प्रतिकूलतेवर खंबीर मात करत जयश्री पाटील यांनी फुलवली यशस्वी शेती

जीवनाच्या प्रवासात काही प्रसंग असे येतात की माणसाला खंबीरपणे उभे राहण्याची ताकद त्यातूनच मिळते. पलूस तालुक्यातील बुर्ली गावातील जयश्री रामचंद्र पाटील यांची कहाणी याच धैर्याची, चिकाटीची आणि नव्या वाटा शोधण्याची आहे. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीशी लढा देत आत्मविश्वासाने शेतीमध्ये चौफेर घोडदौड सुरू केली. अथक परिश्रमांच्या जोरावर धडपड करत आपले कर्तृत्त्व सिद्ध केले आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील श्रमरेषा त्यांचा संघर्ष दर्शवतात.
जयश्री पाटील या पलूस तालुक्यातील बुर्ली गावच्या. त्यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले. त्यानंतर लग्न झाले. कुटुंबात सासुबाई, दोन दीर, दोन जाऊबाई, आणि त्यांची मुले असा मोठा एकत्रित परिवार आहे. सगळे व्यवस्थित सुरू असताना 16 वर्षांपूर्वी 2009 साली अचानक त्यांच्या पतीचे निधन झाले. ऐन पस्तीशीत आलेल्या या परिस्थितीशी मानसिक संघर्ष करताना, जयश्रीताईंनी स्वतःला सावरले आणि कुटुंबालाही.
जयश्रीताईंनी अशिक्षित कुटुंबाच्या साथीने त्यांनी शेती करायची ठरवले. त्या म्हणाल्या, मी शेतकरी कुटुंबात जन्मली असल्यामुळे मला लहानपणापासून शेतीची आवड आहे. माझ्या सात एकर शेतीत मी शेवगा, पावटा असे नाविन्यपूर्ण उपक्रम केले. उसाचे विक्रमी उत्पादन घेतले. संपूर्ण शेती सेंद्रीय खताचा वापर करून केली जाते. हे सर्व करत असताना दूरदृष्टी ठेवत कृषि विभागाच्या सहकार्याने अनेक योजनांचा लाभ घेत मुलांचे उच्च शिक्षणासाठी आर्थिक तजबीज केली असल्याचे त्यांनी सांगितले.
सात एकर शेतीत त्यांनी नवकल्पना सुरू केल्या. उसाबरोबरच शेवगा, पावटा यांसारख्या पिकांवर भर दिला. सेंद्रीय खतांचा वापर करून त्यांनी जमिनीची सुपीकता वाढवली. ठिबक सिंचनासारख्या आधुनिक तंत्राचा अवलंब केला. शेतीसोबत शेततळे, मत्स्यपालन आणि पशुपालनही सुरू केले. आज त्यांच्या गोठ्यात गाई-म्हशी मिळून 20 जनावरे आहेत आणि दिवसाला शंभर लिटरहून अधिक दूध उत्पादन होते.
जयश्रीताईंचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी केवळ स्वतःपुरतीच वाटचाल केली नाही, तर इतरांनाही बरोबर घेतले. आजूबाजूच्या 70 महिलांना आणि 25 तरुणांना त्यांनी दुग्धव्यवसायाकडे वळवले. त्यामुळे संपूर्ण परिसरात आर्थिक स्वावलंबनाची नवी चळवळ निर्माण झाली. महिला बचत गट स्थापन करून त्यांनी स्त्रियांच्या हाताला रोजगार दिला.
कृषी विभागाच्या योजनांचा त्यांनी योग्य फायदा घेतला. योजनेतून मिळालेल्या सहाय्याने त्यांनी मुलांच्या शिक्षणाचीही सोय केली. आई म्हणून जबाबदारी आणि शेतकरी म्हणून कर्तृत्व – हे दोन्ही निभावताना त्यांनी कोणतीही तडजोड केली नाही. इतकेच नाही तर कोर्टकचेरी करून आपल्या हक्काच्या जमिनीसाठीही त्यांनी न्यायालयात यशस्वी लढा दिला. आज त्यांची मुले उच्च शिक्षित आहेत. हे करणे कोणत्याही ग्रामीण भागातील सामान्य स्त्रीला सोपे नाही.
गेल्या 15 वर्षांत शेतीतील प्रयोगांमुळे जयश्री पाटील यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्या परिसरातील इतर शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन करतात. शेतकऱ्यांच्या अडचणी त्यांनी स्वतः अनुभवल्या असल्याने, इतरांना मदत करण्यात त्यांना समाधान वाटते.
जयश्रीताईंच्या आयुष्याकडे पाहिल्यावर जाणवते की, संकटे कितीही मोठी असली तरी जिद्द, आत्मविश्वास आणि आधुनिक दृष्टिकोन असेल तर कुठलीही वाट अशक्य नाही. त्या स्वतःच्या प्रयत्नांतून उभ्या राहिल्या आणि परिसरालाही उभे केले.
आज नवरात्रीच्या उत्सवात आपण ज्या देवीशक्तीची उपासना करतो, ती शक्ती प्रत्यक्ष आयुष्यात अनुभवायची असेल तर जयश्री पाटील यांच्याकडे बघावे लागेल. त्या खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील नवदुर्गा आहेत – ज्या परिश्रम, नवकल्पना आणि धैर्याच्या बळावर आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत.
प्रेरणा – मा. ना. श्री. चंद्रकांत पाटील, पालकमंत्री, सांगली जिल्हा
प्रोत्साहन – श्री. अशोक काकडे, जिल्हाधिकारी, सांगली
लेखन संप्रदा बीडकर, जिल्हा माहिती अधिकारी, सांगली
समन्वय वर्षा पाटील, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, सांगली
संकलन राऊ देशमुख, समुपदेशक