शेतकऱ्यांचे प्रोत्साहन अनुदान द्या : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ङाँ . चेतन नरके यांचे निवेदन

कोल्हापूर : अनिल पाटील
कोल्हापूर जिल्ह्यातील साधारण प्रामाणिक कर्जफेड करणाऱ्या १२ हजार शेतकऱ्यांचे प्रोत्साहनपर अनुदान देणे बाकी आहे. ते तत्काळ देण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गोकुळचे संचालक डॉ. चेतन नरके यांनी निवेदनाव्दारे केली. महावितरणच्या गलधान कारभारामुळे तुटलेल्या विजेच्या तारेचा धक्का लागून शेतकऱ्यांचे मृत्यू होण्याच्या घटनामध्ये वाढ होत आहे, अशा घटना होवू नयेत यासाठी उपायोजना कराव्यात, तसेच अपघातग्रस्त कुटुंबियांना तत्काळ मदत करावी अशी मागणीही नरके यांनी केली.
राज्य सरकारच्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणारे प्रोत्साहन पर अनुदान अनुदानापासून कोल्हापूर जिल्ह्यातील बारा हजार पात्र शेतकरी वंचित राहिले आहेत. राज्य शासनाने अर्थसंकल्पामध्ये याबाबतची तरतूद करूनही अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा झालेले नाहीत. गेली पाच वर्ष प्रोत्साहन अनुदानाचा अक्षरशा खेळखंडोबा सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. शेतकऱ्यांच्या मधून कमालीची नाराजी व्यक्त होत आहे , तरी आपण संबंधित यंत्रणेला अनुदान तात्काळ अदा करण्याबाबत सूचना करावी, अशी मागणी डॉ. नरके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मुंबईतील भेटीत केली.
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या तीन चार महिन्यांमध्ये शेतामध्ये महावितरण कंपनीच्या विद्युत तारा तुटून पडल्याने शेतकऱ्यांचे अपघात होत आहेत. शेतकऱ्यांचा दोष नसतानाही त्यांचा हकनाक बळी जात आहे. तरी महावितरण कंपनीला विद्युत तारा दुरुस्ती करण्याबाबत आपल्या स्तरावरून सूचना देत असतानाच संबंधित शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई देण्याबाबत आपल्याकडून आदेश व्हावेत, याकडेही डॉ. चेतन नरके यांनी ना अजित पवार यांचे लक्ष वेधले. या दोन्ही प्रकरणी सरकार सकारात्मक निर्णय घेईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
………….