सांगली – मिरज : भुयारी गटारी कामासाठी वाहतूक नियमन

दर्पण न्यूज मिरज / सांगली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते केंब्रिज स्कूल (पहिला टप्पा), परमशेट्टी हॉस्पिटल ते सांगली – मिरज मेन रोडपर्यंत (दुसरा टप्पा) या मार्गावर मिरज भुयारी गटारी योजना अंतर्गत काम करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमिवर हा रस्ता दिनांक 24 डिसेंबर 2025 ते दिनांक 24 फेब्रुवारी 2026 या कालावधी दरम्यान वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अशोक काकडे यांनी मोटर वाहन कायदा 1988 चे कलम 115 व 116 अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून सदर वाहतूक पर्यायी वाहतूक मार्गावरून वळविण्याबाबत तसेच वाहतूक सुरक्षा उपाययोजनेद्वारे वाहतूक नियंत्रित करण्याबाबतचे आदेश निर्गमीत केले आहेत.
पर्यायी वाहतूक मार्ग
मिरज शहरातून येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांसाठी – डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथून झारीबाग चौक वंटमुरे कॉर्नर मार्गे सांगली व इतर ठिकाणी जाता व परत येता येईल.
सांगली व मिरज शहरातून मिरज शहरात केंब्रिज स्कूल व हॉस्पिटलकडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांसाठी – मिरज शहरात येताना परमशेट्टी हॉस्पिटलकडे जाणारा रस्ता ते केंब्रिज स्कूल येथेपर्यंत वाहनांना जाता येईल व तसेच तेथून डावीकडे वळण घेऊन झारीबाग चौक मार्गे वंटमुरे कॉर्नर किंवा मिरज शहरात येता व परत जाता येईल.
आवश्यक ठिकाणी दिशादर्शक व माहितीदर्शक फलक, सुरक्षेच्या दृष्टीने दोन्ही बाजूस संपूर्ण रस्त्यांवर रात्री विद्युत पुरवठा, यासह वाहतूक वळविण्याच्या दृष्टीकोनातून संबंधितांनी करावयाच्या उपाय योजना व घ्यावयाच्या दक्षतेबाबत आदेशात सूचित करण्यात आले आहे.



