सांगली जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक संपन्न

सांगली : जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात संपन्न झाली. बैठकीस समाज कल्याण कार्यालयाचे सहायक आयुक्त जयंत चाचरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सांगली शहर अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज प्रणिल गिल्डा, जिल्हा सरकारी वकील यांचे प्रतिनिधी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत अनुसूचित जाती /अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम 1989 सुधारित सन 2015 अन्वये पोलीस विभागाकडे दाखल झालेल्या, निपटारा करण्यात आलेल्या व पोलीस तपासावर व मा. न्यायालयात प्रलंबित असणाऱ्या प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. तसेच, या अधिनियमांतर्गत घडलेल्या गुन्ह्यांतील पीडितांना आर्थिक मदतीचाही आढावा घेण्यात आला. सहायक आयुक्त जयंत चाचरकर यांनी याबाबतची माहिती बैठकीत दिली. जातीचे दाखले, न्यायालयीन स्थगिती, शासन मंजुरी, वैद्यकीय दाखला, आरोपी अटक होणे आदि कारणास्तव प्रकरणे प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले.