पलूस-कडेगाव, खानापूर विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त सर्वसाधारण निरीक्षक एजाज अहमद भट जिल्ह्यात दाखल

सांगली,: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी सांगली जिल्ह्यातील 285-पलूस-कडेगाव व 286-खानापूर विधानसभा मतदारसंघासाठी सर्वसाधारण निरीक्षक म्हणून नियुक्त एजाज अहमद भट (आय.ए.एस.) हे सांगली जिल्ह्यामध्ये दाखल झाले आहेत.
सर्वसाधारण निरीक्षक एजाज अहमद भट यांच्या कार्यालयाचा पत्ता मा. सर्वसाधारण निरीक्षक 285-पलूस-कडेगाव व 286-खानापूर विधानसभा मतदारसंघ, कक्ष क्र. 4, शासकीय विश्रामगृह मिरज असा आहे. त्यांचा ईमेल आयडी ajazajmadkas@gmail.com असा असून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9325151188 हा आहे. सर्वसाधारण निरीक्षक एजाज अहमद भट हे दिनांक 28 ऑक्टोबर 2024 पासून 285-पलूस-कडेगाव व 286-खानापूर विधानसभा मतदारसंघाचा दौरा करत आहेत. या मतदारसंघांमधील उमेदवारांच्या निवडणूकसंबंधी काही तक्रार असल्यास दिलेल्या ई मेलवर अथवा भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करावा अथवा कार्यालयीन कामकाजादिवशी सकाळी 9 ते 11 या वेळेत कार्यालयात समक्ष येऊन भेटावे, असे आवाहन सर्वसाधारण निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी राजन डवरी यांनी केले आहे.
________________________
इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडियातील प्रचाराच्या
राजकीय जाहिरातींचे प्रमाणिकरण बंधनकारक
-जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
सांगली : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियात प्रसारित करण्यात येणाऱ्या प्रचाराच्या राजकीय जाहिराती माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समितीकडून (एमसीएमसी) प्रमाणित करून घेणे बंधनकारक आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी कळविले आहे. उमेदवारांनी सदर जाहिराती प्रमाणित करूनच प्रसारित कराव्यात. तसेच, इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांनीही जाहिरात प्रसारण करण्यापूर्वी या बाबीची खात्री करुन घ्यावी, असे आवाहन डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे.
टीव्ही, केबल नेटवर्क/ केबल चॅनेल्स, सिनेमा हॉल्स, आकाशवाणी, रेडिओ, एफएम वाहिन्या, सार्वजनिक ठिकाणी दाखवण्यात येणाऱ्या ऑडिओ व्हिज्युअल्स जाहिराती, ई न्यूजपेपरवरील जाहिराती, बल्क एसएमएस किंवा व्हॉईस मेसेजेस, सोशल मीडियावरील जाहिराती, इंटरनेट वेबसाईटवरील जाहिरातींचे प्रमाणिकरण करणे बंधनकारक आहे. विविध माध्यमांवर निवडणूक प्रचाराचे संनियंत्रण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यम कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. जाहिरातीच्या प्रमाणिकरणासाठी विहित नमुन्यातील अर्ज व अन्य अनुषंगिक माहितीसाठी जिल्हा माहिती कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला, विजयनगर सांगली येथे संपर्क साधावा.