देश विदेश

54 व्या इफ्फी महोत्सवात ‘गांधी टॉक्स’ चित्रपटाच्या भव्य प्रीमियरने वेधले सर्वांचे लक्ष

 

 

गोवा/पणजी (अभिजीत रांजणे)

 

सुरु असलेल्या 54 व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज ‘गांधी टॉक्स’ या चित्रपटाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या चित्रपटात अभिनेते विजय सेतुपती, अदिती राव हैदरी, अरविंद स्वामी आणि सिद्धार्थ जाधव यांसारख्या सुप्रसिद्ध कलाकारांनी भूमिका केल्या आहेत. या चित्रपटाचे निर्माते शारिक पटेल आणि राजेश केजरीवाल यांच्यासह अभिनेता विजय सेतुपती यांनी गोव्यात आज झालेल्या पत्रकार परिषदेत, प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.

‘गांधी टॉक्स’ हा इफ्फी महोत्सवात सादर होणारा पहिलाच मूक चित्रपट आहे. दर्जेदार मूक चित्रपटांचा काळ पुन्हा एकदा अनुभवण्याची संधी चित्रपट रसिकांना देणे हा या चित्रपटाच्या प्रदर्शनामागील उद्देश आहे. हा चित्रपट, चलनी नोटांवर विराजमान गांधी आणि ज्यांचे आदर्श आपल्यापैकी प्रत्येक जण आत्मसात करू इच्छितो ते गांधीजी या दोन रुपांत विभागलेल्या गांधी या व्यक्तिमत्त्वाबद्दल भाष्य करतो.

 

चित्रपटाबाबत माहिती देताना निर्माते शारिक पटेल यांनी पुढे सांगितले की संवाद साधण्यासाठी दिग्दर्शकाने केलेला केवळ दृश्य माध्यमाचा वापर ही अत्यंत रोचक संकल्पना आहे. विजय, अदिती, अरविंद, सिद्धार्थ यांसारख्या नामवंत कलाकारांच्या मांदियाळीने आम्हांला चित्रपट निर्मिती करण्यासाठी आवश्यक आत्मविश्वास दिला. “साऊंडट्रॅकची रचना करण्यासाठी ए.आर.रेहमान यांनी संमती देणे म्हणजे पुरणपोळीवर साजूक तुपाची धार धरण्यासारखे ठरले,”असे  निर्माते म्हणाले.

चित्रपटाविषयी भाष्य करताना अभिनेते विजय सेतुपती म्हणाले, “न्याय नेहमी सत्यापेक्षा निराळेच असते. सुरुवातीला चित्रपटाचा नायक चलनी नोटेवर असलेल्या गांधींवर प्रतिक्रिया व्यक्त करतो मात्र नंतर तो त्याच्या हृदयात असलेल्या गांधीजींवर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात करतो. सदर चित्रपटात या द्वंद्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे.

मूक चित्रपटात भूमिका करणे कठीण होते का? या प्रश्नाला उत्तर देताना सेतुपती म्हणाले की त्यांच्या अभिनयावर संवादांच्या असण्या-नसण्याचा कोणताही परिणाम होत नाही आणि तसं परिणाम होण्याचे कोणतेही कारण देखील नाही. अभिनेता म्हणून मिळालेल्या यशाबद्दल बोलताना ते पुढे म्हणाले, “या कलाप्रकाराचा आपल्यावर वरदहस्त असावा आणि त्यातून प्रेक्षकांना खात्रीशीर अनुभव देता यावा अशी माझी अपेक्षा असते. कोणत्याही प्रकारच्या चित्रपटाला नेहमीच यशापयशाची जोखीम असते. मनात सतत धाकधूक असणे हा या व्यवसायाचा एक भागच आहे.”

 

एका व्यक्तिमत्त्वाच्या आर्थिक गरजा आणि त्याचा इतरांवर होणारा परिणाम यावर भाष्य करणारा हा एक ब्लॅक कॉमेडी प्रकारचा मूक विनोदीपट आहे. महादेव नामक बेरोजगार पदवीधर  तरुणाचा कोणत्याही मार्गाने नोकरी मिळवण्याचा संघर्ष सुरु असताना एक व्यापारी आणि भुरटा चोर यांच्याशी त्याची भेट होते. चित्रपटाचा विषयच असा निवडला आहे की त्यात शब्दांपेक्षा शांतताच अधिक बोलकी झाली आहे. ‘गांधी टॉक्स’ या चित्रपटाने संवादाचे साधन न वापरता कथाकथन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हा प्रयत्न थोडा भीतीदायक आहेच पण त्याचबरोबर तो रोचक आणि आव्हानात्मक देखील आहे.

 

कलाकार:

दिग्दर्शक: किशोर पांडुरंग बेळेकर

निर्माते: झी स्टुडियोज, क्युरियस आणि मुव्हीमिल

पटकथा: किशोर पी. बेळेकर

जाहिरात विभाग: करण बी.रावत

संकलक : आशिष म्हात्रे

कलाकार: विजय सेतुपती, अदिती राव हैदरी, अरविंद स्वामी, सिद्धार्थ जाधव

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!