देश विदेश

54 व्या इफ्फी मधील विशेष सत्रात सनी देओल, अनिल शर्मा आणि राजकुमार संतोषी यांनी प्रेक्षकांशी साधला संवाद

गोवा/पणजी अभिजीत रांजणे

 

54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या एका आकर्षक सत्रात, ख्यातनाम अभिनेता सनी देओल, ज्येष्ठ दिग्दर्शक अनिल शर्मा आणि राजकुमार संतोषी यांनी आपल्या चित्रपट कारकीर्दीचा प्रवास आणि अनुभव यावर संवाद साधला.

सनी देओल, यांनी आपल्या “हिंदुस्थान जिंदाबाद” या प्रसिद्ध संवादाने संभाषणाची सुरुवात केली, आणि गदर 2 या चित्रपटाच्या पुनरागमनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

काही काळासाठी आव्हाने आणि चांगल्या संहितेचा अभाव निर्माण होऊनही, सिनेमावरील अढळ विश्वासाने आपल्याला कामाप्रति वचनबद्ध ठेवले, असे सनी देओल यांनी सांगितले. आपल्या सृजन प्रक्रीयेमध्ये अंतःप्रेरणेचा मोठा वाटा असल्याचे ते म्हणाले.

वेगवेगळ्या दिग्दर्शकांबरोबर काम करताना त्यांच्याशी जोडले गेलेले भावनिक नाते उलगडून, त्यांना आपण कुटुंबातील एक सदस्यच समजलो, असे सनी यांनी सांगितले. अनिल शर्मा आणि राजकुमार संतोषी या दिग्दर्शकांनी, सनी यांच्या अभिनय क्षमतेची प्रशंसा करताना सांगितले की, भावनामय दृश्य चित्रित करताना त्यांना कधीच ग्लिसरीनची गरज भासत नाही. प्रशंसा आणि पुरस्कार प्राप्त करण्यामधील सनी देओल यांच्या नम्रतेचाही त्यांनी विशेष उल्लेख केला.

राजकुमार संतोषी यांनी सनी देओल यांचे वर्णन “सामर्थ्यवान आणि असुरक्षित गिफ्टेड माचो”, असे केले. सनी देओल हा दिग्दर्शकाच्या आज्ञेत राहणारा अभिनेता असून, प्रस्थापित असूनही त्याने एकच शॉट् वारंवार द्यायला कधीच नकार दिला नाही, आणि चांगल्या कामगिरीशी कधीच तडजोड केली नाही असे सांगितले. चांगल्या अभिनेत्याला भूमिकेची लांबी नव्हे, तर केवळ क्षण पुरेसा असून, सनी देओल हे या तत्त्वाचे मूर्त रूप असल्याचे त्यांनी सांगितले.

अनिल शर्मा यांनी सनीच्या गदर चित्रपटाशी असलेल्या अजोड वचनबद्धतेची आठवण करून दिली आणि सनीची खरी क्षमता अजूनही पूर्णपणे प्रत्ययाला आली नाही, असा आपला विश्वास असल्याचे सांगितले. गदर 2 चित्रपट महाभारतातील अर्जुन-अभिमन्यू कथेपासून प्रेरणा घेत केलेल्या पात्र नियोजनामुळे एक अनोखा सिनेमॅटिक प्रवास घडवण्याचे आश्वासन देतो, असे अनिल शर्मा म्हणाले.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!