भिलवडी येथे डंपरने चिरडले : ६ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू
भिलवडी परिसरात हळहळ व्यक्त : कडक कारवाई करण्याची लोकांतून मागणी

दर्पण न्यूज भिलवडी :- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथे झालेल्या भीषण अपघातामध्ये ६ वर्षीय पहिलीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याच्या अंगावरून डंपर गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घडली असून, अपघातानंतर चालक फरार झाला आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की,भिलवडी ता. पलूस येथे शाळेतून घरी परतत असलेल्या सात वर्षीय चिमुकल्याच्या अंगावरून डंपर गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शनिवार दि. १९ जुलै २०२५ रोजी सकाळी ११.३० च्या दरम्यान सरळी पुलाजवळ घडली.राज वैभव पवार (वय वर्षे ६, रा. भिलवडी) असे मृत बालकाचे नाव आहे. तो भिलवडी येथील खाजगी मराठी प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीमध्ये शिक्षण घेत होता. शाळा सुटल्यानंतर तो आपली आई, इतर मित्र व त्यांची आई यांच्यासोबत घरी परतत असताना माळवाडीहून भिलवडीकडे येणाऱ्या डंपर (क्र. MH 10 AW 9729) वरील चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने डंपर सरळी पुलाजवळ थेट राजच्या अंगावरून गेला. या भीषण अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातावेळी डंपरच्या धक्क्याने दोन महिला पालक व ३ विद्यार्थी इतरत्र पडल्याने तसेच यावेळी येथून जाणारी चार चाकी देखील सुदैवाने डंपरच्या धडके पासून वाचल्याने आणखी जीवित हानी झाली नाही.
घटनेनंतर इनामुल सुतार यांनी गंभीर जखमी अवस्थेतील राजला तात्काळ दवाखान्यात नेले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, निष्पाप बालकाच्या मृत्यूने भिलवडी गावात शोककळा पसरली आहे.दरम्यान अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून भिलवडी पोलीस अधिक तपास करत आहेत. संबंधित अपघाताची बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी व भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. डंपर ड्रायव्हर भिलवडी पोलीस ठाण्यात हजर झाला असून घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत