सांगली कृपामयी रुग्णालयाजवळील रेल्वे पूल जड वाहतुकीसाठी बंदबाबत अंतिम निर्णय नाही : जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली : सांगली मिरज रस्त्यावरील कृपामयी रुग्णालयाजवळील रेल्वे पूल जड वाहतुकीसाठी बंद करण्याबाबत कोणताही अंतिम निर्णय घेतला नसल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी स्पष्ट केले आहे.
यासंदर्भात माहिती देताना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, सांगली मिरज रस्त्यावरील कृपामयी रुग्णालयाजवळील रेल्वे पूल जड वाहतुकीसाठी बंद करण्याबाबत रेल्वेचे अधिकारी यांच्या स्ट्रक्चरल रिपोर्टवर रेल्वे, महानगरपालिका, वाहतूक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यासमवेत प्राथमिक बैठक घेण्यात आली. या बैठकीत रेल्वेच्या सक्षम प्राधिकारी यांच्या स्वाक्षरीचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागास सादर करण्याच्या सूचना रेल्वे अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यातील सूचनावर अभ्यास व सर्वे करण्यात येईल. त्यानंतर यासंदर्भात पुन्हा बैठक घेण्यात येईल. सदर पूल जड वाहतुकीसाठी बंद करण्याची गरज भासल्यास पर्यायी मार्ग सुचविण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. तसेच जड वाहतुकीसाठी पूल बंद करण्याची गरज भासल्यास नागरिकांची सुरक्षा व सुरळीत वाहतूक या दृष्टीकोनातून सर्व संबंधितांना विश्वासात घेऊनच योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे डॉ. राजा दयानिधी यांनी स्पष्ट केले आहे.