कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने केंद्रीय संचार ब्युरोतर्फे स्वामी रामानंद भारती विद्या मंदिर येथे विविध कार्यक्रम संपन्न
स्वातंत्र्यलढ्यावर आधारित तीन दिवसीय चित्र प्रदर्शनाची सांगता

सांगली :
विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी आणि त्यांना लष्करी सेवांमध्ये सहभागी होण्याकरीता प्रेरित करण्यासाठी अशा प्रकारच्या प्रदर्शनांची गरज आहे, असे मत, तासगावचे तहसीलदार रवींद्र रांजणे यांनी आज कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले. कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून केंद्रीय संचार ब्यूरो तर्फे तासगावमधील स्वामी रामानंद भारती विद्या मंदिर येथे निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, तज्ञांचे मार्गदर्शन आदी विविध कार्यक्रमांचे आयोजित करण्यात आले होते.
या स्पर्धांतील विजेत्यांना यावेळी पुरस्कारांचे वितरण देखील करण्यात आले. कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून स्वामी रामानंद भारती विद्या मंदिर येथे केंद्रीय संचार ब्युरोने ‘आजादी का अमृत महोत्सव’ या विषयावरील चित्र प्रदर्शनीचे आयोजन केले होते. या चित्रप्रदर्शनाची देखील आज सांगता झाली. या चित्रप्रदर्शनाला शाळेतील सुमारे 3500 विद्यार्थ्यांनी भेट दिली आणि स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित दुर्मिळ छायाचित्रांद्वारे स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाविषयी अधिक जाणून घेतले.
तीन दिवस चाललेले हे चित्र प्रदर्शन स्वामी रामानंद भारती विद्यामंदिरच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित माहिती तसेच दस्तऐवज पाहण्यासाठी एक दुर्मिळ संधी होती.
आज कारगिल विजय दिनी शाळेमध्ये आयोजित कृतज्ञता सोहळ्याबरोबर या प्रदर्शनाची सांगता झाली.