काॅमन मॅन बसवराज पाटील ऊर्फ ज्युनिअर रजनीकांत सांगली महापालिका निवडणुकीच्या रिंगणात : एक भावनात्मक निवेदन

काॅमन मॅन बसवराज पाटील ऊर्फ ज्युनिअर रजनीकांत सांगली महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांचं एक भावनात्मक निवेदन …
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका प्रभाग १७ मधील नागरिक आणि बंधू – भगिनींनो, एक सामान्य सांगलीकर या नात्याने येणाऱ्या महापालिका निवडणुकीत मी बसवराज पाटील ऊर्फ ज्युनिअर रजनीकांत आपले प्रतिनिधीत्व करण्यासाठी आपल्यासमोर येत आहे…
‘कॉमन मॅन’च्या नजरेतून आपण सांगलीसाठी… आपल्या प्रभागासाठी नेतृत्व कसे असावे यासाठीच हे निवेदन !
नम्र निवेदन…
आपल्या सर्वांचे आराध्य दैवत श्री गणरायाच्या सांगली नगरीमध्ये गेली तीस वर्षे मी टेलरिंग व्यवसाय करीत आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून तसेच समाजसेवेची आवड असल्यामुळे मी या नगरीशी जिव्हाळ्याने जोडला गेलेलो आहे. सुरुवातीला मी आध्यात्मिक क्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रजापिता ब्रह्माकुमारी संस्थेमध्ये सलग अकरा वर्षे सेवा केली आहे. या सेवेत असतानाच मला महावीर उद्यान (बापट मळा) येथील पुरातन विहिरीच्या कडेला असलेल्या छोट्या हनुमान मंदिराचा जिर्णोद्धार करावा असे वाटले. या ठिकाणी फिरायला येणारे आणि बाहेरचेही अनेक भक्त दर्शनासाठी येत – जात होते. त्या ठिकाणी ते भक्तीभावाने लीन होत होते. हनुमान हे शक्ती, भक्ती आणि युक्तीचे प्रतीक आहे. गावातील वेस तिथे हनुमान मंदिर, व्यायाम शाळा तिथे हनुमान मंदिर या तत्त्वाने महावीर उद्यानातले हे मंदिरही उभारले असावे. आपल्या भागातील हे मंदिर चांगले असावे आणि त्याचे पावित्र्य टिकावे याच संकल्पनेतून मी या मंदिराचा जिर्णोद्धार करायचा निर्णय घेतला आणि ते काम तडीस नेले. मी गेली 19 वर्षे हनुमान जन्म सोहळा साजरा करतो. कोणताही कार्यक्रम करायचे म्हटले तर त्यासाठी आर्थिक नियोजन गरजेचे असते आणि ते एक आव्हान असते. हे काम लोकवर्गणीतून न करता मी स्वतः केलेल्या कष्टाच्या पैशातून करू लागलो. लोकांना हनुमान जयंतीला प्रसाद म्हणून खिरीचे वाटप सुरू केले. त्यातून वेगवेगळ्या संकल्पना उभा राहिल्या. हनुमान भक्तांकडूनही अनेक सूचना आल्या. त्यांचाही मी आदर केला. त्यातून जयंतीच्यावेळी सलग तीन दिवस भरगच्च कार्यक्रम होऊ लागले. गोंदवलेकर महाराज सांस्कृतिक प्रवचनाचा कार्यक्रमही होऊ लागला. भारतीय सण विशेष करून महाराष्ट्रीय सण टिकून राहावेत आणि महिलांना कुटुंबासह त्याच्यामध्ये सहभागी होता यावे यासाठी आमचे प्रयत्न सुरू झाले. घरच्या जबाबदाऱ्या सांभाळत महिलांनी मनोरंजनाच्या कार्यक्रमातही सहभागी व्हावे हा यामागे उद्देश होता. त्यातूनच वटसावित्री कार्यक्रमही या ठिकाणी होऊ लागला. वटपौर्णिमेला हजारो महिला या ठिकाणी उपस्थित राहतात हीच या कार्याची पोच पावती म्हणावी लागेल. या भागातील 10 ते 12 गणपती मंडळे दरवर्षी गणेशोत्सव साजरा करतात. तरुण मुले एकत्र येतात. तरुणांमधील व्यसनाधीनता दूर राहावी या उद्देशाने काही उपक्रम या उत्सवात साजरे करतात. सामाजिक जाणिवेतून या मंडळांनासुद्धा माझ्या कष्टाच्या पैशातून मी आजवर मदत करत आलो आहे. ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थी, अपंग विद्यार्थी, अंध विद्यार्थी यांनाही मदत
करत आलो आहे. स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या मुलांनाही माझ्याकडून मदत झाली आहे. जेष्ठ नागरिक, महिला यांनाही मदत केली आहे.
समाज बांधवांसाठी संघटन
टेंलरिंग व्यवसायामध्ये मी गेली 30 वर्षे काम करतो आहे. या व्यवसायातील लोकांना एकत्र आणण्याचे काम मी स्वतःचा व्यवसाय सांभाळून करतो आहे. यात स्वार्थभाव अजिबात नाही. हे काम आनंदाने करतो आहे. परिस्थिती माणसांना शिकवत असते. मी स्वतःही गरिबीच्या परिस्थितीतूनच पुढे आलो आहे. त्यामुळे त्यागाची भावना ओळखून मी हे काम करतो आहे. या व्यवसायातील लोकांची परिस्थिती गरिबीची राहता कामा नये. त्यांच्या मुलां मुलींसाठी काही मदत व्हावी आणि एक अत्यंत चांगली पिढी निर्माण व्हावी या उद्देशाने मी ही सारी मदत करतो आहे. टेलरिंग व्यवसायातील लोकांसाठी टेलर्स वेल्फेअर असोसिएशन, महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या माध्यमातून मी गेली दहा वर्षे एक व्यावसायिक आणि सामाजिक देणे म्हणून काम करतो आहे. महाराष्ट्रातील सर्व टेलर्स एकत्र करून समाजामध्ये त्यांना मानाचे स्थान कसे मिळेल, व्यवसाय कसा पुढे नेता येईल, व्यवसायाची आधुनिक साधने कशी निर्माण करावीत. एखाद्या मंदिरात, मशिदीमध्ये, गुरुद्वारामध्ये किंवा चर्चमध्ये जशी आपण सेवा समजून काम करतो.
कशाप्रकारे आपले दुकान है मंदिर समजून लोकांना सेवा द्यावी व त्यांची साधना करावी असे आवाहन मी आमच्या बांधवांसाठी केले आहे मी स्वतः समाजासमोर एक आदर्श उदाहरण ठेवत आहे. टेलरिंग व्यवसायातील आम्ही सर्व सहकारी एकत्रित काम करतो आहे. त्यासाठीच टेलरिंग असोसिएशन स्थापन केली आहे. हा व्यवसाय टिकला पाहिजे. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा यातून भागवल्या गेल्या पाहिजेत. टेलरिंग व्यवसाय ही एक कला आहे. भारतीय संस्कृतीत ही कला टिकली पाहिजे. उपजीविका म्हणून या क्षेत्रातल्या महिला आणि मुलीही घरामध्ये काम करत असतात आणि कुटुंब प्रमुखाला मदत करत असतात. यातून मुलांचे शिक्षण, मुलींची लग्नं, आजारपण यासाठी त्यांना मदत होते. आमच्या व्यावसायिकांना नवनवी संकल्पना समजावून सांगण्यासाठी आणि वर्कशॉप आम्ही घेतले आहेत. त्यामध्ये महिलांसाठी फ्री सेमिनारही घेतले आहेत. आमचा पूर्वीचा आणि आजचा टेलर्स बंधू याच्यामध्ये खूप फरक झालेला आहे. त्याने परदेशातील टेलरिंग व्यवसायाचे अनुकरण करावे अशी आमची भूमिका आहे. या व्यवसायाला राजा महाराजांच्या काळापासून मानाचे स्थान प्राप्त झालेले आहे. बारा बलुतेदारमधला हा एक महत्त्वाचा घटक आहे आणि तो वंचित राहाता कामा नये. असोसिएशन स्थापन झाल्यापासून त्यांचा व्यवसाय वृद्धिंगत झाला आहे. त्याला आता टेलरिंग व्यवसाय कळाला आहे. स्पर्धेच्या युगात कसे टिकायचे हे त्याला आता समजले आहे. या सर्वांना एकत्र करून त्यांना प्रशिक्षित करणे सोपे नाही, परंतु हे काम करत असताना माझ्या घरगुती आणि व्यक्तिगत गोष्टी बाजूला ठेवून मी स्वतःला वाहून घेतले आहे.
प्रभाग 17 मध्ये सर्वांगीण विकास
असोसिएशनच्या या संकल्पनेतून मला या व्यवसायाने सगळं काही दिलं आहे, पण मला असे वाटते की, माझ्या भागातील प्रभाग 17 मधील ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आता पुढाकार घ्यावा अशी अनेक नागरिकांची इच्छा आहे. या समस्यांसाठी मी आजवर काम करत आलो आहेच. माणसांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे त्यासाठी स्वच्छता हा महत्त्वाचा घटक आहे. प्रत्येक भागात चांगली स्वच्छता झाली पाहिजे हा आमचा उद्देश आहे. परिसर चांगला असेल तर नागरिकांना चांगले आयुष्य जगता येऊ शकते. त्यासाठी मी एक निश्चित असा निर्धार केला आहे की, मी राहतो त्या प्रभागात चांगल्या सुविधा निर्माण करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. हॉस्पिटल, पोलीस चौकी, ड्रेनेजची सक्षम व्यवस्था, पाणी शुद्धीकरण प्लांट या गोष्टी व्हायला हव्यात. महावीर उद्यानात जेष्ठ नागरिक, महिला, तरुण फिरण्यासाठी, व्यायामासाठी येत असतात. तिथे काही वेळेला चक्कर येणे, हार्ट अटॅक येणे अशा प्रकारच्या काही समस्या उद्भवतात. त्यासाठी शनिवार आणि रविवार या दोन दिवशी का होईना तिथे डॉक्टरांची उपस्थिती ठेवून या नागरिकांचे चेकअप करण्याची व्यवस्था व्हावी, याकरता तिथे आरोग्य केंद्र व्हावे यासाठी माझा प्रयत्न आहे. या ठिकाणी हास्य क्लब व अनेक मॉर्निंग वॉक करणारे लोक आहेत. त्यांच्यासाठी महावीर उद्यानात सर्व सुविधा उपलब्ध करून हा परिसर आदर्शवत करण्यात येणार आहे.
सीसीटीव्हीचे जाळे उभारणार
वार्डात प्रत्येक कॉलनीमध्ये प्रमुख चौकात सीसीटीव्ही बसवणे आवश्यक आहे. महिलांचे मंगळसूत्र किंवा अन्य दागिने चोरून नेणे, वृद्ध लोकांचे पैसे चोरून नेणे असे काही प्रकार घडतात. त्यासाठी हे सीसीटीव्ही आवश्यक आहेत. या सीसीटीव्हीचे मॉनिटरिंग माझ्या कार्यालयातून केले जाईल. तिथे दोन कर्मचारी नियुक्त केले जातील. ही व्यवस्था पाहून ते त्या त्या तपास यंत्रणेला कळवतील. निवडून आल्यानंतर जे मानधन मला महापालिकेकडून मिळणार आहे, त्या मानधनातून या दोन कर्मचाऱ्यांचा खर्च मी भागवू
शकतो. प्रभागामध्ये पासपोर्ट, जन्म मृत्यू दाखले, पोलीस सिव्हिल हॉस्पिटल, लाईट, पाणी, गटारी, कचरा उठाव यासंबंधीच्या ज्या काही तक्रारी असतील तर त्याची व्यवस्थाही या कार्यालयातून केली जाईल. प्रभागातील सुमारे पंचवीस हजार लोकांच्या तक्रारींची व्यवस्था या ठिकाणी होऊ शकते. हे मला आव्हान वाटत नाही, ते मी नक्की करू शकेन. महापालिकेचा नुसता फंड वापरून विकास होत नाही. गटारी, पाणी या गोष्टी होतच असतात ते कार्यालय बघतच असते, पण खेळाचे चांगले सुविधायुक्त मैदान, व्यसनमुक्ती केंद्र अशा काही गोष्टी आज निर्माण झाल्या पाहिजेत. तरुणांमध्ये व्यसनाधीनता वाढत चाललेली आहे. ती दूर करणे हा माझा संकल्प आहे. महावीर महावीर उद्यानात फिरण्यासाठीच्या जागेत पेविंग ब्लॉक ट्रेक व अन्य सुविधा खासदार फंडातून देण्याची व्यवस्था माझ्या प्रयत्नातून झाली आहे.
झोपडपट्ट्यांत सर्व सुविधा
प्रभागातील ज्या झोपडपट्टी आहेत त्यांच्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा देण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे या झोपडपट्ट्यांमध्ये स्वच्छता ही सर्वात महत्त्वाची असते ती नेहमीच झाली पाहिजे यासाठी पाठपुरावा करेन, सरकार सरकारी धोरणाप्रमाणे पुनर्वसन व अन्य काही गोष्टी करता येतात त्यासाठीही पाठपुरावा करेन. त्यांचा आरोग्याचा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे त्यावर अधिक लक्ष ठेवण्याची गरज आहे.
मनपा शाळांना अद्यावत सुविधा
महानगरपालिकांच्या शाळांसाठी अद्यावत सुविधा देणे आजच्या परिस्थितीत फार महत्त्वाचे आहे अनेक मोठमोठ्या शाळा शहरात येत आहेत आणि त्या मुलांसाठी चांगल्या सुविधा देत देत आहेत परंतु गरीब मुलांना अशा शाळेत शिक्षण घेणे परवडत नाही अशी बहुतांश मुले महानगरपालिकेच्या शाळेतच शिकतात त्यांनाही अशा चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न निश्चितपणे मी करणार आहे. शाळा सुशोभित झाल्या तर त्यातून शिक्षणाचा दर्जाही सुधारेल आणि मुलांची संख्याही वाढेल.
नागरी प्रश्नांसाठी पूर्णवेळ वाहून घेणार
व्यवसायात असलेले नगरसेवक जनतेच्या प्रश्नांसाठी कधी वेळ देणार असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो, परंतु माझ्यावर कुटुंबाची कुठलीही जबाबदारी नाही त्यामुळे मी पूर्ण वेळ समाजासाठी देऊ शकतो. आज माझे वय 55 आहे. व्यवसायापेक्षा मला समाजसेवा महत्त्वाची वाटते. ती आजवर करत आलो आहेच. नगरसेवक झाल्यानंतर आलिशान गाडी, फार्म हाऊस, महागडा मोबाईल, महागडे घड्याळ घालणे असा समज अनेक उमेदवारांमध्ये असतो परंतु परमेश्वरकृपेने अगोदरपासूनच मला या सगळ्या गोष्टी अपार कष्टातून मिळालेल्या आहेत. प्रतिष्ठा आणि पैशासाठी मला नगरसेवक व्हायचे नाही तर सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रात आपला प्रभाग आदर्श कसा करता येईल यासाठी मला निवडणुकीच्या मैदानात उतरायचे आहे. गावचा सरपंच झाल्यानंतर तो पिठाची गिरणी, गरम पाणी, थंड पाणी, कार्पोरेट ऑफिस अशा सुविधा देऊ शकतो अशी काही उदाहरणे आहेत तर आम्ही हे का करू शकत नाही. शहरात सुद्धा या गोष्टी देणे शक्य आहे. बऱ्याच कुटुंबातील मुलं – मुली बाहेरच्या देशात नोकरी करतात. घरामध्ये फक्त वृद्ध आई-वडीलच राहतात. त्यांना बघणारे कुणी नसते. त्यांना अनेक समस्या उद्भवतात. त्यांच्यासाठीसुद्धा काही सुविधा निर्माण करण्याची माझी इच्छा आहे.
नागरी सुविधा केंद्र उभारणार
पूर्वी महावीर उद्यानाजवळ घरपट्टी आणि पाणीपट्टी भरण्याची सुविधा होती. ती बंद पडलेली आहे. मी नगरसेवक झाल्यानंतर प्रभाग 17 मधील नागरिकांसाठी हे केंद्र तातडीने सुरू करणार आहे. प्रत्येक कॉलनीमधील मोकळ्या प्लॉटमध्ये चिल्ड्रेन पार्क उभा करण्याचा माझा विचार आहे. योग्य ठिकाणी पक्षी पार्कही होईल. याशिवाय तिथे झाडे लावता येतील आणि लहान मुले ज्येष्ठांसाठी विविध कार्यक्रमासाठी त्याचा वापर होईल अशी व्यवस्था केली जाईल. विश्रामबागची व्याप्ती खूपच वाढली आहे. लोकसंख्या जास्त आहे. त्याकारणाने येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी याकरिता स्वतंत्र टाकी उभा करणे आवश्यक आहे. त्यासाठी मी पुढाकार घेईन.
सामान्य कुटुंबातील हुशार विद्यार्थी-विद्यार्थिनी जे स्पर्धा परिक्षांची तयारी करतात त्यांच्यासाठी एक अद्यावत लायब्ररी उभी करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार.
भटकी कुत्री आणि डुकरे यांचा पहिल्यांदा बंदोबस्त होईल. प्रभागातील विशेष प्राविण्य मिळवलेल्या मुला मुलींचा, पुरस्कार विजेत्यांचा आम्ही सन्मान करणार आहोत.
शासकीय योजना लोकांच्या दारात
शासनाच्या विकासासाठीच्या अनेक योजना आहेत परंतु त्या नागरिकांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यासाठी त्यांना वणवण फिरावे लागते. योजनांची संपूर्ण माहिती देण्याची व्यवस्था माझ्या कार्यालयात मी सुरू ठेवीन. शासनातील काही कॅबिनेट मंत्र्यांशी माझे घनिष्ठ संबंध आहेत. अन्य काही नेते तसेच वरिष्ठ अधिकारी यांच्याशीही संबंध चांगले आहेत. त्यांच्या माध्यमातून माझ्या प्रभागासाठी मोठा फंड मी खेचून आणू शकतो. समाजासाठी तो पूर्ण वापरला जावा. तो कुठे खर्च केला याचा लेखाजोखा मी जनतेसमोर ठेवीन. त्याचे ऑडिट केले जाईल. स्थानिक स्तरावर काम करताना एखादी व्यक्ती काय काम करू शकते? समाजात तिला मानाचे स्थान आहे का? हेही नागरिकांनी पाहिले पाहिजे. म्हणूनच एक कामाची व्यक्ती म्हणून मला या निवडणुकीत संधी मिळायला हवी. रोज भेटणारा, सामान्य जनतेत मिसळणारा, त्यांच्या समस्या जाणणारा एक आदर्श नगरसेवक म्हणून मला निवडून द्यावे. समाजसेवक, लोकनेता म्हणून याज्युनियर रजनीकांतला महापालिकेत निवडून दिले तर त्याची चर्चा निश्चितचमहाराष्ट्रभर होईल. माझे ध्येय मोठं आहे. ते पूर्ण करण्यासाठी नागरिकांनी मला निःस्वार्थीपणाने मदत करावी आणि माझ्या पाठीशी ठामपणे उभे रहावे. मी अविवाहित आहे. माझ्या मागे कुणीही नाही. कुणासाठी मिळवून ठेवायचे नाही. मला फक्त जनतेच्या हिताचीच कामे करायची आहेत. त्यामुळे मी आपल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. याची मनापासून ग्वाही देतो.
कळावे,
आपलाच,
एक कॉमन मॅन….
बसवराज ऊर्फ सियाराम पाटील


