महाराष्ट्रराजकीय

भिलवडी जिल्हा परिषद गटातून काँग्रेसची उमेदवारी द्या ; माजी सरपंच विजयकुमार चोपडे

 

दर्पण न्यूज  :भिलवडी  जिल्हा परिषद निवडणुकीचे वातावरण तापू लागले असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. भिलवडी जिल्हा परिषद गटातून भिलवडी गावचे माजी सरपंच विजयकुमार चोपडे यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी, यासाठी
भिलवडी गावचे माजी सरपंच धनंजय सुभाष दादा पाटील, भिलवडी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब चोपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकारी,कार्यकर्ते, आणि चोपडे अण्णा समर्थकांनी यांनी बैठक घेऊन, चोपडे यांच्या उमेदवारीची मागणी लावून धरली आहे. यासंदर्भात आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्याशी लवकरच प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करून उमेदवारी निश्चित करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
विजयकुमार चोपडे यांनी भिलवडी गावचे सरपंच म्हणून सलग दहा वर्षे अत्यंत पारदर्शक, शिस्तबद्ध व लोकाभिमुख कारभार केला आहे. ग्रामविकास, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, शिक्षण सुविधा, सामाजिक उपक्रम आदी क्षेत्रांत त्यांनी राबवलेल्या योजनांमुळे गावाच्या विकासाला गती मिळाली. त्यांच्या कार्यकाळात अनेक विकासकामे मार्गी लागल्याने नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी विश्वास आणि सकारात्मक प्रतिमा निर्माण झाली आहे.
केवळ ग्रामपातळीवरच नव्हे तर सहकार क्षेत्रातही विजयकुमार चोपडे यांचा भरीव अनुभव आहे. ते तासगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक, वसंतदादा सहकारी साखर कारखान्याचे संचालक व उपाध्यक्ष म्हणून समक्षमपणे जबाबदारी सांभाळली. तसेच भिलवडी शिक्षण संस्थेमध्ये संचालक म्हणून पाच वर्षे त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. दक्षिण भाग सोसायटीचे चेअरमन म्हणूनही त्यांनी पाच वर्षे पारदर्शक आणि सक्षम कारभार केला आहे.
या सर्व अनुभवाच्या आधारे जिल्हा परिषद गटाचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याची क्षमता विजयकुमार चोपडे यांच्यात असल्याचे कार्यकर्त्यांचे मत आहे. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, शेतीसाठी पाणी व्यवस्थापन, युवकांसाठी रोजगार संधी, महिलांसाठी स्वयंरोजगार योजना, शिक्षण व आरोग्य सुविधा मजबूत करण्यासाठी ते प्रभावी काम करू शकतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
कार्यकर्त्यांच्या मते, विजयकुमार चोपडे हे सर्वसामान्य जनतेशी थेट संपर्क ठेवणारे, प्रश्न समजून घेणारे आणि त्वरित निर्णय घेणारे नेतृत्व आहे. त्यामुळे भिलवडी जिल्हा परिषद गटाचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी त्यांची उमेदवारी उपयुक्त ठरेल.
याबाबत प्रतिक्रिया देताना विजयकुमार चोपडे यांनी सांगितले की, “कार्यकर्त्यांनी दाखवलेला विश्वास माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि परिसराच्या विकासासाठी मी सदैव तत्पर आहे. पक्षश्रेष्ठी व आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल.”
दरम्यान, विजयकुमार चोपडे यांच्या उमेदवारीबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली असून लवकरच यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!