सांगली जिल्ह्यातील 31 बालके ह्रदय शस्ञक्रियेसाठी मुंबईला रवाना : सेवा पंधरवडा” अंतर्गत उपक्रम

दर्पण न्यूज सांगली/ मिरज : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने सेवा पंधरवडा अंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम सांगली अंतर्गत जिल्ह्यांतील 75 बालकांवर हृदय शस्त्रक्रिया करण्याचा संकल्प केला आहे. यापैकी 31 बालके आज मोफत हृदय शस्त्रक्रियांकरिता मुंबईला रवाना झाली.
या बालकांना शुभेच्छा देण्यासाठी आमदार सुधीर गाडगीळ, आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे, जिल्हाधिकारी अशोक काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बिभीषण सारंगकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. छाया पाटील यांच्यासह राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अधिकारी व कर्मचारी, बालके व त्यांचे पालक उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची संकल्पना व प्रयत्नामधून सांगली जिल्हा राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत 0 ते 18 वर्षे वयोगटातील हृदयरोग संशयित बालकांकरिता मोफत 2 डी इको शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरांतर्गत हृदय शस्त्रक्रियेकरिता संदर्भित करण्यात आलेल्या व यापूर्वी प्रलंबित असलेल्या 31 बालकांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त दि. 17 सप्टेंबर ते दि. 02 ऑक्टोबर दरम्यान देशात राबवण्यात येत असलेल्या सेवा पंधरवड्याचे औचित्य साधून मुंबई येथील एसआरसीसी रुग्णालय, एमआरआर हॉस्पिटल या पंचतारांकित रूग्णालयाच्या ठिकाणी पाठविण्यात आले. मोफत प्रवास, निवास व भोजन व्यवस्थेसह या बालकांवर मोफत हृदय शस्त्रक्रिया होणार असून, या बालकांना घेऊन बस रवाना झाली. यावेळी मुलांना प्रवासात आवश्यक अन्न व पाण्याचे किट देण्यात आले.
शस्ञक्रियेकरिता पाठविण्यात आलेल्या 31 हृदयरोग बालकांच्या शस्ञक्रियेकरिता प्रति शस्त्रक्रिया चार लक्षप्रमाणे जवळपास 1 कोटी 20 लक्ष इतका खर्च अंदाजित आहे. या शस्त्रक्रिया राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, महात्मा फुले जन आरोग्य योजना, खाजगी रक्कम दाते, धर्मादाय संस्था इत्यादिमधून अनुदान उपलब्ध करून पूर्णपणे मोफत होणार आहेत. बालकांच्या शस्ञक्रियेकरिता आवश्यक असणारे अनुदान उपलब्ध करण्याकरिता आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याबाबतचे आश्वासन श्री. शेटे यांनी यावेळी दिले.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम हे या शिबिराचे आयोजक असून, जिल्हा समन्वयक डॉ. प्रमोद चौधरी व कार्यक्रम सहायक अनिता हसबनीस या कार्यक्रमाचे नियोजन करित आहेत. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत आजअखेर 1865 लाभार्थींच्या हृदय शस्त्रक्रिया व 23479 लाभार्थींच्या इतर शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यांतील गरजू बालकांच्या पालकांनी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, सांगलीशी तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी केले आहे.