महाराष्ट्रआरोग्य व शिक्षण

एनसीसी’मधील सहभागामुळे मुलींमध्ये नेतृत्वगुणांचा विकास  : राज्यपाल सी पी राधाकृष्णन

 

 

            मुंबई : ‘एनसीसी’मधील सहभागामुळे मुलींचा आत्मविश्वास वाढतो, त्यांच्यातील नेतृत्व गुणांचा विकास होतो. विकसित भारताचे उद्दिष्ट गाठताना महिलांची अर्थव्यवस्थेतील भागीदारी वाढणेही आवश्यक आहे. मुलींनी ‘एनसीसी’मध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती सी.पी.राधाकृष्णन यांनी केले.

‘एनसीसी’च्या माध्यमातून मुलींचे सक्षमीकरण’ या विषयावर आयोजित चर्चासत्राचे उद्घाटन राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत आज शनिवारी (दि. 30 नोव्हेंबर) के. सी. महाविद्यालयाच्या सभागृहात झाले, त्यावेळी राज्यपाल बोलत होते. महाराष्ट्र एनसीसी संचालनालय व एचएसएनसी विद्यापीठ यांनी संयुक्तपणे चर्चासत्राचे आयोजन केले होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘एनसीसी’च्या विस्ताराबाबत सूचित केले आहे. यादृष्टीने जास्तीत जास्त युवक-युवतींनी ‘एनसीसी’मध्ये आपला सहभाग वाढवला पाहिजे असे सांगून ‘एनसीसी’मुळे शिस्तपालनाचे महत्व कळते व देशभक्तीची भावना जोपासली जाते असे राज्यपालांनी सांगितले.

शिस्त नसली तर यश मिळत नाही त्यामुळे युवकांनी ‘शिस्त’अंगी बाणवली पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले. युवक-युवतींनी दिवसातील किमान 15 मिनिटे योग व ध्यानधारणेसाठी दिल्यास त्यांची एकाग्रता शक्ती वाढेल असे सांगताना युवकांनी मोबाईलवरील वेळ नियंत्रित ठेवला पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

चर्चासत्राला ‘एनसीसी’चे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीर पाल सिंह, एचएसएनसी विद्यापीठाचे प्रोव्होस्ट डॉ.निरंजन हिरानंदानी, सर्जन व्हाईस ऍडमिरल आरती सरीन, महासंचालक सशस्त्र सैन्य दल वैद्यकीय महाविद्यालय, दिप्ती चावला, अतिरिक्त सचिव, संरक्षण मंत्रालय, एचएसएनसी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.हेमलता बागला, एनसीसी महाराष्ट्राचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल योगेंद्र सिंग तसेच सैन्य दलातील अधिकारी, जवान व एनसीसी कॅडेट्स उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!