शेतकरी बांधवांनो रब्बी पीक स्पर्धेसाठी अर्ज करा : जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार
रब्बी हंगाम 2024-25 साठी रब्बी ज्वारी, गहू, हरभरा पिकांचा समावेश ; ;

सांगली : रब्बी हंगाम 2024-25 साठी रब्बी ज्वारी, गहू, हरभरा या 3 पिकांसाठी पीक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2024 आहे, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
वंचित दुर्लक्षित तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रगत आणि उत्पादनात तंत्रज्ञानात वाढ होण्याची आवश्यकता विचारात घेऊन तसेच जास्तीत जास्त शेतकरी पीक स्पर्धेमध्ये सहभागी होतील या दृष्टीकोनातून शासन निर्णय 20 जुलै 2023 अन्वये खरीप हंगाम 2023 पासून पीक स्पर्धा तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर राबविण्यात येत आहे. त्यानुसार कृषि विभागामार्फत रब्बी हंगाम सन 2024-25 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी रब्बी ज्वारी, गहू, हरभरा या 3 पिकासाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
पात्रता – स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीच्या स्वतःच्या शेतावर संबंधित पिकांच्या बाबतीत किमान 40 (0.40 हे.) आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे – विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-31), ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, 7/12, 8-अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास), पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित 7/12 वरील पोषित केलेल्या चिन्हांकित केलेला नकाशा, बँक खाते चेक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.


