दर्पण न्यूज मिरज / सांगली : प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना (आंबिया बहार) सन २०२५-२६ मध्ये सांगली जिल्ह्यात राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. ही योजना बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, पुणे यांच्या माध्यमातून अंमलात आणली जाणार आहे. या योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यातील आंबा, केळी, डाळिंब, द्राक्ष या अधिसूचित फळपिकांचा समावेश असून शेतकऱ्यांनी या विमा योजनेत सहभाग नोंदविला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे, विशेषतः गारपीटीमुळे (Add-on Cover) नुकसान झाल्यास, विमाधारक शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत नुकसानाची माहिती विमा कंपनी किंवा संबंधित मंडळ कृषि अधिकाऱ्यांना देणे आवश्यक आहे. यानंतर विमा कंपनीकडून जिल्हा महसूल, ग्रामविकास व कृषि विभागाच्या समन्वयाने प्रत्यक्ष पाहणी करून वैयक्तिक स्तरावर नुकसानीचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी Bajaj Allianz General Insurance Company Limited (टोलफ्री: १८०० २०९ ५९५९) यांच्याशी संपर्क साधावा
गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी वेळेत माहिती देऊन पंचनामे करून घ्यावेत, तसेच या योजनेचा लाभ घेऊन फळपिकांचे आर्थिक संरक्षण करावे, असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक बसवराज मास्तोळी यांनी केले आहे.