मणेराजुरी येथे जात पडताळणी मार्गदर्शन शिबीर संपन्न

सांगली -: राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती पर्व निमित्त महावीर पांडुरंग साळुंखे जुनिअर कॉलेज मणेराजुरी येथे जात पडताळणी मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले. शिबिरात बार्टी व समाज कल्याण विभागामार्फत सुरू असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात आली
सांगली जात पडताळणी समितीच्या अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी नंदिनी आवडे व जात पडताळणी समितीचे उपायुक्त उमेश घुले, संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव संभाजी पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित शिबिरास प्राचार्य एस आर घाटगे, जूनियर कॉलेजचे विभाग प्रमुख प्रा.गणेश जाधव, प्रा. मुंजे यांच्यास महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.
जात पडताळणी शिबिरात बार्टीचे प्रकल्प अधिकारी गणेश सवाखंडे यांनी जात पडताळणी अर्ज प्रक्रिया व त्यासाठी लागणाऱ्या विविध कागदपत्राबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच चालू शैक्षणिक वर्षांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जात पडताळणी प्रमाणपत्र काढण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत असे आवाहन केले. विद्यार्थ्यांना वेळेत जात पडताळणी प्रमाणपत्र मिळावीत व त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी विद्यार्थी व पालकांनी जागृत राहणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगून उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांच्या शंकांचे त्यांनी निरसन केले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी छत्रपती शाहू महाराज व शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्राध्यापक श्री. एस डी कांबळे यांनी तर प्रस्ताविक समतादूत सविता पाटील यांनी केले. आभार प्रा. वावरे यांनी मानले.