भिलवडी साखरवाडी येथे आमदार डॉ विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत आगळ्यावेगळ्या परसबाग स्पर्धेचा बक्षीस वितरण नव्या ढंगात..!
विश्वसंवाद फाउंडेशनच्या वतीने पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ विश्वजीत कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन : महिलांचा मोठा सहभाग

दर्पण न्यूज भिलवडी – : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी साखरवाडी येथे विश्वसंवाद फाउंडेशनच्या वतीने पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ विश्वजीत कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित परसबाग स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा हा सेवानिवृत्त शिक्षिका आणि या स्पर्धेतल्या स्पर्धक हसीना शेख यांच्या साखरवाडी येथील परसबागेत नव्या संकल्पनेवर आधारित एका आगळ्यावेगळ्या ढंगात झाला.
बैलगाडीवरून दमदार आगमन
आमदार विश्वजीत कदम यांचे आगमनही अनोख्या पद्धतीने करण्यात आले. विश्वसंवाद फाउंडेशनच्या वतीने विशेषतः बैलगाडीच्या माध्यमातून त्यांची भव्य एन्ट्री झाली, ज्यामुळे संपूर्ण कार्यक्रमाला पारंपरिक आणि उत्साहवर्धक रंगत आली.यावेळी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र आप्पा लाड उपस्थित होते. यावेळी परसबागेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. भिलवडी-माळवाडी परिसरातील बचत गटातील महिलांनी उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन मांडले होते. आमदार कदम यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन महिलांच्या उद्योगवाढीसाठी भारती बाजारच्या माध्यमातून उत्पादने खरेदी करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाची सुरुवात समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल ची विद्यार्थिनी समीक्षा किरण राजमाने हिच्या अतिशय मंत्रमुग्ध करणाऱ्या योगासनाच्या नृत्यविष्काराने झाली.परसबाग स्पर्धेसाठी पलूस तालुक्यातील २९ गावांतील ८९ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. विश्वसंवाद फाउंडेशनच्या टीमने घरोघरी जाऊन परीक्षण केले. महिला स्पर्धकांनी सजवलेल्या परसबागा केलेले स्वागत आणि त्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून मांडलेल्या विविध कल्पनांची चित्रफीत ही यावेळी दाखवण्यात आली.
यामधून पुष्पा चंद्रकांत पाटील (पलूस) यांनी प्रथम क्रमांक, सुरेखा विकास चव्हाण (अंकलखोप) शोभा लक्ष्मण पाटील (पलूस) यांना विभागून द्वितीय, सरिता बबन येसूगडे (माळवाडी) सारिका निशिकांत वड्डीकर (सावंतपूर) यांना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला.
विजेत्यांना रोख रक्कम सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र आणि पहिल्या 13 क्रमांकासाठी होम गार्डनिंग कंपोस्ट खताच्या पिशव्या देण्यात आल्या.‘आजीचा बटवा’ आणि वाढदिवस सेलिब्रेशन
54 ऑक्सिजन देणारी झाडे असणाऱ्या निसर्गरम्य वातावरणामध्ये झालेल्या या कार्यक्रमात आमदार कदम यांचा सन्मान करण्यासाठी विश्वसंवाद फाउंडेशनच्या वतीने त्यांना ‘आजीचा बटवा’ प्रदान करण्यात आला.त्यामध्ये मेथी, वेखंड, आवळा, सुंठ, गुळवेल, जेष्ठमध, त्रिफळा आणि दालचिनी यांचं चूर्ण होतं. बचत गटाच्या महिलांनीही त्यांनी तयार केलेल्या उत्पादनाची दुरडी तयार करून विश्वजीत कदम यांना देत त्यांच्या वाढदिवसाचे अनोखा सेलिब्रेशन केलं.निसर्गस्नेही संकल्पना आणि शेवटचा पारंपरिक आनंदसोहळा
संपूर्ण कार्यक्रम निसर्गावर आधारित थीमवर सजवण्यात आला होता, ज्यामुळे पर्यावरणपूरक उपक्रमांना चालना मिळाली. कार्यक्रमानंतर महिलांसह उपस्थितांनी पारंपरिक भाकरी-भाजीच्या भोजनाचा आस्वाद घेतला.या सोहळ्यामुळे महिलांना उद्योग व शेती क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन मिळाले असून, हा कार्यक्रम अतिशय प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरला.
कार्यक्रमाचे स्वागत विश्वसंवाद फाउंडेशनचे प्रमोद जाधव, प्रास्ताविक मंगेश मोटे, आभार सुनील तुपे आणि सूत्रसंचालन दीपक पाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी स्पर्धक महिलांबरोबरच भिलवडीच्या सरपंच सीमा शेटे,ब्रम्हनाळच्या सरपंच गीता गायकवाड, माळवाडीच्या सरपंच सुरैया तांबोळी, खंडोबाचीवाडीच्या सरपंच अश्विनी मदने, चोपडेवाडीच्या सरपंच सुप्रिया माने, महिला काँग्रेसच्या श्वेता बिरनाळे, माधुरी सावंत, प्रजापिता ब्रह्माकुमारीच्या मीरा बहिणजी, जायट्स ग्रुपच्या स्नेहा शेडबाळकर, ग्रामपंचायत सदस्या रेहाना फकीर, रूपाली कांबळे बचतगटाच्या उषा पाटील याचबरोबर भिलवडी आणि परिसरातील महिला उपस्थित होत्या.
परसबाग स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ नव्या ढंगातील संकल्पना नक्कीच आयुष्यभर स्मरणात राहतील , अशा प्रकारच्या प्रतिक्रिया यावेळी उपस्थित महिलांनी व्यक्त केल्या.