कुंडल येथे डॉ विश्वजीत कदम यांचे थोर स्वातंत्र्यसेनानी, क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांना अभिवादन

पलूस : पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ विश्वजीत कदम यांनी सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील कुंडल येथे थोर स्वातंत्र्यसेनानी, क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या १३ व्या पुण्यतिथीनिमित्त कुंडल येथील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना परिसरातील त्यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केले.
देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी स्वत:ला झोकून देऊन काम केले. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखालील प्रतिसरकारच्या लढ्यात तुफान सेनेचे फिल्ड मार्शल, आघात दलाचे सरसेनापती म्हणून बापूंनी धाडसाने केलेली कामगिरी ही त्यांचे शौर्य आणि कर्तृत्वाची साक्ष देते. शेतकरी, शेतमजूर, कामगार, दुष्काळग्रस्त व सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी ते आयुष्यभर लढत राहिले. त्यांचे कार्य सदैव प्रेरणादायी आहे.
यावेळी ज्येष्ठ नेते, माजी आमदार मोहनराव (दादा) कदम, क्रांती उद्योग समुहाचे संस्थापक आ. अरुण (अण्णा) लाड, क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद (भाऊ) लाड, जिल्हा बँकेचे संचालक महेंद्रअप्पा लाड, सतीश आबा पाटील यांच्यासह इतर मान्यवर, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.