फौजदारी कायदे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक : सांगलीचे पोलिस अधीक्षक संदीप घुगे
सरकारी कर्मचाऱ्यांनी मौखिक प्रचाराद्वारे फौजदारी कायद्यांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवावी : सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे
नव्या भारताचे नवीन कायदे प्रदर्शन लोकांसाठी सांगलीमध्ये खुले
सांगली :
अशा प्रकारच्या प्रदर्शनीच्या माध्यमातून नवीन फौजदारी कायद्यांची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे जेणेकरून पूर्वीचे कायदे आणि त्यात झालेले बदल याविषयी नागरिकांना माहिती मिळेल. नागरिकांच्या सोयीसाठी त्यांच्या गरजांनुसार फौजदारी कायद्यांमध्ये झालेला बदल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा प्रदर्शनी ची गरज असल्याचे प्रतिपादन सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी केले. केंद्रीय संचार ब्यूरो आणि जिल्हा परिषद सांगली यांच्यातर्फे आयोजित नव्या भारताचे नवीन कायदे या नवीन फौजदारी कायद्यांची माहिती देणाऱ्या प्रदर्शनीमध्ये ते उद्घाटन प्रसंगी बोलत होते. नवीन कायद्यांचा भर हा शिक्षेपेक्षा न्यायावर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा परिषद वा इतर विभागांच्या सरकारी कर्मचाऱ्यांनी या प्रदर्शनीला भेट देऊन नवीन फौजदारी कायद्यांची माहिती घेऊन त्यांच्यामार्फत मौखिक प्रचाराद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी असे आवाहन सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक तृप्ती अंकुश धोडमिसे यांनी यावेळी बोलताना केले. नवीन फौजदारी कायद्यांविषयी लोकांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी अशा प्रदर्शनींची मदत होईल असे त्या पुढे म्हणाल्या
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो आणि सांगली जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 6, 7, 8 ऑगस्ट 2024 दरम्यान सांगली जिल्हा परिषदेत माहितीपर चित्र प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलं आहे.
यामध्ये नवीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी, भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष अधिनियम, नव्या कायद्यात अंतर्भूत केलेली नवीन कलमं आणि त्यांची कार्यपद्धती, ई-एफ आय आर, योग्य वेळेत न्याय, तंत्रज्ञानाचा वापर, न्यायवैद्यक शास्त्राला प्रोत्साहन, साक्षीदारांचे संरक्षण, लहान मुलं आणि महिला सुरक्षा, अभियोजन संचालनालय आदी विषयांवरील माहिती मांडण्यात आली आहे.
दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद खंडागळे यांनी केले. उपस्थित दर्शकांसाठी नवीन फौजदारी कायद्यावर प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली.
विजेत्यांना प्रमाणपत्र आणि बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. या तीन दिवसीय प्रदर्शनामध्ये नवीन फौजदारी कायद्यामधील विविध तरतुदी, गैरसमज व वस्तुस्थिती या विषयाची मांडणी करण्यात आली आहे. हे प्रदर्शन सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे. तसेच क्यूआर कोड स्कॅन करून प्रदर्शनाची संपूर्ण माहिती मोबाईलवर मिळवता येणार आहे. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, शशिकांत शिंदे आणि इतर मान्यवर सरकारी अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.