ज्येष्ठ साहित्यिक सुभाष कवडे यांना कवयित्री शांता शेळके साहित्य पुरस्कार पुणे येथे प्रदान

दर्पण न्यूज भिलवडी – देवांग समाज पुणे यांचे वतीने देण्यात येणारा कवयित्री शांता शेळके साहित्य पुरस्कार 2025 नुकताच पुणे येथे गणेश कला क्रीडा केंद्राच्या भव्य सभागृहात पुणे महानगरपालिकेचे आयुक्त मा.ओम प्रकाश दिवटे यांचे शुभ हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी देवांग समाज पुणे चे अध्यक्ष मल्हारराव ढोले, आयकर उपायुक्त मनीषा तारळकर, प्राध्यापक नारायण उंटवाले, सिद्धी व्हीलचे मालक श्रीकांत तारळेकर कोष्टी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण वरुडे व प्रसिद्ध सर्जन डॉ. प्रशांत दाते व देशभरातून आलेले समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुमारे 5000 समाज बांधवांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात संपन्न झाला. स्वागत प्रास्ताविक अध्यक्ष मल्हारराव ढोले यांनी केले. यावेळी बोलताना आयुक्त ओम प्रकाश दिवटे म्हणाले समाजातील गुणवंतांचा सत्कार हा प्रेरणादायी उपक्रम आहे शांता शेळके यांच्या नावाचा दिलेला पुरस्कार समाज संस्कार करणारा आहे . सत्काराला उत्तर देताना सुभाष कवडे म्हणाले. या शांता शेळके यांच्या नावाने दिला पुरस्कार म्हणजे मला आईने दिलेल्या पुरस्काराची जाणीव करून देणारा आहे . महाराष्ट्रातील अनेक संस्थांनी यापूर्वी गौरविले पण हा पुरस्कार माझ्या चिरंतन स्मरणात राहणारा आहे. सुभाष कवडे यांची सोळा पुस्तके प्रसिद्ध झाली असून अनेक संमेलनाचे अध्यक्ष पद व्याख्याने इत्यादी उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो ते सार्वजनिक वाचनालयाचे कार्यवाह असून वाचन चळवळीत सक्रिय सहभाग घेत आहेत सुमारे 50 हून अधिक पुरस्कारांनी आजवर त्यांना गौरविण्यात आलेले आहे. पाच काव्यसंग्रह पाच ललित लेख चार बालकुमारांची पुस्तके तीन संपादने असे साहित्य त्यांच्या नावावर आहे. सन्मानचिन्ह सन्मानपत्र शाल श्रीफळ आणि बुके असे पुरस्काराचे स्वरूप होते या पुरस्काराबद्दल सुभाष कवडे यांचे महाराष्ट्रभरातून अभिनंदन केले जात आहे.



