महाराष्ट्रमाहिती व तंत्रज्ञानसामाजिक

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांकडून विद्यार्थ्यांनी काय शिकावे ?

महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रेरणा लेख

 

६ डिसेंबर: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन. हा दिवस फक्त महामानवाला वंदन करण्याचा नसून विद्यार्थ्यांसाठी त्यांच्याकडून प्रेरणा घेण्याचा दिवस आहे. बाबासाहेबांचे आयुष्य म्हणजे ‘शिकण्याची अखंड तळमळʼ, ‘अडचणींना न घाबरण्याची जिद्दʼ आणि ‘ज्ञान हीच खरी शक्तीʼ हा मूलमंत्र जिवंतपणे जगलेले महान व्यक्तिमत्त्व.!

प्रतिकूल परिस्थितीतही ‘शिक्षण’ हेच ध्येय

डॉ. आंबेडकरांचे बालपण जातीय विषमता, दारिद्र आणि सामाजिक भेदभावाने व्यापलेले होते.तरीसुद्धा बाबासाहेबांना शिक्षण घेण्याची ओढ प्रचंड होती.त्यांचे वडील रामजी सकपाळ यांनी “शिक्षण हेच तुमचे खरे भांडवल” असा मोलाचा संस्कार दिला.रामजी सकपाळ यांनी इंग्रज अधिकाऱ्यांच्या मदतीने पुण्यातील पंतोजी शाळेतील परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्यांच्या धारिष्ट आणि चिकाटीमुळेच  कितीही अडथळे आले तरी विद्याभ्यास सोडायचा नाही हा निर्धार बाबासाहेबांच्या रक्तात भिनला होता.

दहावीपर्यंतचा प्रवास

साताऱ्याला त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. बाबासाहेबांच्या दहावीपर्यंतच्या शिक्षणाचा प्रवास खडतर होता.    शाळकरी वयातच वयाच्या सहाव्या वर्षी त्यांची आई त्यांना सोडून गेली. मात्र,त्यांनी शाळेला सोडले नाही. शाळेलाच आई बनवून विद्यार्जन केले.शाळेतल्या अडथळ्यांना विद्यार्थ्यांनी ऐकले तरी अंगावर काटा येईल.शाळेत त्यांना माठातील पाणी पिण्याची परवानगी नव्हती. हाताची ओंजळी करून त्यांना खाली बसावे लागत आणि वरून कोणीतरी तुच्छतेने पाणी ओतत. त्यातून त्यांना तहान भागवावी लागत होती. शिक्षक त्यांच्या वह्या, पुस्तकांना हात लावत नसत. त्यांची वह्या पुस्तके तपासत नसत. त्यांचा गृहपाठही विटाळ होतो म्हणून तपासला जात नसे. शिक्षकाचाही तिरस्कार त्यांना सहन करावा लागला. तरीही ” शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो प्याला तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही”, हे वाक्य त्यांनी समाजाला सांगितले. विद्यार्थ्यांसाठी हे वाक्य आजही प्रेरणादायी आहे. समस्यांचे भांडवल करण्यापेक्षा लढणे शिका. शिक्षण आत्मसात करा. हा साधा आत्मबोध त्यांच्या या संघर्षातून मिळतो.

१९०७ मध्ये बाबासाहेब मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. तुम्हाला माहिती आहे..! बाबासाहेबांना किती गुण मिळाले होते…? ७५० पैकी फक्त २८२. मात्र त्या काळात महार जातीतून अर्थात ज्या जातीला शिक्षणाचा अधिकारच नाही त्या जातीतून परीक्षा देणे ती उर्त्तीर्ण होणे हा त्यांचा भीम पराक्रम होता. त्यामुळे त्यांचा सत्कारही झाला. त्यावेळचे समाज सुधारक सिताराम केशव बोले, गुरुवर्य कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांनी त्यांचा सत्कार केला. कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांनी त्यांना स्वतः लिहिलेले गौतम बुद्धांचे चरित्र यावेळी भेट दिले…बाबासाहेबांच्या उत्तर आयुष्यात त्यांनी हिंदू धर्मातील चातुर्वर्णाला कंटाळून बौद्ध धर्म स्वीकारला.या पुस्तकाचे असे फार मोठे महात्म्य आहे.

शिक्षकांचा आवडता विद्यार्थी

इयत्ता दहावी पर्यंत पेंडसे आणि आंबेडकर या दोन शिक्षकांनी त्यांच्या गुणवत्तेला बघून त्यांना मदत केली. या दोन शिक्षकांपैकी आंबेडकर गुरुजींनी बाबासाहेबांचे आंबावडेकर हे नाव सुटसुटीत करत स्वतःचे नाव आंबेडकर दिले. आंबेडकरांनी या शिक्षकाचे आभार आयुष्यभर मानले. आंबेडकर ज्यावेळेस मोठे व्यक्तिमत्व म्हणून भारतात ओळखायला लागले त्यावेळी आंबेडकरांनी आपल्या कार्यालयात बोलून आपल्या या गुरुजींचा यथोचित सन्मानही केला. विद्यार्थ्यांनी किती विनम्र असावे व आपल्या गुरुप्रती किती श्रद्धावान असावे याचा वस्तुपाठ आंबेडकरांनी घालून दिला आहे. हे झाले शालेय जीवनात, मात्र लंडनमध्ये असताना देखील त्यांचे अर्थशास्त्राचे गुरु सेलिग्मन त्यांनी आंबेडकरांची पाठराखण केली. ‘दि इव्हॅल्यूशन ऑफ प्रोविन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया ‘या प्रबंधाला त्यांनी जगातला मौलिक ग्रंथ म्हटले आहे.

परदेशी शिक्षण व समस्या

बडोद्याच्या दरबारात नोकरी करण्याच्या अटीवर बाबासाहेबांना अमेरिकेला संस्थानाने उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली. अस्पृश्य युवकासाठी ही संधी होती. बाबासाहेबांनी या संधीचे सोने केले. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात शिक्षण सुरू झाल्यावर त्यांनी विलक्षण वेगाने अध्ययन केले. इकोनॉमिक्स, पॉलिटिकल सायन्स, सोशिओलॉजी यांसह अनेक विषयांत त्यांनी प्राविण्य मिळवले. पुढे लंडनला गेले. परंतु शिष्यवृत्तीची मुदत संपत आल्यानंतर त्यांना शिक्षण अर्धवट ठेवून भारतात परत यावे लागले.

तत्कालीन व्यवस्थेत मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्ती घेऊन अमेरिकेत, इंग्लंडमध्ये जातो हे देखील अनेकांना आवडले नव्हते. त्यामुळे गायकवाड राजघराण्याच्या कारकुनांनी बाबासाहेबांना शिक्षण अर्धवट सोडून भारतात बोलावले. बाबासाहेबांच्या जागी अन्य कोणी असता तर खचून गेला असता. मात्र मिळेल त्या परिस्थितीत ज्ञानार्जन करणे, हा संदेश त्यांनी दिला आहे. शिक्षण अर्धवट सोडणाऱ्यांसाठी बाबासाहेबांनी हे फार मोठे उदाहरण पुढे केले आहे. बाबासाहेबांनी ज्या परिस्थितीत अर्धवट शिक्षण सोडले पुन्हा ते लंडनला जाऊन आपले शिक्षण पूर्ण करून आले. छत्रपती शाहू महाराज व अन्य समाज बांधवांच्या मदतीने लंडनमध्ये गेले आणि पुन्हा आपले शिक्षण त्यांनी पूर्ण केले. ही घटना विद्यार्थ्यांना शिकवते की, खऱ्या प्रतिभेला कधी ना कधी योग्य हात मिळतोच. पण त्यासाठी प्रतिभावानही तेवढाच मेहनत करणारा, ध्येयवादी असायला हवा.

उपाशी राहा पण शिका

लंडनमध्ये राहणे त्याकाळी महागडे होते. कधी कधी बाबासाहेब “ब्रेड आणि चहा” वर दिवस काढत. मात्र इतक्या डिग्र्या मिळवताना त्यांनी कधीही तक्रार केली नाही. फक्त अभ्यास, अभ्यास आणि अभ्यास-हीच त्यांची साधना. लंडन म्युझियम मध्ये अर्थात ग्रंथालयात जाऊन ते अभ्यास करायचे. लंडन म्युझियममध्ये ते सर्वात आधी जाणारे व सर्वात उशिरा त्या अभ्यासिकेतून निघणारे चिवट विद्यार्थी होते. दोन सँडविच तुकड्यांवर ते दिवस काढायचे. पापड खाऊन रात्र काढणे या कल्पनेने सुद्धा अंगावर काटा येतो इतका संघर्ष त्यांना करावा लागला.

“उपाशी राहिलात तरी चालेल पण शिक्षण सोडू नका.” आजच्या विद्यार्थ्यांनी या एका वाक्याचा अर्थ खोलात समजून घ्यावा. मोबाईल, इंटरनेट, सोशल मिडिया, स्पर्धा-आजच्या अडचणी त्या काळाच्या तुलनेत क्षुल्लक आहेत. मात्र विदेशात शिकताना त्यांनी राजकारणात पासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला. लालाजींना त्यांनी नम्रपणे सांगितले, “बडोदा नरेश यांनी मला अपरिमीत सहाय्य केले आहे. त्यांना दिलेलं वचन न मोडता आपला अभ्यास करणे हेच आपले कर्तव्य आहे ” कधी काय पकडावे व कधी काय सोडावे याचा वस्तूपाठही त्यांनी विद्यार्थ्यांसाठी या घटनेतून दिला आहे.

विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांकडून काय शिकावे?

सर्वात महत्वाचे म्हणजे बाबासाहेबांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग देश बांधणीसाठी केला. थोडक्यात आज महापरिनिर्वाणदिनी त्यांच्या स्मृतीस अभिवादन करताना विद्यार्थ्यांनी काही गोष्टींची उजळणी करणे आवश्यक आहे. तुमच्या हातात पुस्तक बाबासाहेबांमुळे मिळाले आहे त्यांनी तुमच्या शिक्षणाची सोय केली आहे. त्यामुळे बाबासाहेबांचे शिक्षणासंदर्भातील काही आदर्श निश्चित गिरवले पाहिजे.

१. अडचणींना न घाबरणे : परिस्थिती कशीही असो, शिक्षण सोडू नये.

२. स्वप्न मोठे ठेवणे : अमेरिकेत, लंडनमध्ये जाऊन शिक्षण घेण्याचे स्वप्न बघा.

३. कठोर परिश्रम : एक-एक डिग्री रक्ताचं पाणी करून मिळवली.

४. शिस्त आणि वेळेचे नियोजन : अभ्यासात शिस्त कळीचा मुद्दा बनली आहे.

५. शिक्षणाचा सामाजिक उपयोग : पदवी ती समाजाची सेवा करण्यासाठी वापरा.

६. मनाची स्वतंत्रता : “शिक्षण माणसाला विचार करण्याचं स्वातंत्र्य देते” महत्त्वाचे.

७. सतत शिकत राहणे :  पदव्या मिळाल्या तरी ते आयुष्यभर शिकत राहिले.

८. आराखडा आखा : मला शिक्षणातून अंतत: काय मिळवायचे ह ठरवा.

आजच्या महापरिनिर्वाण दिनी विद्यार्थ्यांनी एवढेच लक्षात ठेवावे. या भारत भूमीतील प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी बाबासाहेब हे सर्व दृष्टीने एक आदर्श विद्यार्थी म्हणून कित्ता गिरवीण्यायोग्य आहे. भारताच्या इतिहासात असा गुणी विद्यार्थी कुणीही झालेला नाही. त्यांना मानवंदना देताना त्यांच्यासारखे गुणी होण्याची शपथ घेण्याचा आजचा दिवस आहे.

 

-प्रवीण टाके

उपसंचालक (माहिती)

कोल्हापूर विभागीय कार्यालय कोल्हापूर

9702858777

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!