महाराष्ट्रसामाजिक

पालकमंत्री हेल्पलाईन कक्षातर्फे बालगृहात आरोग्य तपासणी 

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून बालगृहातील मुलांना उबदार भेट  ;जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले वस्तुंचे वाटप

 

       दर्पण न्यूज मिरज/सांगली  : दादुकाका भिडे मुलांचे निरीक्षण गृह व बालगृहातील मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाची हास्यरेषा उमटवणारा एक सकारात्मक उपक्रम पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून राबविण्यात आला. तेथील मुलांना मानसिक व शारीरिक बळ देण्यासाठी त्यांनी केवळ प्रोत्साहनच नाही, तर स्पोर्ट किट, मुलींसाठी हुडी आणि संस्थेसाठी लायब्ररी कपाट ही उपयुक्त भेट देऊन मायेची ऊबही दिली. या वस्तुंचे वितरण जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी पालकमंत्री महोदय यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वर्षा पाटील, विवेकानंद हॉस्पिटल बामणोलीचे डॉ. राम लाडे, बालगृहाचे अधिक्षक मिलिंद कुलकर्णी व पदाधिकारी, संकेत कुलकर्णी, केदार खाडिलकर, विद्यार्थी उपस्थित होते.

तत्पूर्वी पालकमंत्री हेल्पलाईन कक्षाच्या वतीने दादुकाका भिडे मुलांचे निरीक्षण गृह व बालगृह सांगली येथील मुलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठान संचलित विवेकानंद रूग्णालय बामणोली यांच्या सहकार्याने यावेळी बालगृहातील मुलांची आरोग्य तपासणी करून आवश्यक त्या मुलांना औषधेही देण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, आयुष्य फार सुंदर असते. फक्त एक दृष्टिकोन असावा लागतो. तो दृष्टिकोन योग्य असेल तर आपण आपल्या पायावर उभे राहून आयुष्यामध्ये खूप आनंद मिळवू शकतो. आनंद मिळवणे हेच खऱ्या अर्थाने आयुष्याला एक फलद्रुप करण्याचा मार्ग आहे. चांगल्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करूया. पालकमंत्री यांच्याकडून भेटस्वरूपात ज्या वस्तू मिळालेल्या आहेत, त्या जपून वापरून त्याचा उपभोग घ्यावा, असे ते म्हणाले.

जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, आपल्याला आयुष्यामध्ये आपली कर्तव्ये पार पाडायची आहेत, ती आपल्या शरीराच्या माध्यमातूनच आपल्याला पार पाडावी लागतील. यासाठी शरीर निरोगी असलंच पाहिजे. आजारी पडल्यानंतर आपल्याला आरोग्याची किंमत कळते. यासाठी आपले आरोग्य जपून, सांभाळून ठेवावे असा सल्ला देताना त्यांनी यावेळी बालगृहातील मुलांची आरोग्य तपासणी केल्याबद्दल विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठान संचलित विवेकानंद रूग्णालय बामणोलीचे अभिनंदन केले. तसेच येत्या संक्रातीच्या अनुषंगाने वाण देण्याबाबत वस्तू तयार करून त्याचे प्रदर्शन भरविण्याबाबत मुलांना आश्वासित केले.

मा. पालकमंत्री महोदय यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांनी मनोगत व्यक्त करताना तसेच बालगृहास मागील भेटीवेळी मा. पालकमंत्री महोदयांनी मुलांना काहीतरी भेट देऊ असे सांगितले होते. त्या अनुषंगाने मुलांना स्पोर्ट किट व मुलींना हुडीचे वाटप, सेवा प्रीत्यर्थ लायब्ररी कपाट संस्थेस भेट देण्यात येत असल्याचे सांगून मुलांना शुभेच्छा दिल्या.

डॉ. राम लाडे यांनी बालगृहातील मुलांच्या आरोग्य तपासणीच्या माध्यमातून सेवेची संधी मिळाल्याचे ते म्हणाले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यातर्फे बालगृहातील देण्यात आलेल्या मुलांसाठी स्पोर्ट किट व मुलींना हुडीचे वाटप तसेच संस्थेसाठी लायब्ररी कपाट मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!