आखाती देशांत अडकलेल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा यंत्रणा सतर्क ; पालकमंत्री प्रकाश आबिटकर
२३ नागरिक जिल्ह्यात सुखरूप परतले, ८० नागरिक दुबईहून ६ मार्च रोजी पोहोचतील

दर्पण न्यूज कोल्हापूर-: इराण आणि इस्रायल या देशांमधील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशांत कोल्हापूर जिल्ह्यातील काही नागरिक अडकले आहेत. या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि मदतीसाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणा सतर्क आहेत, अशी माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
आखाती देशांमध्ये अडकलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांची सुरक्षित सुटका आणि त्यांच्या घरवापसीसाठी शासन स्तरावर सुरू असलेल्या कार्यवाहीचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात घेण्यात आला. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, जिल्हा प्रशासनाने तिकडे अडकलेल्या नागरिकांशी सतत संपर्क ठेवावा. केंद्र व राज्य शासनाच्या समन्वयाने जिल्ह्यातील अडकलेले नागरिक, पर्यटक, नोकरीनिमित्त गेलेले व्यक्ती आणि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षित परतीचे नियोजन केले जात आहे. ज्यांचे कुटुंबीय परदेशात अडकले आहेत त्यांनी घाबरून जाऊ नये. ज्यांचे नातेवाईक परदेशात आहेत, त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या हेल्पलाइनशी संपर्क साधून त्यांची माहिती द्यावी. जिल्ह्यात यासाठी स्वतंत्र संपर्क कक्ष व विशेष कक्ष सुरू करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासन आवश्यक मदतीसाठी सज्ज असून नागरिकांनी प्रशासनाशी समन्वय ठेवावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
इराण आणि इस्रायलमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशांत अडकलेल्या नागरिकांची माहिती पुढीलप्रमाणे आहे: यामध्ये दुबई येथे पर्यटनासाठी गेलेले १५९ पर्यटक; कतार, दुबई, इराण, इस्रायल, मोरोक्को, सौदी अरेबिया, शारजाह, कुवेत, बहरीन आणि ओमान येथे नोकरीनिमित्त गेलेले ३९ नागरिक; कतार, शारजाह व बहरीन येथे नोकरीनिमित्त गेलेल्या कुटुंबातील ७ सदस्य आणि दुबई येथे शिक्षण व प्रशिक्षणासाठी गेलेले २ असे एकूण २०७ नागरिक अडकले आहेत. यांपैकी पर्यटनासाठी गेलेले २३ नागरिक जिल्ह्यात सुखरूप परतले आहेत. तर दि. ५ मार्च २०२६ रोजी ८० नागरिक दुबईहून निघणार असून ते ६ मार्च २०२६ रोजी जिल्ह्यात पोहोचतील.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी माहिती दिली की, प्रशासन परदेशात अडकलेल्या नागरिकांच्या सतत संपर्कात असून, याबाबतचा दैनंदिन आढावा घेऊन शासनास कळविण्यात येत आहे.



