यमंत्र्यांनी सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कार्यरत वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पगार दरमहा १ ते ५ तारखेपर्यंत अदा झाले पाहिजेत, अशा सक्त सूचना दिल्या. पगार अदा करण्यात दिरंगाई झाल्यास संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तसेच जिल्हा आरोग्य संस्थांनी आवश्यकतेनुसारच खरेदी करावी, अनावश्यक खर्च टाळावा व कार्यात पारदर्शकता ठेवावी, अशा सूचनाही आरोग्यमंत्र्यांनी या बैठकीत दिल्या.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!