महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांच्याकडून जिल्ह्यातील अनुसूचित जाती उपयोजनेच्या कामकाजाचा आढावा
मंजूर निधी १००% खर्च करण्याच्या संबंधित यंत्रणांना सूचना

दर्पण न्यूज कोल्हापूर -: महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग मुंबई उपाध्यक्ष तथा सदस्य धर्मपाल मेश्राम यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती घटक कार्यक्रम, अनुसूचित जाती उपयोजनेच्या कामकाजाचा आढावा शासकीय विश्रामगृह येथे घेतला. यावेळी त्यांनी उपस्थित यंत्रणांना मंजूर निधी १००% खर्च करून सर्व कामे तसेच लाभ गुणवत्तापूर्ण व पारदर्शक वितरित करण्याचे निर्देश दिले. ते १९ सप्टेंबर पर्यंत जिल्हा दौऱ्यावर असून कोल्हापूर जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील अर्जदारांनी दाखल केलेल्या विविध तक्रारी तसेच निवेदनबाबत ही यादरम्यान आढावा घेणार आहेत.
विश्रामगृह येथे जिल्हा उद्योग केंद्र, ऊर्जा विभाग, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण, अधीक्षक अभियंता महावितरण, समाजकल्याण अधिकारी, कृषी विकास अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सार्वजनिक बांधकाम, शिक्षणाधिकारी योजना, जिल्हा पशुसंवर्धन, जिल्हा क्रीडा अधिकारी तसेच सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय या विभागांचा त्यांनी योजना निहाय आढावा घेतला व मंजूर निधी, झालेला खर्च व अखर्चित निधी बाबत माहिती जाणून घेतली.
यावेळी त्यांनी संबंधित विभागाकडे मंजूर करण्यात आलेल्या निधीच्या खर्चाबाबत सविस्तर आढावा घेतला. वेगवेगळ्या संस्था संघटना अर्जदारांनी केलेल्या तक्रारी तसेच निवेदनाबाबतही यावेळी त्यांनी संबंधित यंत्रणेला सूचना केल्या. अर्जदारांचे प्रश्न तातडीने सोडवण्याचेही निर्देश त्यांनी दिले. कोणत्याही विभागाकडे अनुसूचित जाती व जमातीसाठी मिळालेला निधी अखर्चित राहता कामा नये. जर कामकाजात त्रुटी आढळून आल्या तसेच निधी अखर्चित राहिला तर संबंधित अधिकारी यांना याबाबत नोटिसा देण्यात येतील असे ते यावेळी म्हणाले.
बैठकीनंतर उपाध्यक्षांना जिल्हाधिकारी अमोल येडगे तसेच पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी भेट देऊन जिल्ह्यातील कामकाजाबाबत माहिती दिली. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी जिल्ह्यातील योजनांच्या अंमलबजावणी बाबत सविस्तर सादरीकरण केले. तत्पूर्वी सकाळी उपाध्यक्ष मेश्राम यांनी बिंदू चौक, शाहू समाधी स्थळाला भेट देऊन अभिवादन केले. तसेच श्री अंबाबाई मंदिरात देवीचे दर्शन घेतले.