भिलवडी येथील पूज्य साने गुरुजी संस्कार केंद्राच्या रौप्य महोत्सवानिमित्त विविध उपक्रम ; साहित्यिक, कवी सुभाष कवडे
25 वा वर्धापन दिन शनिवार 19 जुलै 2025 रोजी ; सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे उपक्रम

दर्पण न्यूज भिलवडी:- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील पूज्य साने गुरुजी संस्कार केंद्राचा रौप्य महोत्सवी 25 वा वर्धापन दिन शनिवार दिनांक 19 जुलै 2025 रोजी विविध उपक्रमांनी संपन्न होणार आहे, अशी माहिती संस्कार केंद्रप्रमुख सुभाष कवडे यांनी दिली.
यावेळी कवी कवडे सांगितले की, यानिमित्ताने गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप पूज्य साने गुरुजी संस्कार शिष्यवृत्तीचे वाटप आणि वाचन स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ इत्यादी उपक्रम संपन्न होणार आहेत .शनिवारी सायंकाळी पाच वाजता सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे हा उपक्रम संपन्न होणार आहे .सन 2000 साली स्वर्गीय काकासाहेब चितळे आणि सौभाग्यवती सुनिता चितळे
वहिनी यांच्या शुभहस्ते भिलवडीच्या राम मंदिरात संस्कार केंद्राचा शुभारंभ झाला. या घटनेस 25 वर्षे पूर्ण होत आहेत. या समारंभासाठी भिलवडीचा आजी-माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार असून उद्योगपती गिरीश चितळे समारंभास सदिच्छा भेट देणार आहेत तरी सर्व विद्यार्थी व पालकांनी या समारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन संस्कार केंद्राचे वतीने सुभाष कवडे यांनी केलेले आहे. संस्कार केंद्राने या परिसरात वाचन चळवळ रुजवली आहे विविध स्पर्धा श्यामची आई पारायण स्वतंत्र बाल वाङ्मयाचे ग्रंथालय पर्यावरण पूरक सन पुस्तक वाचन स्पर्धा काव्य लेखन स्पर्धा काव्य लेखन कार्यशाळा आदी विविध उपक्रम सातत्याने राबवून सांगली जिल्ह्यामध्ये एक वेगळा ठसा उमटलेला आहे सलग 25 वर्षे विद्यार्थ्यांसाठी वाचन चळवळीच्या माध्यमातून त्यांच्या मनावर मूल्य रुजवणारी सांगली जिल्ह्यातील ही सुप्रसिद्ध संस्था आहे. या संस्थेत आजवर अनेक मान्यवरांनी भेटी देऊन कौतुक केलेले आहे.