महाराष्ट्रराजकीय

सांगली लोकसभा : मतमोजणीची जबाबदारीने पार पाडावी :   जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

 

 

सांगली  :- सांगली लोकसभा मतदार संघातील मतमोजणीची प्रक्रिया अधिक सुलभ, सुरळीतपणे होण्यासाठी मतमोजणीची जबाबदारी सोपविलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांची जबाबदारी अधिक अचूकतेने व सचोटीने पार पाडवी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या.

४४-सांगली लोकसभा मतदार संघात झालेल्या मतदानाची मतमोजणी उद्या, मंगळवार ४ जून रोजी होत आहे. या मतमोजणीच्या अनुषंगाने वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन मिरज येथे मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी मतमोजणीची रंगीत तालीम आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी अधिकारी   कर्मचारी  यांच्याशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शक सूचना केल्या.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या समवेत सांगली लोकसभा मतदार संघाचे सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक परमेश्वरम बी., मतमोजणी निरीक्षक एन. कालिदास, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे, उपजिल्हाधिकारी डॉ. विकास खरात, उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे, उपजिल्हाधिकारी आशिष बारकुल, उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे, उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, उपजिल्हाधिकारी सविता लष्करे, उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी  म्हणाले, लोकशाहीच्या उत्सवात सर्वच यंत्रणांनी आतापर्यंत चांगले काम केले असून मतमोजणीमध्येही अशाच प्रकारचे चांगले काम करूया. मतमोजणीचे काम करताना अधिक सतर्क असणे आवश्यक आहे. मतमोजणीच्या अनुषंगाने अधिकारी कर्मचाऱ्यांना दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार त्यांनी मतमोजणीचे काम करावे.

मतमोजणीच्या कामात कोणत्याही प्रकारची हयगय होऊ नये याची खबरदारी घ्यावी. पोलीस व सुरक्षा रक्षकांना सहकार्य करावे. मतमोजणीच्या कामासाठी दिलेल्या वेळेत उपस्थित राहावे, अशा सूचना करून जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले, मतमोजणी संपेपर्यंत कोणीही मतमोजणीचा हॉल सोडू नये. मतमोजणी कक्षात मोबाईल स्मार्ट वॉच हाताळण्यास व आणण्यास अनुमती नसल्याने या वस्तू कोणीही सोबत आणू नयेत.

तत्पूर्वी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी,  सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक परमेश्वरम बी., मतमोजणी निरीक्षक एन. कालिदास, पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी टपाली मतमोजणी कक्ष, ईटीपीबीएस मतमोजणी कक्ष, ईव्हीएम मतमोजणी कक्षांना भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!