महाराष्ट्र

नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत उद्दिष्टपूर्तीसाठी निरक्षर व्यक्तिंची नोंदणी 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करा :  मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे

 

 

        सांगली,  : नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत सन 2024-25 साठी दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी 30 सप्टेंबर 2024 पर्यंत निरक्षर व्यक्तिंची नोंदणी पूर्ण करून साक्षरता वर्ग सुरू करावेत, अशा सूचना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज येथे दिल्या.

जिल्हा परिषद बैठक सभागृहात आयोजित केंद्र पुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या अंमलबजावणी संदर्भात नियामक परिषद व कार्यकारी समितीच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. यावेळी कोल्हापूर विभागाचे शिक्षण उपसंचालक महेश चोथे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, जि. प. मुख्य लेखा व वित्त अधिकारी विठ्ठल चव्हाण, शिक्षणाधिकारी (योजना) महेश धोत्रे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेसाहेब लोंढे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन गायकवाड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी एस. डी. भांबुरे, उपशिक्षणाधिकारी गंगाधर गिरी यांच्यासह समिती सदस्य व सर्व गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.

            मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या, नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ज्यांचे अद्यापही स्कूल युजर आयडी तयार केले नाहीत, त्यांनी ते तात्काळ करावेत. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी वेळोवेळी आढावा घ्यावा. कोणत्या ठिकाणी निरक्षर व्यक्ती मिळणार आहेत, अशी ठिकाणे निश्चित करून त्या भागावर लक्ष केंद्रित करून निरक्षर व्यक्तिंची नोंद करावी. गणेशोत्सव, नवरात्र कालावधीत या योजनेची जनजागृती करावी. जनजागृतीसाठी शिक्षण विभागाबरोबर ग्रामपंचायतीचेही सहकार्य घ्यावे, असे त्यांनी सूचित केले.

श्रीमती धोडमिसे म्हणाल्या, सन 2024-25 मध्ये 15 हजार 595 निरक्षर व्यक्तिंच्या नोंदणीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आतापर्यंत 7 हजार 465 इतक्या निरक्षर व्यक्तिंची नोंद झाली असून उर्वरित उद्दिष्ट 30 सप्टेंबर पर्यंत पूर्ण करावे. ज्या यंत्रणा दिलेल्या उद्दिष्टपूर्ती मध्ये मागे आहेत, त्यांनी उद्दिष्टपूर्तीसाठी पाठपुरावा करावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी शिक्षणाधिकारी (योजना) महेश धोत्रे यांनी नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत झालेल्या कामाची सविस्तर माहिती दिली. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन गायकवाड यांनी आभार मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!