कामाच्या दर्जावरून विचारलेल्या प्रश्नाला, राजकीय रंग देण्याचा प्रयत्न : अॅड नितीन भोसले, प्रवक्ता भारतीय जनता पार्टी धाराशिव जिल्हा

दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी (संतोष खुणे):-
तुळजापूर–नळदुर्ग रस्त्याच्या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याच्या काम सुरू झाल्यापासूनच स्थानिक नागरिकांकडून विनोद गंगणे यांच्याकडे वारंवार तक्रारी येत होत्या. मात्र निवडणुकीचा काळ असल्याने “निवडणूक झाल्यावर पाहू” असे त्यांनी सांगितले होते. मंगळवारी पुन्हा एकदा स्थानिक नागरिकांनी ठोस तक्रार केल्यानंतर विनोद गंगणे यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला. त्यानंतर आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी त्यांचे कर्मचारी व राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अभियंत्यांना घटनास्थळी कामाच्या दर्जाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी पाठवले. त्याठिकाणी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी येण्याचे प्रयोजन काय? कामाच्या दर्जावरून विचारलेल्या प्रश्नाला, उत्तर देण्याऐवजी त्याला राजकीय षड्यंत्राचा रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे.संबंधित रस्त्याचे काम हे ऋषी मगर यांच्या नातेवाईकांकडून सुरू असल्याने तेही तेथे आले. मात्र कोणतीही चौकशी किंवा चर्चा न करता त्यांनी थेट शिवीगाळ सुरू केली, ज्यातून तेथे झटापट झाली. तो विषय तेथेच संपला असे वाटत असतानाच, नंतर ऋषी मगर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सार्वजनिक ठिकाणी विनोद गंगणे यांना जाहीरपणे शिवीगाळ केली.
घडलेली घटना नक्कीच दुर्दैवी आहे. तिचे समर्थन कोणीही करणार नाही. या प्रकरणात पोलीस प्रशासनाने तातडीने पावले उचलली असून जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे, ही आमची स्पष्ट मागणी आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनीही पोलीस प्रशासनाला तसे स्पष्ट निर्देश दिले आहेत. या प्रकरणात कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्न नाही. मात्र जे प्रकरण मूळतः रस्त्याच्या कामाच्या दर्जावरून सुरू झाले आहे, त्याला राजकीय रंग देऊन आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न नेहमीप्रमाणे काँग्रेस जिल्हाध्यक्ष धीरज पाटील करत आहेत. वास्तविक अशा संवेदनशील विषयावर त्यांनी घाणेरडे राजकारण करू नये.आपसातील वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेण्याचे सोडून तो कसा अधिक चिघळला जाईल आणि आपली राजकीय पोळी त्यावर भाजता येईल असा त्यांचा प्रयत्न आहे. ते त्यांचे धाराशिव येथे बसलेले उबाठाच्या नेत्यांचे इशाऱ्यावर पत्रकार परिषद घेत आहेत, हे सर्वांना चांगलेच ठाऊक आहे.त्यांच्या सांगण्यावर इथं देखील महाविकास आघाडीने निवेदन देत राजकिय रंग देण्याचा प्रयत्न केला आहे..


