कोल्हापूरातील श्री सरस्वतीबाई गौङ सारस्वत ब्राम्हण वस्तीगृहाचे माजी विद्यार्थी घेणार आजी विद्यार्थ्यांना दत्तक

कोल्हापूरः अनिल पाटील
कोल्हापूरातील श्री सरस्वतीबाई गौड सारस्वत ब्राह्मण विद्यार्थी वसतिगृहाच्या माजी विद्यार्थीं संघाने दरवर्षी एका गरीब व होतकरु हुशार विद्यार्थ्याचे शैक्षणिक पालकत्व घेण्याचा निर्णय जाहीर करून त्यासाठी
वसतीग्रहाकडे निधी सुपूर्द केला. ज्या वसतिगृहात राहून आपण शिक्षण घेतले त्या संस्थेशी आपला ऋणानुबंध कायम राहावा आणि त्याची उतराई व्हावी यासाठी माजी विद्यार्थ्यांनी घेतलेला हा कौतुकास्पद निर्णय निश्चितच इतरांना प्रेरणा देणारा ठरणार आहे.
वसतीग्रहाच्या माजी विद्यार्थ्यांचा नुकताच स्नेहमेळावा झाला. त्या मेळाव्यात वसतिगृहाशी असलेले ऋणानुबंध कायम राहावेत, यासाठी आजी विद्यार्थ्यांस मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये सर्व माजी विद्यार्थ्यांनी आर्थिक मदत करण्याची तयारी दाखवली. त्यानुसार माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत एक लाख २१ हजार रुपयांची ठेव संस्थेकडे सुपूर्द केली.
या ठेवीच्या व्याजातून मिळणाऱ्या रकमेतून एका विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च करण्यात येणार आहे. हा यासाठी होणारा खर्च कमी पडल्यास दरवर्षी आणखी काही रक्कम जमा करून त्यातून त्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च भागवण्याचा निर्णय माजी विद्यार्थ्यांनी घेतला आहे.
राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून माजी विद्यार्थी संघाने एक लाख २१ हजार रुपयांची ठेव संस्थेकडे सुपूर्द केली.
माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष गुरुबाळ माळी, आनंद कुलकर्णी, बाबासाहेब पाटील, उमेश पाटील यांनी संस्थेचे अध्यक्ष मोहन देशपांडे, उपाध्यक्ष सिद्धार्थ लाटकर, सचिव सुधीर कुलकर्णी यांच्याकडे ठेव रकमेची पावती सुपूर्द केली.
माजी विद्यार्थी संघाच्या या उपक्रमाचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले. ‘एखाद्या वसतिगृहात राहिल्यानंतर त्याचे ऋणानुबंध कायम ठेवण्यासाठी जपलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे.”असे उद्गगार संस्थेच्या विश्वस्तांनी काढले.