तासगाव येथे 17 जानेवारीला रोजगार मेळावा

सांगली : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली व पद्मभूषण वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दि.17 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10 वाजता पद्मभूषण वसंतरावदादा पाटील महाविद्यालय, तासगाव येथे जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्याचा जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त जमीर करीम यांनी केले आहे.
या जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्यामध्ये औद्योगिक तसेच इतर सेवा क्षेत्रातील सुमारे 8 पेक्षा जास्त खाजगी उद्योजकांनी सहभाग दर्शविलेला असून, त्यांच्याकडून विविध प्रकारची सुमारे 257 पेक्षा जास्त रिक्तपदे या मेळाव्याकरिता कळविण्यात आलेली आहेत. या पदांकरीता किमान इ. 10 वी, 12 वी, कोणत्याही शाखेतील पदवीधर अथवा पदवीकाधारक, पदव्युत्तर पदवी, आयटीआय, अभियांत्रिकी पदवी व पदविका इत्यादी पात्रता असणारे स्त्री-पुरुष उमेदवार पात्र असणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन आपले पसंतीक्रम ऑनलाईन नोंदविणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष मुलाखतीला येताना उमेदवारांनी आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट आकाराची छायाचित्रे, आवश्यकतेनुसार अर्जाच्या व आधारकार्डच्या प्रती तसेच बायोडाटा (रिझुम) सोबत आणणे आवश्यक असल्याचे श्री. करीम यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.