महाराष्ट्रसामाजिक

जिल्ह्यातील रस्ते अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करा : परिवहन आयुक्त विवेक भिमनवार *रस्ते अपघाताचा घेतला आढावा

 

 

दर्पण न्यूज धाराशिव (जिल्हा प्रतिनिधी संतोष खुने)दि.०५ डिसेंबर : जिल्ह्यात रस्ते अपघाताचे प्रमाण इतर जिल्ह्याच्या तुलनेत जास्त आहे. जिल्ह्यातील रस्ता अपघाताची सखोल कारणे शोधली पाहिजे.वाहन चालकांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती करणे गरजेचे असून जिल्ह्यातील रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.असे निर्देश राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी दिले.

४ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्ह्यातील रस्ते अपघाताचा आढावा घेताना आयोजित सभेत श्री.भिमनवर बोलत होते. जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,पोलीस अधीक्षक श्रीमती. रितू खोखर,प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर,उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शिवराम केत व एस.एस.मस्के,राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक स्वप्निल कासार व महेश पाटील,राष्ट्रीय महामार्ग उपप्रबंधक अमित पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री.भिमनवार म्हणाले की,सन २०२४ आणि सन २०२५ मध्ये जिल्ह्यात घडलेल्या रस्ते अपघाताचे विश्लेषण करावे.गोल्डन अवरमध्ये अपघातग्रस्तांना तातडीने सेवा उपलब्ध झाली पाहिजे.रुग्णवाहिका ही कमीत कमी वेळेत अपघातग्रस्त ठिकाणी पोहोचून तातडीने अपघातग्रस्तांना दवाखान्यात घेऊन जाताच तातडीने उपचार मिळाले पाहिजे.जिल्ह्यातील अपघात प्रवण ठिकाणे कोणती आहेत हे निश्चित करून त्या ठिकाणी भविष्यात अपघात होणार नाही,यादृष्टीने उपाययोजना कराव्यात.मद्यप्राशन करून वाहन चालवून अपघात होण्याचे प्रमाण हे जास्त आहे. पहाटे ४ ते सकाळी ८ या चार तासाच्या कालावधीत रस्ता अपघाताचे प्रमाण जास्त आहे.हे प्रमाण कमी करण्यासाठी परिवहन विभाग व पोलीस विभाग यांनी संयुक्तपणे सलग सहा महिने यावर फोकस करून काम करावे.असे श्री.भिमनवार यांनी सांगितले.

दुचाकीस्वारांना हेल्मेटचा वापर करण्यास प्रवृत्त करावे असे सांगून श्री.भिमनवार म्हणाले की,जिल्ह्यात ऊस वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांना रिफ्लेक्टर लावणे बंधनकारक करावे तसेच दुचाकी वाहनांना देखील रिफ्लेक्टर लावावे.त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होईल.रस्त्याचे व पुलाचे जिथे काम सुरू आहे,त्या ठिकाणी रिफ्लेक्टर व बॅरिकेट्स लावण्यात यावे तसेच काम सुरू असलेल्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात यावे.त्यामुळे कामाच्या ठिकाणी होणारे अपघात टाळता येतील.रस्ता सुरक्षेसाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून घ्यावा. निधीची आणखी आवश्यकता पडल्यास परिवहन विभागाकडून निधी उपलब्ध करून देण्यात येईल.रस्ते अपघात होण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणे हे आहे.पुढील दोन तीन महिन्यात मॉनिटरिंग करून रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करावे असे ते म्हणाले.

जिल्ह्यातील रस्ता अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी रस्ता सुरक्षा बैठकीत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना आवश्यक ते निर्देश देण्यात येतील तसेच रस्ता सुरक्षेबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येईल.रस्ता सुरक्षेसाठी जिल्हा नियोजन समितीमधून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे जिल्हाधिकारी श्री.पूजार यांनी यावेळी सांगितले.

श्रीमती खोखर यावेळी म्हणाल्या की, जिल्ह्यातील रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस व परिवहन विभाग आवश्यक त्या उपाययोजना करत आहे. नियम मोडणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध दंड वसूल करून योग्य ती कारवाई करण्यात येईल.असे त्यांनी यावेळी सांगितले.

प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.चव्हाण म्हणाले की,जिल्ह्यात जानेवारी २०२५ ते आतापर्यंत झालेल्या रस्त्या अपघाताची नोंद घेऊन रस्ता अपघाताची कारणे शोधली आहेत.रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी परिवहन विभागाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील असे त्यांनी सांगितले.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.डाके यांनी जिल्ह्यात रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या ३ जुलै,२ सप्टेंबर आणि २५ नोव्हेंबर २०२५ रोजी बैठका झाल्या. खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली २७ जानेवारी २०२५ रोजी संसद सदस्य सडक सुरक्षा समितीची बैठक झाली.एप्रिल २०२५ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत रस्ता सुरक्षाविषयी घडलेल्या विविध ९ प्रकारच्या गुन्ह्यात ५५७४ प्रकरणात गुन्हे दाखल करून दंड वसूल करण्यात आला. रस्ते अपघातात मृत्यू पडणाऱ्या पादचाऱ्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी रस्त्याच्या उजव्या बाजूने चला याचे महत्त्व पटवून दिले जात आहे.जिल्ह्यात रस्ता अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यामध्ये दुचाकी स्वाराचे प्रमाण अधिक आहे.हे प्रमाण कमी करण्यासाठी वाहन चालकांचे प्रबोधन व त्याची अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येत असल्याचे श्री.डाके यांनी सांगितले.जिल्ह्यात ऑक्टोबर २०२४ मध्ये २७ अपघातात २९ जणांचा मृत्यू झाला तर ऑक्टोबर २०२५ मध्ये ४० अपघातात ४८ जणांच्या मृत्यू झाला. सन २०२४ मध्ये ऑक्टोबर २०२४ पर्यंत २२७ रस्ते अपघातात २५० व्यक्तींचा आणि सन 2025 मध्ये ऑक्टोबर २०२५ पर्यंत ३०२ रस्ते अपघातात ३२८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती श्री.डाके यांनी यावेळी दिली.

या सभेला परिवहन,पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अन्य संबंधित अधिकारी देखील उपस्थित होते.आभार उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.डाके यांनी मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!