सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

दर्पण न्यूज मिरज/सांगली : सांगली जिल्हा प्रशासनाच्या वतीने अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी जगताप, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी अशोक पाटील, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विश्वास वेताळ आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संबंधित यंत्रणांनी प्रयत्न करावेत, असे स्पष्ट केले. तसेच, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील यांनी अल्पसंख्याक समाजातील नागरिकांच्या मागण्यासंदर्भात निवेदन सादर करावे, त्याबाबत आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे स्पष्ट केले.
यावेळी डॉ. अजित पाटील यांनी अल्पसंख्याक समाजासाठी असलेल्या भारतीय संविधानातील तरतुदी व त्यांचे फायदे या विषयावर मार्गदर्शन केले. जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विश्वास वेताळ यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात श्रीमती जसबीर कौर, दिनेश कुदळे व नसीर नदाफ यांनी मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमास शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेसाहेब लोंढे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन गायकवाड, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, अल्पसंख्याक समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशोक पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी पूजा पाटील यांनी आभार मानले.



