ध्येय, जिद्द, प्रचंड इच्छाशक्ती अन् गावाचं स्वप्न : विजय वावरे सरांची आदर्श प्रेरणादायी कहाणी”

दर्पण न्यूज भिलवडी :-
छोटंसं गाव – भिलवडी. त्या गावात क्रिकेट म्हणजे फक्त टी.व्ही. वर बघायचा खेळ. मैदान नव्हतं, सुविधा नव्हत्या, आणि सगळ्यात महत्त्वाचं – स्वप्न पाहण्यासाठी वातावरणच नव्हतं. पण अशा गावात एक तरुण ध्येयाच्या आगीत पेटलेला होता – विजय वावरे सर.
काही वर्षांपूर्वीची गोष्ट – गावात अकॅडमी सुरू करायचं ठरवलं, पण काही गलिच्छ राजकारणामुळे त्यांना जागाच मिळाली नाही. कित्येकांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, “गावात काय क्रिकेट? शहरात जा!” असं खूप जण म्हणाले. पण त्याच वेळी त्या तरुणाच्या मनात एकच विचार होता – “आपल्या गावातले मुलंही भारतासाठी खेळू शकतात!”
स्वतःची शेती होती – जमीन पीक काढण्यासाठी होती, पण विजय सरांनी तिथं क्रिकेटचं पीक लावलं.
शून्यावरून सुरुवात झाली. सुरुवातीला मोजकीच मुलं, कोणी लेदर बॉलचं नावही ऐकलं नव्हतं. गावात हसणारे, टीका करणारे, सल्ले देणारे खूप होते. “गावी काही होणार नाही,” असं कित्येकांनी सांगितलं. पण विजय सरांसाठी हे फक्त सुरुवातीचे टप्पे होते.
आज, 2025 साली… विजय वावरे क्रिकेट अकॅडमीचा एक खेळाडू – प्रणव शिंदे – देशात चमकतोय.
बीसीसीआय अंतर्गत होणाऱ्या 16 वर्षाखालील नॅशनल हाय परफॉर्मन्स कॅम्प साठी त्याची निवड झाली आहे. 18 एप्रिल ते 17 मे या कालावधीत बेंगळुरूमध्ये व्ही. व्ही. एस लक्ष्मण यांच्यासारख्या दिग्गजाकडून प्रशिक्षण मिळणार आहे.
हा काही एका खेळाडूचा प्रवास नाही, ही एका स्वप्नवेड्या गुरूची, त्याच्या मेहनतीची आणि गावाच्या जिद्दीची कहाणी आहे.
आज अकॅडमीमध्ये शंभरहून अधिक विद्यार्थी आहेत. काहीजण इंडिया लेव्हलपर्यंत पोहोचण्याच्या मार्गावर आहेत. उद्या कुणीतरी आयपीएल खेळेल, कुणीतरी देशासाठीही खेळेल – पण त्यांचा पाया, त्यांची माती ही भिलवडीचीच असेल.
आमदार गोपीचंद पडळकर साहेब ,(हिंदुस्तान शिव मल्हार क्रांती सेना )यांच्या तर्फे अशा ध्येयवेळ्या, प्रेरणादायी विजय सरांना आणि त्यांच्या चमकणाऱ्या विद्यार्थ्यांना मानाचा सलाम!
ध्येय असेल, तर मार्ग नक्की सापडतो. आणि स्वप्नांवर श्रद्धा असेल, तर आकाशही लवते.
– रिशी टकले