सांगली येथे नेत्रदान पंधरवड्यानिमित्त अवयवदान जनजागृती

सांगली : नेत्रबुब्बुळाची मागणी व पुरवठा यातील तफावत भरून काढण्यासाठी नेत्रदान पंधरवडा दि. 25 ऑगस्टपासून साजरा करण्यात येत आहे. या निमित्त पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली येथे अवयदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरजचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, नीता केळकर, डॉ. हेमा चौधरी, सुकुमार पाटील, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. गायत्री वडगावे आदि उपस्थित होते.
अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरज येथे अवयव संकलन केंद्राच्या माध्यमातून मेंदूमृत व्यक्तिच्या कुटुंबियांचे समुपदेशन करून त्यातून अवयव संकलन करण्याच्या प्रक्रियेस सुरूवात करण्यात येईल, असे मत अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांनी व्यक्त केले.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम म्हणाले, मेंदू मृत अवस्थेत शोकाकुल परिस्थितीतील नातेवाईकांना समुपदेशन करणे व अवयवदानासाठी प्रोत्साहित करणे ही तारेवरची कसरत असून त्यातून घेतलेला धाडसी निर्णय लोकांचे प्राण वाचवू शकतो. अवयवदानाचा असा विचार समाजाकरिता प्रेरणादायी ठरू शकतो.
नेत्रदानाची चळवळ समाजामध्ये रूजलेली आहे. पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली येथे कार्यरत नेत्रपेढी व त्याचबरोबर सांगली जिल्ह्यात कार्यरत 9 नेत्रपेढ्या यांच्या माध्यमातून 2024-25 मध्ये ऑगस्ट अखेर 52 नेत्रबुब्बुळे गोळा करण्यात आली. त्यापैकी 42 रूग्णांवर नेत्ररोपणाची शस्त्रक्रिया करून दृष्टी प्रदान करण्यात आली. सन 2023-24 मध्ये एकूण 230 नेत्रबुब्बुळे गोळा करून त्यापैकी 134 रूग्णांवर नेत्ररोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. तर सन 2022-23 मध्ये एकूण 252 नेत्रबुब्बुळे गोळा करून 155 रूग्णांवर नेत्ररोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली.
यावेळी अवयवदान केलेल्या 3 कुटुंबांचे सत्कार करून अवयवदान केलेल्या नातेवाईकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. जिल्ह्यातील अवयवदान मोहिमेच्या कामगिरीबद्दल नीता केळकर यांनी संपूर्ण टीमचे कौतुक केले. प्रास्ताविक डॉ. हेमा चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन व आभार जिल्हा अवयवदान समन्वयक अविनाश शिंदे यांनी मानले